दुकान नंबर ६ व ७
एक नंतरही चालु असलेलं दुकान शोधता शोधता बराच वेळ गेला. पण शेवटी मी एक होजीअरीचं दुकान शोधलंच. ह्यावेळेस मी ठरवलं होतं की मिळेल त्या रंगाची, डिझाईनची, किमतीची लुंगी घ्यायचीच.
मी : मालक, लुंगी मिळेल का ?
होजीअरीन : काय राव तुम्ही ? होजीअरी मध्ये येऊन लुंगी मिळेल का म्हणुन विचारताय ? एक वेळ चेन्नईमध्ये मिळणार नाही पण इथे मिळणारच.... हॅ...हॅ...हॅ... !
( मी त्याच्या बरोबर त्या जोकवर हसण्याच्या मनःस्थितीत नव्हतो.)
मी : ....नाही दिड वाजतोय म्हणुन विचारलं.
होजीअरीन : मग? दिड वाजता लुंगी विकल्यानी काय अपशकुन होतो का ? हॅ...हॅ...हॅ... !
मी : नाही... बहुतक लोकांचं दुकान १ वाजता बंद होतं. ४ ला परत उघडतं.
होजीअरीन : आम्ही धंदा करायला आलोय झोपा काढायला नाही. हॅ...हॅ...हॅ... !
मी : व्वा.... मग एक लुंगी द्या.
होजीअरीन : कसली पाहिजे ? (इथे तो हसला नाही. म्हणजे त्याला न हसता बोलता येत होतं)
मी : कसलीही द्या.
होजीअरीन : रंग ?
मी : कुठलाही चालेल.
होजीअरीन : चेक्स चालेल ?
मी : पळेल.
होजीअरीन : लुंगी घालुन पळु नका पडाल.... हॅ...हॅ...हॅ...
मी :द्या २ लुंग्या.
होजीअरीन : ठिक आहे. पण इथे नाहीये.
मी : अहो, आत्ता तर म्हणालात की होजीअरी मध्ये येऊन लुंगी मिळेल का म्हणुन काय विचारताय....
होजीअरीन : म्हणजे ह्या दुकानात नाही आमच्या त्या बाजुच्या दुकानात लुंग्या ठेवतो. इथे फक्त बनियन, अंडरवेअर आणि शेरवानी ठेवतो. लुंग्या तिकडे... तुमचा साईज काय आहे ?
मी : लुंगीचा ?
होजीअरीन : अंडरवेअर-बनियनचा...(हॅ...हॅ...हॅ...) ....आलाय तर घ्या दोन जोडी....
मी : नाही, नको. आधि लुंगी घेतो.
होजीअरीन : आधि लुंगी कशी ? आधि अंडरवेअर-बनियन मग लुंगी. बाहेरुन अंडरवेअर घालायला आपण काय सुपरमॅन नाही. हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ...
मी : कुठय तुमचं बाजुचं दुकान... ?
होजीअरीन : बारक्या, ह्यांना आपल्या शेजारच्या दुकानात टाकुन ये....
दुकानदारांचं 'टाकुन बोलणं' नेहमीचंच पण हे 'टाकुन येणं' जरा नविनच होतं. बारक्या आणि मी त्या बाजुच्याच दुकानाकडे सुमारे १५ मिनिटं चालत राहिलो आणि जाता जाता कुठल्यातरी बारीक बोळात बारकु महाराज अंतर्धान पावले. त्या सातव्या दुकानापर्यंत मी पोहचु शकलो नाही. मग पुन्हा परत ह्याच दुकानात आलो तर शटर डाऊन...
त्यावर लिहलं होतं... दुपारी ०१.३० ते ०५.३० बंद ! (हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ... हॅ...हॅ...हॅ...)
ह्यावेळेस मी गुपचुप दुकानाबाहेरच होतो.
दुकान नंबर ०८
भुकेल्या पोटी तहानेने व्याकुळ झालेलो लुंग्याधिर असा तो मी ४ वाजेपर्यंत वणवण भटकत राहिलो. एक बरं आहे की आशा नेहमी अनुभवावर मात करते त्यामुळे आयुष्य थांबत नाही. मी पण न थांबता पुढच्या दुकानासमोर मानसिक तयारी करत उभा राहिलो. मी माझे तोंड उघडायच्या आतच दुकानातुन एक हाक आली.....
