Author Topic: थर्ड आय : तुमचं आमचं सेम असतं?  (Read 1437 times)

Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
पायात जाडजूड, घट्ट लेसचे शूज, अंगावर अ‍ॅसिड वॉश्ड जीन्स, कमरेवर भला मोठ्ठा बेल्ट, कमरेवरच्या उघडय़ा शरीरावर असंख्य मुलींची नावं लिहिलेली, डोक्यावर अगदी बारीक खुरटे केस आणि त्यातून कवटी चिरत जाते आहे असं वाटावं अशी एक वेडीवाकडी जाड रेष! अशा अवतारात तो आपल्या पिळदार दंडांचं आणि भरदार छातीचं प्रदर्शन करत कॉलेजच्या आवारात येतो. अचानक त्याच्याभोवती झुंबडगर्दी गोळा होते. गर्दी त्याच्या नावाचा जयघोष करत, टाळ्या वाजवत त्याच्याबरोबर चालत राहते. हा तांडा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये घुसतो. तिथे बसलेल्या असंख्य मुलींचा घोळकासुद्धा मग त्याच्या नावाचा जयघोष करायला लागतो आणि अचानक..

आणि अचानक तो एका मुलीजवळ थांबतो, एक पाय दुमडून गुडघ्यावर बसतो आणि कुठूनतरी जादू करावी तसं टप्पोरं गुलाबाचं फूल काढून तिला देतो आणि म्हणतो, ‘आय लव्ह यू!’ मग तीही क्यूट लाजते आणि म्हणते, ‘आय अ‍ॅम फ्लॅटर्ड!’ तो उठून उभा राहतो आणि आनंदाने किंचाळतो, ‘प्यार किया तो डरना क्या?’
हा कुठल्याही सिनेमाचा पार्ट टूचा सीन नाही. बिहारमधल्या कुठल्याशा एका गावात, व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने, एका प्रेमवीराची चाललेली ती खरी रिहर्सल होती. प्रेमभावना व्यक्त करायची ही अनोखी अदा असेल कदाचित! पण त्या मुलीला आवडली असेल ही अदा? असेलही कदाचित! कारण प्रेम आंधळं असतं म्हणतात ना? मग कोणी तरी कोणाच्या तरी फक्त
     
डोळ्यांवरच प्रेम करतं, तर कोणी हसताना पडणाऱ्या खळीवर, तर कोणी कोणाची हंसकी चाल बघून प्रेमात पडतं. कोणी त्यांच्या कवितांवर, कोणी स्वभावावर, कोणी एखाद्या कलानिपुण शैलीवर..
पण आता हेही सगळं जुनं झालं असेल नाही? आता प्रेमी युगुलं हुशार आणि व्यवहारी होत चालली आहेत. आता जोडीदाराचा बँक बॅलन्स बघितला जातो. घरात बहीण भावंडं- किती याचा सुगावा लागतोय का ते बघितलं जातं. व्यसन नसेल तर बावळटपणाचं लक्षण समजलं जातं. उघडय़ा छाताडावर अनेक मुलींची नावं लिहूनसुद्धा शेवटी मलाच गुलाबाचं फूल दिलं याचा अत्यानंद असतो.

कालानुरूप विचार बदलतात. अनेक गोष्टी बदलत असतील, तर प्रेम ही संकल्पनासुद्धा बदलत चालली असेल तर त्यात गैर काय? उलट असं म्हणणारे, विचार करणारेच मूर्ख आहेत असं म्हणायला हवं. काही काळापूर्वी प्रेमभंग झाला किंवा प्रेम विफल झालं, तर समाजात बोभाटा व्हायचा. आता सूडभावनेने मुडदे पडतात एवढंच ना? आणि त्याचे पडसाद चित्रपटात किंवा चित्रपटातल्या अशा सूडनाटय़ाचे पडसाद प्रत्यक्षात उमटतात एवढंच ना? प्रेम विफल झालं तर अ‍ॅसिडची बाटली वापरणं किंवा प्रेमात मोडता घालणाऱ्यांचे मुडदे पाडणं, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, असं एका कॉलेजच्या मुला-मुलींचं म्हणणं आहे आणि नुसतंच आश्चर्य नाही तर त्यात काही गैर आहे असंही त्यांना वाटत नाही.
यासाठी ही मुलं चक्क गजनी, बाजीगरसारख्या सिनेमांचे दाखले देतात; इतिहासातले, पुराणातले दाखले देतात. सीतेला रावणाने पळवली, तेव्हा म्हणे प्रेमापोटी लंका जाळलीच ना? किंवा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, त्यानंतर ‘महाभारत’ घडलंच ना? मग आता जे चित्र दिसतंय ते सूडभावना, बदला याचं. आणि पुराणात होतं ते काय? व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने, ‘पूर्वीची आणि आत्ताची प्रेमसंकल्पना’ याऐवजी ‘पूर्वीची आणि सध्याची सूडभावना’ या विषयावर चर्चासत्र किंवा निबंध स्पर्धा वगैरे कोणी घेत असतील तर आश्चर्य वाटू नये.

