साधारण दोन वर्षपूर्वी सांगली येथे " ८१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन " संपन्न झाले होते या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच्या काही आठवणी......
मराठी साहित्य संमेलन म्हणजे मराठी लेखक,वाचक,नवकवी,नवलेखक यांना पर्वणीच असते.विविध ग्रंथ,कादंबरी, लघु कथा, बाल साहित्य यांची रेलचेल असते, सांगली येतील हे संमेलन त्याला अपवाद कसे ठरेल.....
असंख्य तरुण-तरुणी,विद्यार्थी, लहान मुले एवढेच काय साठीतले वृद्ध सुद्धा संमेलनात आले होते. असंख्य प्रकाशकांच्या लक्षावधी पुस्तकांनी भरलेल्या दालनातून हे लोक मुक्तपणे फिरत होते .
माझ्या पिढीत आणि आजच्या पिढीत खूप अंतर आहे.
आज ची तरुण पिढी ( ई - जनरेशन ) जी अब्दुल कलाम, पाउलो कोएलो, सुधा मूर्ती यांची -विंग्स ऑफ फायर, अल्केमिस्त, द माजिक ऑफ थिंकिंग बिग, द सिक्रेट या सारखी पुस्तके वाचणारी पिढी संमेलनात तेवढ्याच उत्सुकतेने विचारत होती, लक्ष्मण मानेंची "उपरा" कादंबरी आहे का? , व. पु.चा 'रंगपंचमी" कुठे मिळेल? , मी ज्यांची पुस्तके वाचली (आज हि वाचतो) अश्या पु. ल. देशपांडे, भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील, बाबा कदम, नारायण सुर्वे, कुसुमाग्रज, शिवाजी सावंत यांची असंख्य पुस्तके मुले प्रेमाने हातात घेत होती , एखादं पान उघडून वाचत होती, शक्य असल्यास विकत घेत होती...
एक गोष्ट मला जाणवली.....
आजची पिढी वाचन प्रिय नाही हा पसरलेला समज किती निरर्थक आहे...
तसा पाहायला गेलं तर सांगलीचा भाग हा मुख्यत्वे करून शेती चा आहे. इथे बळीराजा राहतो. दिवसभर शेतात कष्ट करून आपली उपजीविका करतो..इथल्या असंख्य लहान लहान खेड्यात राहणाऱ्या ह्या मुलांच्या मध्ये हि साहित्याची गोडी यावी कुठून ? ..
इथून जवळच माडगुळे हे गाव आहे.....
गजानन दिगंबर माडगुळकर ह्या नावाबरोबर नजरेसमोर येत ते " गीतरामायण", हे अण्णांनी ह्या माडगुळे येथील आपल्या " बामनाचा पत्रा" या घरात बसून लिहिले , याच मातीत बाबा कदम, कोल्हापूरचे शिवाजी सावंत वाढले..... साहित्याची ओढ हि तर ह्या मातीतच आहे...
महाराष्ट्रातील असंख्य लेखकांनी आपली वेदना या पुस्तकातून मांडली ( उपरा), कधी आपल्याला खूप हसवले( झेंडूची फुले, बटाट्याची चाळ..), कधी अंतर्मुख हि केले ( स्वर, वपुर्झा..) कित्येकदा रडवले सुद्धा... आपले जीवन समृद्ध करण्याच क्षमता हि साहित्यात आहे, पिढी दर पिढी साहित्य बदलेल पण त्याचा आत्मा तोच नाही का?
नाही तर " द माजिक ऑफ थिकिंग बिग " वाचणारी पिढी हृदय पिळवटून टाकणाऱ्या ' झाडाझडती' च्या वाटेला जातीलच कशाला?
असंख्य पुस्तके या २-३ दिवसात खपली... लाखो लोकांनी इथे भेट दिली.... असंख्य लेखक - वाचकांना एकत्र आणणाऱ्या या व अशा साहित्य संमेलना बद्दल माझ्या मनात कायम एक आपुलकी वाटत आली आहे......
विरेंद्र पाटील,
सांगली.