"बोला मालक...."
(.....तुम्हाला सांगतो टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. ते दस्तुरखुद्द दुकानाचे मालक आणि मी एक क्षुद्र गि-हाईक.... माझी पायरी ओळखुन मी त्यांच्या दुकानाची पायरीही चढलो नव्हतो.... ते स्वतः आणि आपण स्वतःहुनच मला हाक मारताहेत...? मला बोलावताहेत, काय हवय ते विचारताहेत....? मला मालक म्हणताहेत...? खुप गहिवरुनच गेलो हो मी.... काय बोलावं सुचेनाच.
मग मी ते मायेचे दोन शब्द कानात भरुन घेतले, ते हर्षोन्मादाचे कढ आवरले, खिशातुन रुमाल काढला आणि डोळे पुसुन आत गेलो.)
दुकानदार : बोला मालक....
मी : मला लुंगी हवीये.
दुकानदार : वर बांधणार का खाली ?
(मी अवाक. वर का खाली म्हणजे काय ? त्यांना कंबरेच्यावर... ढेरीच्याखाली.. असं काही उत्तर अपेक्षित होतं का काय ? किंवा ते आपल्यात मुंजीमध्ये बटु बांधतो तसं मागुन पुढे आणि मग क्रॉस करुन परत मागे नेऊन मानेमागे गाठ असं लुंगी बांधण्याची काहीतरी फॅशन वगैरे आली असणार. पण माझ्या संपुर्ण देहाचा घेर पाहता किमान पावणेदोन तरी लुंग्या लागणार आणि वर आरशात मीच मला दिसायची भिती....)
मी : नाही, वर नाही.... मी खालीच बांधेन... नेहमीसारखी... साडीसारखी गोल गोल.... पण वरती पदर वगैरे घेणार नाही.
दुकानदार : मग खाली मोठ्ठी झालर देऊ का... ब्राईट निळ्याला खाली केशरी रेंगाची ? आणि चंदेरी रंगाची पट्टी असेल एकदम बारीक खाली....
(मी पुन्हा आवाक. एक तर ब्राईट निळी लुंगी... त्यात त्याला मोठ्ठी झालर...त्यात ती केशरी रंगाची ?? चेंदेरी पट्टी

मला ओळखणारी आसपासची २६४ माणसं मला बघुन लोळुन लोळुन हसताहेत, असं मला दिसायला लागलं.)
मी : नाही हो... असलं काही नको. एकदम साधी. पांढरी आणि सोबत बरा रंग.. चेक्स वगैरे दाखवा किंवा...
दुकानदार : चालेल आणि एक काम करु... .
(तो महान इसम मला काय हवंय हे न ऐकताच चालुच झाला होता....)
एक काम करु.... ....खालुन चुण्या घेऊन घट्ट बांधु आणि वर ओपनच ठेऊ... असा व्ही शेप....
(मी वच्याक... मला पुन्हा ते भयानक दृश्य दिसायला लागलं.... माझ्या पायाला खालुन लुंगी घट्ट बांधली आहे आणि वरुन ओपनच आहे. पण पडु नये म्हणुन मी दोन टोकं धरुन उभा आहे. पाऊस पडतोय आणि 'दिनवाणा मी' लुंगीत गारा वेचतोय..............)
केवीलवाणा मी : मालक तुम्ही फक्त लुंगी दाखवा. ती कशी बांधायची मी बघेन....
दुकानदार : दिवसा का रात्री ?
रडवेला मी : तुम्ही फक्त लुंगी दाखवा. ती कधी बांधायची मी बघेन मालक....
दुकानदार : तुमच्यासाठीच का पावण्यांसाठी ?
हताश मी : तुम्ही फक्त लुंगी दाखवा हो प्लीज.
दुकानदार : बर किती दिवस ठेवणार ?
निराश मी : अहो... तुम्ही लुंगी दाखवा ना प्लीज. मला दोन लुंग्या हव्यात. माझ्यासाठीच. रात्री घालायला. किती दिवस ठेवणार, ह्याच काय उत्तर देऊ मालक ?.... फाटेपर्यंत ठेवेन... म्हणजे जवळ ठेवेन. अंगावरुन रोज सकाळी काढणार..... तुम्ही लुंगी दाखवा ना प्लीज.