चित्रपटात नायकाचं प्रेम विफल झालं, नायिकेचा हकनाक जीव गेला, म्हणून संपूर्ण चित्रपटात सूटनाटय़ दाखवलं गेलं आणि नायक-नायिकेच्या नावाऐवजी, खलनायकाचं- ‘गजनी’चं नाव अजरामर करण्यात आलं किंवा नायकांनी सूड उगवून लढाई जिंकली (?) म्हणून प्रसिद्धी माध्यमांनी त्याला ‘बाजीगर’ ठरवलं. तसंच पुराणातल्या या सूडकथा ‘रावण’ किंवा ‘दुर्योधन’ या नावांनी प्रचलित व्हायला हव्या होत्या; रामायण आणि महाभारत नव्हे! असं म्हणणारे प्रेमवीरही आहेत.
नव्या पिढीचे हे ‘बदलते विचार’, कॅफे कॉफी डे किंवा बरिस्ताच्या अड्डय़ावर ऐकायला मिळतात. पण खरंच असं कुठे चर्चासूत्र असेल तर हे ‘बदलते विचार(?)’ मांडणारे आणि ऐकणारे, उद्या कदाचित त्यावर प्रबंध लिहून तो सरकारला सादर करतील किंवा तो आम जनतेच्या पुढे मांडतील.

बंगालच्या सरकारला कलीयुगाची खूप काळजी आहे. तरुणांसाठी ‘लव्हर्स पार्क’ बनवायचं त्यांचं स्वप्न आहे. सरकार चालवताना राजकारणात जोडो, तोडो, फोडोचा कम्युनिझम असला तरी इथे मात्र प्रेमवीरांची त्यांना केवढी काळजी आहे? भरवस्तीत, चारचौघांत, बसस्टॉपवर, ट्रेनमध्ये सिनेमागृहाच्या अंधारात प्रेमाचे उथळ चाळे करण्यापेक्षा एक निसर्गरम्य वातावरणात, ज्यांना जी उत्स्फूर्तता दाखवायची आहे ती दाखवा, असा कदाचित सरकारचा उद्देश असावा. चिमुरडय़ांनी फुलपाखरासारखं बागडावं, खेळावं म्हणून बालोद्याने निर्माण झाली. प्रमोद नवलकरांना ज्येष्ठांबद्दल काळजी वाटली, म्हणून आजी आजोबा किंवा नाना-नानी पार्क यशस्वीपणे उभी राहिली. मग प्रेम करणाऱ्यांनी काय गुन्हा केला? म्हणूनच बहुदा आता लैला-मजनू पार्क, वासू-सपना पार्क, बाजीराव-मस्तानी पार्क आणि मग हळुहळू गजनी पार्क, बाजीगर पार्क निर्माण होतील. राजेरजवाडय़ांच्या जमान्यात, मोगलांच्या कारकीर्दीतही ‘कुंजवनात’ प्रेम फुलायचेच ना? मग आताच एवढा गहजब का? या नव्या पिढीच्या प्रश्नाला उत्तर नाही.

