Author Topic: लक्ष्य २०१०  (Read 1253 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
लक्ष्य २०१०
« on: December 22, 2009, 09:37:25 AM »
लक्ष्य २०१०

हे आयुष्य तुम्हाला असेच घालवायचंय की यात तुम्हाला काहीतरी आगळंवेगळं करून दाखवायचंय? गेल्या वर्षी अखेरीस तुम्ही जे ठरवलं होतं त्याप्रमाणे या वर्षी काय विशेष साध्य केलंत? सचिनने ३० हजार धावा पूर्ण केल्या. अमिताभने अप्रतिम ‘ऑरो’ साकारला. ओबामांना नोबेल पारितोषिक मिळालं. ए. आर. रेहमान यांना दोन ऑस्कर मिळाले. अशा कितीतरी असंख्य लोकांनी काहीतरी भन्नाट साकारून दाखवलं. पुढच्या वर्षी काही तरी नक्की करून दाखवू असं म्हणत हे वर्षसुद्धा तुम्ही वाया दवडलंत का?
माणसाच्या मोठय़ा यशाचे दोन प्रमुख टप्पे असतात. एक म्हणजे नेमकं काय साकारायचं आहे ते व्यवस्थित ठरवलं पाहिजे. तसेच ते मिळविण्याचा मनाशी ठाम निश्चय केला पाहिजे. दुसरं म्हणजे जे ठरवलंय ते प्राप्त करण्याकरिता रोज थोडंथोडं असं करीत त्या दिशेने काम करीत राहिलं पाहिजे. या दोन्ही गोष्टींसाठी ऊर्जा कुठून मिळते? तर ती प्रेरणेतून. ज्याप्रमाणे आपल्या मोबाईल फोनला रोजच्या रोज चार्ज करीत राहण्याची गरज असते त्याप्रमाणेच आपल्या लक्ष्याच्या दिशेने काम करीत राहण्यासाठी माणसाला सतत प्रेरणा मिळत राहणे आवश्यक असते. कर्तृत्ववान माणसं, वाचन, विविध कार्यक्रम, ओळखीच्या आसपासच्या लोकांकडून हे मोटिव्हेशन मिळत राहू शकतं.
सर्वप्रथम नजरेसमोर मोठे उद्दिष्टय़ ठेवणं गरजेचं असतं. त्यानंतर आतून व्यक्त होणारा आवाज ‘तुला हे जमणार नाही’, ‘तुला हे जमणार नाही’, तो दुर्लक्षित करावा लागतो. नेपोलियन हिल या सक्सेस समीक्षकाने आपल्या पुस्तकात व्यक्त केलेले हे वाक्य महत्त्वपूर्ण ठरतं. ज्या गोष्टीची मनात कल्पना केली जाते व जिच्यावर मनाचा पूर्ण विश्वास जडतो ती गोष्ट माणूस सहज साकारू शकतो. बरीच माणसं आपलं लक्ष्य साकारण्यास पुढे सरसावत नाहीत. कारण त्यांचं आतलं मन ती गोष्ट अशक्य आहे असे सारखे बजावत असते.
जी माणसं काहीतरी जबरदस्त आणि भन्नाट करून दाखवत असतात ती पूर्णत: झपाटून काम करीत असतात. स्वत:चं आगळंवेगळं अस्तित्व असायला हवं या विचाराने ते तप्त असतात. सर्वसामान्य जीवन जगायचं नाहीच हा ठाम निर्णय घेऊन ते वेडय़ासारखे त्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करतात. ज्या वेगाने त्यांच्या डोक्यात विचार पळत असतात त्याच वेगाने कृतीच्या विश्वात ते स्वत:ला पळवत असतात. जिथे जिथे ते जातात तेथे ‘तो आला त्याने पाहिले आणि सर्वाना जिंकले’ या आविर्भावात त्यांचं वावरणं असतं. अगदी हीच भूमिका घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. पाहतापाहता तुमच्या जीवनात इतकी स्थित्यंतरे घडतील की तुम्हाला अशक्य असे काही वाटणारच नाही.
जगात फक्त दोनच प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे नित्य स्वप्नं पाहत राहणारी आणि दुसरी म्हणजे आपली स्वप्नं खरी करण्यासाठी स्वत:ला वाहून घेणारी. आपल्या स्वप्नांच्या माध्यमातून करिअरची हवी ती उंची गाठण्याची निवड ही निसर्गाने माणसाच्या हाती सुपूर्द केलेली असते.