दुकानदार : बर.. ठिक आहे. तुमचं नशिब जोरावर आहे राव. आजच नविन माल आलाय. तिनंच लोकांनी वापरलाय... जवळजवळ ब्रॅंड न्यु !!
(जवळजवळ ब्रॅंड न्यु.... हे शब्द कानात घुमायला लागले. माझीच लुंगी आधि वापरलेले तुळु, पंजाबी आणि मद्रासी असे पुर्ण, अर्ध्या आणि पाव लुंगीतले तीन जण मला दिसायला लागले.) मी त्या दुकानातुन बाहेर पडणार इतक्यात.... शक्य तितक्या हिडीस आवाजात मालक हंबरले...
मालक : ए सोपान्या.... गि-हाईक बघ....
गि-हाईक बघ.................? गि-हाईक बघ म्हणजे मग इतका वेळ काय चाललं होतं ? हा प्रश्न मला पडणार इतक्यात मालकांनी कानाचा ब्लु-टुथ काढला आणि फोन बंद केला.... ! ते ब्राईट निळी, खालुन चुण्या, किती दिवस ठेवणार हे सगळं दुस-याच कोणाला तरी होतं.... मी गुपचुप सोपानरावांसमोर झोळी पसरुन उभा राहिलो....
सोपानराव : हं.... ?
मी : मला लुंगी हवीये.
सोपानराव : असले लुगेसुंगे आयटम आमी इकत न्हाइ.
मी : ??
सोपानराव : चष्म्याचं दुकान सम्होर आहे.
मी :

?
सोपानराव : आम्ही निस्त मंडपाचं कापड, ड्येकोरशन, मांडव असले आयटम इकतो.
मी : अहो पण, बाहेर तर तुम्ही त्या बोर्डावर एका लुंगी घातलेल्या माणसाचं चित्र लावलय.
सोपानराव : हा मंग... आमचे मोठ्ठे मालक हेत ते... अन शेजारच्या रेनकोट-छत्रीच्या दुकानावर एका साधु म्हाराजांचा फोटु लावलाय म्हनजे त्यांनी काय लंगोट इकायचे काय ?
त्या अशुद्ध माणसाच्या तर्कशुद्ध बोलण्यानी बेशुद्ध होऊन.... मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.
दुकान नंबर ९
मी दिसेल त्या दुकानात डोकाऊन समोरचा माणुस माझा किती अपमान करेल ह्याचा अंदाज घेत हिंडत होतो. इतक्यात एका दुकानात मला एक मारवाडी भाभी बसलेल्या दिसल्या. मी आत शिरलो.
मी: भाभी, मला एक लुंगी हवीये.
तर एकदम.... आगीचा बंब जाताना जसा ठणठणाट होतो तसाच पण जरा जास्तच गंजलेल्या घंटेचा असा बसका आवाज झाला. मी इकडे तिकडे पाहिलं तर ती गाडी दिसलीच नाही. मग कळालं की भाभी बोलताहेत.
भाभी : थे एमएसईबीरो बील देवाने आया हो काई.... ?
(माझी भंबेरी उडाली. जिथं मी हिंदीचीच चिंधी करतो तिथं ही बया तर मारवाडी का राजस्थानी बोलत होती.)
मी : हिंदी बोलेंगे क्या ? गुजराती, राजस्थानी मेरे पल्लु नही पडती....
भाभी : (तिनी एक राजस्थानी कलाकुसर केलेली साडी हातात ठेवली आणि म्हणाली...) गुजराथनी साडीमाटे राजास्थानरी कलाकुसरकराडा पल्लु !
मी : आपका कुच गैसमज होगयला हय.. मेरे को घरमे डालने के लिये एक, दो लुंग्या चाहिये थ्या....
ती आत गेली आणि सतरंज्या घेउन आली. मग आम्ही दोघं 'डम्ब-शरात्स' खेळायला लागलो. मी तिला खाणाखुणा करुन सांगायला लागलो की असं पोटाभोवती बांधायचं, कंबरेइतक्या उंचीचं असं... वगैरे...
