सकाळी मिनीची शाळेची जायची घाई. इतस्तत: पडलेल्या वह्य़ा आणि पुस्तकं तिच्या दप्तरात भरून देता देता दप्तरातून सुवास आला.
आंघोळीच्या साबणाच्या जाहिरातीत अभिषेकबरोबर आपणही ऐश्वर्याकडे ओढले जातो तसा मी दप्तरात कुतूहलानं डोकावलो. मिनीनं ‘पोस्ट इट’सारखं गुलाबी कागदाचं पॅड काढून माझ्या हातावर ठेवलं. म्हटलं, ‘‘हे टिपकागद कशाला?’’
तिनं कींव करत मला सांगितलं, ‘‘अहो बाबा, हे ‘पेपर सोप’. आज ‘हँड्स वॉशिंग डे’ आहे शाळेत म्हणून घेऊन यायला सांगितलंय.’’
‘‘म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘थँक्स गिव्हिंग डे’, ‘फ्रेंडशिप डे’, ‘फादर्स डे’, ‘मदर्स डे’, शोभा डे, मन्ना डे.. हां याचं गाणं लागत नाही असा एकही ‘डे’ नाही,.. तसा हा ‘हँड्स वॉशिंग डे’ का?’’
‘‘अहो शोभा डे, मन्ना डे.. हे काय हे मध्येच?’’ मिनीची आई रजनी हसून म्हणाली.
‘‘..नाही म्हटलं. डे बाय डे हे नवीन ‘डे’ कळू लागलेत नाही?’’
माझ्या या बोलण्याकडे कानाडोळा करून, मिनीच्या दप्तरात डबा ठेवता ठेवता रजनी चीत्कारली, ‘‘अगं मिनी, ही जीभ घासणी कशी आली दप्तरात?’’
‘‘अगं बोटं जिभेला लावून वहीची पानं पलटायची सवय असते ना मुलांना, म्हणून जीभही स्वच्छ करायला सांगितलं असेल.’’ रजनीचा चेष्टेचा मूड नाही हे पाहून मी या वाक्यावर जीभ चावली. ‘‘पण एवढे पेपरसोप?’’ मी.
‘‘प्रत्येक तास झाला की हात धुवायला जायचं, असं सांगितलंय मोठय़ा बाईंनी.’’ मिनीच्या या माहितीवर प्रत्येक तासानंतर रांग लावून नळावर जाणारी मुलं-मुली आणि इतस्तत: वाऱ्यावर उडणारे पेपर सोप असं चित्र दिसू लागलं.
आंतरराष्ट्रीय हात धुण्याचा हा दिवस सगळीकडे साजरा झाला. नुकत्याच झालेल्या निवडणूक प्रचारात शिणलेल्यांचे हात, निवडून आलेल्यांनी मदिरेनं धुऊन दिले. मंत्रिमंडळात वर्दी लागण्यासाठी ‘भाऊगर्दी’ केलेल्यांनी श्रेष्ठींचे हात सोन्याच्या पाण्याने धुऊन दिले.
आमच्या ऑफिसमध्येही ‘हात धुवा दिवस’ साजरा झाला. जुन्या धारिका (फाईल्स) हाताळता हाताळता शंभर वेळा हात धुवावे लागले. गलगली बाईंनी उघडलेल्या धारिकेत मेलेलं झुरळ सापडल्यामुळे त्या एवढय़ा जोरात मागे होऊन ओरडल्या की डिंकाची उघडी बाटली उपडी होऊन डिंकाची धार लिफाफे चिटकवणाऱ्या सखारामाच्या हातावर आणि शेजारी बसलेल्या कुलकण्र्याचा गरम चहा त्यांच्या हातावर कलंडून पँटवर सांडला. या सावळ्या गोंधळामुळे त्या तिघांचा उरलेला दिवस हात धुण्यात गेला. करकरेंच्या खिशावर बसमधून येताना एकानं आपला हात साफ केल्याचं कळलं.
संध्याकाळी घरी गेल्यावर हँड्स वॉशिंग डेचं साजरीकरण ऐकण्यात जेवणासाठी हात धुतल्यापासून जेवण झाल्यावरच्या हात धुण्यापर्यंत वेळ गेला. टीव्हीवरच्या ‘कमाल’नं कमालच केली. जेवणाच्या टेबलावर समोरच्या पुरुषपात्राच्या पौरुषविरोहित हातवाऱ्यांवरून त्याला वाटलं हात धुवायला पाणी पाहिजे, बसल्याजागी; म्हणून कमालनं त्याच्याकडे पाण्याची बाटलीच फेकली. ‘हँड्स वॉशिंग डे’चाच हा भाग असावा असंच वाटलं. पण शेट्टीही शिट्टी वाजवल्यासारखी किंचाळली, तेव्हा तीही बाटलीने जखमी झाल्याचे वाटून त्यातल्या इतर पात्रांनीही कमालला त्या शोमधून साफ करण्यासाठी आपापले हात धुऊन घेतल्याचं समजलं. जेवणाचा हा रिअॅलिटी शो संपल्यावर रजनीनं तिच्या मैत्रिणीची रिअल लाईफ स्टोरी ऐकवत ऐकवत हात धुतले.
‘‘रेवती सांगत होती, शी किनई वॉश्ड हर हँडस् फ्रॉम नं हर यंग मेड सर्व्हट.’’
‘‘म्हणजे..?’’ मी न उमजून विचारलं.
‘‘..म्हणजे मोलकरणीला काढून टाकलं आणि तिच्याजागी एका काकूबाईला ठेवलं.’’
‘‘ते का?’’ मी हात धुता धुता विचारलं.
‘‘रेवतीचा नवरा त्या तरण्या बाईवर ‘शायनिंग’ करू लागला होता असा तिला संशय आला म्हणून.’’
मी म्हटलं, ‘‘तुलाही आजचा विनोदी किस्सा सांगू का?’’
‘‘म्हणजे मी काय विनोद सांगितला तुम्हाला..!’’ रजनी.
‘‘ते जाऊ दे. ऐक ना! मी आज आमच्या ऑफिसच्या कंपूबरोबर जेवायला गेलो ना, तर जेवल्यावर हात धुवायला गेलो तर एक माणूस वॉश बेसिनवरनं हलायलाच तयार नाही लवकर. मी ताटकळलो. बघतो तर हा आपला वॉश बेसिनवरनं हात फिरवतोय. विचारलं तर म्हणतो कसा, ‘देखो भाई, सामने लिखा है नं, ‘वॉश बेसिन’, वही कर रहा हूं..!’ हे सांगून मी एकटाच जोरात हसलो. रजनी हाताचे दिवे ओवळत उद्गारली, ‘‘काय पण शिळ्या जोकला हात घातलाय..! धुऊन या ते हात आता पुन्हा..