फक्त आपल्या स्वप्नांच्या साकारण्यावर आणि मुख्य म्हणजे स्वत:वर माणसाला विश्वास असायला हवा. जी जी काही असामान्य कामगिरी या जगाच्या पाठीवर झाली आहे ती केवळ आणि केवळ त्या लोकांमुळे जे वेळोवेळी स्वत:ला सांगत राहिले, बजावत राहिले की, तू हे करू शकतोस. मग कोणतं असं मोठं लक्ष्य येत्या वर्षांत साध्य करण्यासाठी तुमच्या नजरेसमोर आहे, कारण जे ठरवणार ते साकारण्याची ताकद तुमच्यात आहे.
एका सीडीमध्ये असलेलं बाबासाहेब पुरंदरेचं ते वाक्य बरंच काही सांगून जातं. ‘‘वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात.’’ साच्यातले तेच तेच साकारणारे कळपांच्या कळप असतात. पण जगावेगळं साकारण्याची इच्छा असणारी मोजकीच माणसं आढळतील. डोळे बंद करून घेत एका शांत ठिकाणी स्वत:लाच विचारा, ‘‘तुझा ठसा उमटेल असं कोणतं कार्य तू करण्याचा निर्धार करतो आहेस?’’ आयुष्यभरातली झोप उडवत स्वत:ला जागं करू शकणारी उत्तरं मिळू शकतील. एका कागदावर जे जे सुचत जाईल ते लिहून काढा.
जी मोठी गोष्ट साकारण्याचा निर्धार तुम्ही केला असेल त्याचे एखादे प्रतीक निश्चित करा. उदाहरणार्थ, अंगठी, घडय़ाळ, पेन, की-चेन, इत्यादी. रोजच्या रोज ते प्रतीक पाहिल्यानंतर ते लक्ष्य मनाला आठवत राहील आणि म्हणूनच ते नजरेसमोर राहील. ते ध्येय छोटय़ा कार्डावर लिहून, ते स्वत:जवळ बाळगून स्वत:च्या डोळ्यांना दाखवत राहा. तेथून ते तुमच्या मेंदूवर व पर्यायाने अंतर्मनावर खोल ठसा उमटवेल. त्यामुळेच आकर्षण शक्तीचा आधार घेत, प्रसंग तुमच्या अपेक्षेनुरूप घडत जातील. तुम्हाला योग्य माणसं भेटत जातील व पाहतापाहता यश सहज सुंदर वाटू लागेल.
मोठी माणसं या सरळ सोप्या तंत्राचा नित्य वापर करतात. साध्या कागदावर ते आकडेमोड करीत राहतात, कॅल्क्युलेटरवर खेळतात आणि यशाचं नियोजन व कृती अगोदर कागदावर उतरवतात. यश मिळवून देणाऱ्या बऱ्याच गोष्टी फारच सोप्या असतात आणि सोप्या जाणवतात. म्हणून माणसाचा त्यावर विश्वास नसतो. काहीतरी कठीण व वळणावळणाचं  मिळालं तर ते योग्य आहे या चुकीच्या जाणिवेत तो राहतो. मनाशी ठरवलेली कोणतीही गोष्ट साकारण्याचे सामथ्र्य त्या माणसातच दडलेले असते हे लक्षात असू द्या.
विमान उड्डाण करण्यापूर्वी वॉर्म-अपसाठी एक विशिष्ट अंतर कापत असते. अजूनही नवीन वर्ष सुरू होण्यास अर्धा महिना शिल्लक आहे. या १०-१५ दिवसांकरिताचे एखादे लक्ष्य ठरवून ते मिळविण्यासाठी धजा. चांगली टीम क्रिकेट टेस्टमध्ये दिवसभरात पावणेतीनशे धावा करते. त्याहीपेक्षा कमी वेळेत एकटय़ा सेहवागने २८५ धावा करण्याचा विक्रम केला. तुम्हीदेखील पुढल्या वर्षी भव्यदिव्य करण्यापूर्वी २००९ मध्येच एखादं विशेष लक्ष्य निश्चित करून साकारू शकता. अशक्य असं काहीच नाही आणि नवीन वर्षांपूर्वीचा चांगला वॉर्म-अप होईल. म्हणतात ना शितावरून भाताची परीक्षा! एकदा हे केलंत की मग पाहाच. नवीन वर्षांत जग जिंकण्याची तुमची मनाची तयारी होऊन जाईल.
« Last Edit: December 22, 2009, 09:39:38 AM by gaurig »

Marathi Kavita : मराठी कविता