चनीयाचोळी, सिलेंडर, केरसुणी, छ्त्री, पोतं असे वेगवेगळे ट्राय मारल्यानंतर ती मान हलवत 'ह्यां ह्यां ह्यां' असं रेकत दुकानाबाहेर गेली आणि १० मिनिटांनी शेजारच्या दुकानातुन माझ्या कंबरेच्या उंचीचा पाणी साठवायचा प्लॅस्टीकचा ड्रम घेउन आली.
मी खचलोच. मला पडलेले यक्षप्रश्न असे -
१. मला पाणी साठवायचा प्लॅस्टीकचा ड्रम हवा जरी असता तरी मी कपड्यांच्या दुकानात का येईन ?
२. कपड्यांच्या दुकानात आलोच तर माझ्या पोटाकडे हात दाखवुन ड्रम का मागेन ?
३. मी चेह-यावरुन एमएसईबीचं बील द्यायला आलोय, असं वाटतं का ?
४. काही बायकांचे आवाज पुरषांसारखे का असतात.... ?
५. काही पुरुष मंडळी, मराठी किंवा हिंदी न येणा-या बायकांना दुकानावर का बसवतात ?
अनुत्तरीत मी : भाभी, आपका मिस्टर बाहेर गया है क्या..? ये दुकान मे कोई दुसरा मर्द वगैरा नही है क्या..? आप अकेले हो क्या ?
तिनी त्याचा काय अर्थ काढला काय माहित पण तिनी कोणलातरी फोन केला. अचानक तिचा नवरा आला आणि तिनी त्याला काहितरी कळवळुन सांगितलं. तो गरगरीत मारवाडी माझ्याकडे जळजळीत नजरेनी पाहायला लागला. ते तप्त वारं माझ्या दिशेनं वाहतय हे पाहुन मी......
....मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.
दुकान नंबर १०
आता बास झालं असा विचार करुन घरी जाणार होतो पण इतक्या अपमानानंतर मी साधि लुंगी घेऊ शकलो नाही हा अपमान मला सहनच होईना. सहज घड्याळात पाहिलं तर ०३.५५ वाजुन बराच वेळ झाला होता म्हणजे त्या दुकान नं ५ मधल्या 'माणसा'ची वामकुक्षी झाली असणार.
खरं तर ते दुकान खुप लांब होतं पण मी डगमगलो नाही. डोळे फिरलेले पण नजर शाबुत, डोकं फिरलेलं पण विचार काबुत.... पाय बोंबलत होते पण दुकान बोलावत होतं... अंग ठणकत होतं पण ध्येय खुणवत होतं.... शेवटी मी त्या दुकानात पोहचलोच...
मी हश्श हुश्श करत तिथल्या एका स्टूलवर बसलो. खुप घामाघुम झालो होतो म्हणुन त्या वाद घालणा-या इसमाला पंखा लावायला सांगितला तर म्हणाला की आम्ही संध्याकाळी ५ नंतर पंखा लावत नाही. मी कारण विचारलं नाही, वादही घातला नाही. चुकुन मिळालंच तर बघावं म्हणुन पाणी मागितलं...
मी : जरा पाणी मिळेल का ?
तो : ए छोटु... जरा दोन स्पेशल कोकम सरबत घेऊन ये. (म्हणजे पाणी पण मिळणार नव्हतं तर...)
मी : आता तरी दुकान उघडं आहे का ?
तो : हे तुम्ही बाहेरुन विचारलं असतं तर 'हो' म्हणालो असतो, पण तुम्ही आत बसुन विचारता आहात. हे म्हणजे..
मी : मी तुमची माफी मागतो ह्या प्रश्नासाठी. पण मला लुंगी हवीये. दाखवता का ?
तो : आम्ही तयार कपडे विकत नाही. फक्त कापड विकतो. लुंगीच कापड देऊ शकलो असतो पण त्याची किरकोळ विक्री आपण करत नाही. तागाच्या तागा तुम्हाला घ्यायला लागेल.
मी : मला काय सगळ्या सोसायटीला लुंग्या वाटायच्या नाहीयेत. आणि हे सांगितलं का नाही मला ?
तो : मग मी हे काय करतोय असं तुम्हाला वाटतय ?