‘आमच्या काळी असं होत’ं सांगणाऱ्यांना, ही पिढी विचारते, ‘मग आम्ही काय वेगळं करतो?’ तुमच्या काळी विवाहबाह्य संबंध होतेच. आम्ही ते फक्त उघडपणे ठेवतो. तुम्ही प्रेमगीत गात होतात; आम्ही लव्हसाँग्ज गातो. तुमच्या भावना तुम्ही कवितेतून, लेखातून, प्रेमपत्रातून व्यक्त करत होतात; आम्ही त्या उघडपणे व्यक्त करतो. देवाधिकांपासून राजेमहाराजे करत होते ती प्रीती! काळानुसार सगळं बदलत गेलं. त्यांच्याइतकी सात्विक प्रीती तुम्हाला जमली नाही म्हणून ते प्रेम? आणि आम्ही तुमच्या पुढे एक पाऊल टाकून धाडस करतो म्हणून ते लफडं किंवा अफेअर? खरं सांगायचं तर तुमचं आमचं सेम असतं ना?

पण कलीयुगातल्या प्रेमवीरांनो, आपल्या सोयीनुसार, कुठल्याही गोष्टीचे अर्थ बदलू नका. मनमानी अर्थ लावू नका. प्रेमगीत आणि लव्ह साँग्ज याची तुलना करु नका. ‘चंदनसा बदन, चंचल चीतबन, धीरेसे तेरा ये मुस्काना’ अशी हळुवार प्रेमगीतांची आणि ‘तेरी पॅन्ट भी सेक्सी, तेरा रुमाल भी सेक्सी’ अशा गीतांशी तुलना करु नका. तुमचं आमचं सेम असतं म्हणणाऱ्यांनो, पूर्वी उत्तान नाचावर रेव्ह पाटर्य़ा उघडपणे साजऱ्या होत नव्हत्या. प्रेयसी आपला शृंगार, आपल्या प्रियकरालाच उलगडून, उघडून दाखवायची; हल्ली मात्र प्रियकराला भेटायला जाताना प्रेयसीचा तो शृंगार जगाला उघडपणे दाखवतच प्रियकराकडे पोहोचायची प्रथा सुरु झाली आहे. रोमियो-ज्युलिएट मधला रोमिओ, आता स्वत:च अंगप्रदर्शन करुन रोड रोमियो व्हायला लागलाय. पूर्वीसारखी प्रेमपत्रांतून व्यक्त होणाऱ्या कवितांची जागा, आता सार्वजनिक मुताऱ्यांमधला आणि शौचालयातल्या भिंतींनी किंवा ट्रेन-बसमधल्या पत्र्यांनी पटकावल्या आहेत.

हे सर्व प्रकर्षांने जाणवतंय, पण याचा अर्थ या समाजातील प्रेमसंकल्पना, प्रेमभावनाच पूर्ण दूषित झाली आहे किंवा संपुष्टात आली आहे, असा अजिबात आरोप नाही. परंतु, त्या प्रेमसंकल्पनेला, भावनेला बदलत्या काळानुसार कुठेतरी कीड लागली आहे हे नक्की. प्रेमभावना, प्रेमसंकल्पना यांच्या व्याख्याच बदलत चालल्या आहेत, त्यामुळे त्याचा आदर बाळगणं, मान राखणं हेही आपोआप कमी होत चाललंय आणि त्यामुळे नातेसंबंधामधली दरी वाढत चालली आहे.

व्हॅलेंटाईन या कोण्या एक पाश्चात्य धर्मगुरुने प्रेम व्यक्त करण्याच्या भावनेला सर्वश्रेष्ठ मानलं. त्या प्रेमाचा आदर राखण्यासाठी प्रसंगी इतरांशी वितुष्ट घेतलं. त्यानिमित्त, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ जगभर प्रेमभावना, नव्याने जागृत होऊन त्याचा आदर राखावा अशी किमान अपेक्षा असते. कलीयुगातही अजून प्रेमभावनांचा आदर टिकवणाऱ्या इतरांनी जर सूडभावनेची ही कीड वेळीच खुडून काढली नाही, तर प्रेमापेक्षा द्वेषाच्या उदात्तीकरणाचे दिवस साजरे करण्याची वेळ आपल्यावर येईल. आणि मग आत्मा, आत्मप्रियता हरवलेल्या यंत्रमानवाचीच लोकसंख्या या विश्वावर साम्राज्य करेल..

Original Author : sanjaypethe@yahoo.com

Marathi Kavita : मराठी कविता


Offline harshad.net

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
Re: थर्ड आय : तुमचं आमचं सेम असतं?
« Reply #1 on: February 20, 2010, 11:15:59 AM »
sundar