मी : म्हणजे मगाशी का नाही सांगितलंत ?
तो : कधी ?
मी : मी आलो होतो तेंव्हा. १२.३० ला...
तो : तुम्ही ०१.०० वाजता आला होता !
मी : हं... तेच ते... तेंव्हा का नाही सांगितलंत ?
तो : कारण तेंव्हा तुम्ही माझं गि-हाईक नव्ह्ता. दिसेल त्याला "आम्ही तयार कपडे विकत नाही. फक्त कापड विकतो." असं सांगत बसायचं का आम्ही ?
मी : दिसेल त्याला नाही पण निदान जो दुकानात येईल त्याला तरी ?
तो : मग सांगितलं की तुम्हाला आत्ता...
मी : आत्ता नाही हो... तेंव्हा...
तो : तेंव्हा ०१.०० वाजला होता...
मी गर्भगळीत होऊन बसुन राहिलो. मी पुन्हा एकदा वादविवादात हरलो होतो. पुन्हा एकदा पदरी निराशाच पडली होती. इतक्यात छोटु दोन कोकम सरबत घेऊन आला. मग त्या दोघांनी सरबत पिलं आणि....
...आणि मी गुपचुप दुकानाबाहेर पडलो.
दुकान नंबर ११
थोडा वेळ शांत डोळे मिटुन बसलो एका दुकाना बाहेर. मग उठलो आणि नविन जोमाने लुंगी शोधायला लागलो. शेवटी मला ते दुकान सापडलंच. तिथे लुंग्यांचा एक वेगळा सेक्शन होता. मी जाऊन उभा राहिलो तर त्या सेल्समननी मला तिन वेगवेगळ्या रंगांच्या, त्यातल्या प्रत्येकातल्या वेगवेगळ्या तीन डिझाईन्सच्या आणि त्यात वेगवेगळ्या तीन किमतीच्या अशा सुमारे २६-२७ लुंग्या दाखवल्या.
मला २ पसंत पडल्या आणि मी भाव विचारला तर तो म्हणाला की.....
"नववर्षाची सूट वजा करुन दोन लुंग्यांचे ९० रुपये." मी आनंदाने नाचुन पाकीटातुन ९० रुपये काढुन त्या दुकानदाराला दिले तर.....
......तर त्याच्या डोळ्यात पाणी ! मग तो भिकारी मला म्हणाला की "देव, तुमचं भलं करो. आज काल कोण देतय ९० रुपयांची भीक ? "
मी खडबडुन जागा झालो. अजुनही त्याच दुकानाबाहेर होतो. पण खुप उशीर झाला होता. फाटकी का होईना पण तो लुंगी घातलेला भिकारी दूर गेला होता.... माझे ९० रुपये घेऊन.
स्वप्न फुकट असतात हि गोष्ट आज खोटी निघाली. पैसे गेल्याचं दुःख नव्हतं, लुंगी मिळाली नाही ह्याचा त्रास होत होता. आता एक शेवटचं दुकान बघायचं, नाहीतर 'ते' करायचंच असं ठरवलं.... त्यात खुप मोठी रिस्क होतीच पण आता प्रश्न इभ्रतीचा होता......
दुकान नंबर १२
मी रस्त्याच्या ह्या बाजुला होतो. ते कपड्यांचं शेवटचं दुकान त्या बाजुला होतं. मध्ये रस्ता आणि रस्त्यावर गाड्यांची, विक्रेत्यांची आणि माणसांची तुफान गर्दी... घड्याळात पावणेनऊ झाले होते म्हणजे अजुन १५ मिनिटांनी ते सगळे 'माणुस' असल्यामुळे जेवायला, झोपायला जाणार....
मी विजय दिनानाथ चौहानसारखं 'अग्निपथ अग्निपथ' असं म्हणत त्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत शेवटी त्या दुकानापर्यंत पोहचलोच. तिथंच त्या दुकानाबाहेर पदपथावरुन त्या जोखमीच्या पण खुप कामाच्या वस्तुची खरेदी करुन आत शिरलो.
आयुष्याविषयी कमालीची विरक्ती वाटावी असे सगळ्यांचे चेहरे होते. कुणीही माझी दखल घ्यायला तयार नव्हते. मी आत गेलो. एकच प्रय