Author Topic: माझी मराठी पुस्तक खरेदी  (Read 1199 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
माझी मराठी पुस्तक खरेदी
« on: February 16, 2010, 02:59:39 PM »
माझी मराठी पुस्तक खरेदी
                                          पुरुषोत्तम काळे, भोसलेनगर

बऱ्याच दिवसांनी लांबच्या प्रवासाचा योग आला. प्रवास म्हणजे सामानाची जमवाजमव इत्यादी ओघाने आलंच. प्रवास जरा परदेशी होता. जवळच. पाच तासांच्या अंतरावर. मी परदेशी प्रवास करताना आवर्जून मराठी पुस्तके घेऊन जातो, विमानात मिरवतो, वाचतो आणि मुक्कामाच्या ठिकाणी यजमानांना पुस्तक भेट म्हणून देतो. परदेशी, मराठी पुस्तकं इतक्‍या सहजपणे मिळत नाहीत आणि त्याची अपूर्वाई असते.

मी मला आवडलेल्या पुस्तकांची एक यादी केली. एक वाचक म्हणून मला लेखक आणि पुस्तकाचं नाव माहिती होतं. मोठ्या उत्साहाने मी जवळपासची पुस्तकांची दुकानं शोधू लागलो आणि धक्का बसला. मी राहतो गणेशखिंड रस्त्यावर, म्हणजे अगदीच गावाबाहेर नाही. संपूर्ण गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर, जंगली महाराज रस्ता, औंध, बाणेर, लॉ-कॉलेज रस्ता, संपूर्ण कर्वे रस्ता, टिळक रोड, पौड रोड इथे कुठेही प्रचलित मराठी पुस्तकाचं दुकान नाही. मराठी पुस्तक गाठायला एक दुकान गरवारे पुलाजवळ सापडले. त्यांचा नंबर मिळवला आणि दूरध्वनी केला, तेव्हा येणेप्रमाणे संवाद झाला.

"हॅलो'- मी.
"कोण?' दुकानातली महिला अत्यंत निरुत्साही!
"अमुक-तमुक दुकान का?'- मी.
"हो... काय हवंय'- महिलेचा जाड आवाज.
""मला काही मराठी पुस्तकं हवी आहेत.''- मी.
"प्रकाशक कोण ते सांगा!- महिला.
"ते मला नेमकं माहिती नाही.'- मी.
"मग पुस्तक कसं घेणार?' कंटाळलेला आवाज.
"आमचं प्रकाशन आहे का?'- महिला.
"माहिती नाही'- मी.
"बरं, मग विचारा.' अगदी ही ब्याद का विचारते आहे, असा आवाज.
"मीना प्रभूंची पुस्तकं आहेत का?'- मी.
"अगं कोणीतरी प्रभूंची पुस्तकं विचारतो आहे, आहेत का?' एकीने दुसरीला विचारलं.
"त्याला सांग विठ्ठल प्रभूंचे आहे, "विवाहितांचा वाटाड्या'; पण फक्त प्रौढांसाठी.' दुसरी.

मी फोन बंद केला. ही फोनाफोनी करण्यापेक्षा प्रत्यक्ष जावे, असा विचार केला आणि जवळच्या मॉलमध्ये गेलो. एकही पुस्तकाचं दुकान नाही. मराठी तर नाहीच. मग असे कळलं की इथल्या मल्टिप्लेक्‍समध्ये एका प्रसिद्ध पुस्तक दुकान मालिकेतील एक दुकान आहे. सर्व धुंडाळले, पण एकही मराठी पुस्तक नाही. मी काउंटरवर चौकशी केली. त्यांनी एक कोपरा दाखवला, त्यात मराठी भविष्य, वास्तुशास्त्र आणि सर्व बुवा मंडळींची चरित्रं होती.
"इतर पुस्तकं कुठं आहेत?'
"यहॉं नही है'- काउंटर.
"मग कुठे असतील?'- मी.
मालूम नही साब, मै फूड काउंटरसे हूँ, यहॉं का आदमी खाना खाने गया, मैं करके बैठा हूँ।
"आपण मराठी आहात का?'- मी.
"नही साहाब, मै ओरिया हूँ'
भारताच्या कोपऱ्यातून आलेल्या त्या माणसाला मी नमस्कार केला आणि बाहेर पडलो. मनात आलं, की किती जोशी, कुलकर्णी, पाटील, बर्वे, पाटकर इत्यादी ओरिसात जातील?
आता इलाज नाही म्हणून डेक्कन जिमखान्याकडे मोर्चा वळवला. इथे एक मराठी आणि दोन इंग्रजी दुकानं सापडली. त्यापैकी प्राधान्याने मराठी दुकानात शिरलो.
दुकानाच्या पायरीवर नवीन वर्षाच्या दिनदर्शिका आणि इंग्रजी नियतकालिकांचा ढीग पडला होता. पायऱ्या चढून गेलो. तेव्हा एक वृद्ध गृहस्थ दिसले. मी स्मित करून विचारलं, "ही पुस्तकं आहेत का?' त्यांनी त्यांच्या सहायिकेला सांगितलं. "अगं, त्यांना काय पाहिजे बघ!' आणि स्वतः दूरध्वनीकडे वळले, ही "अगं' ग्रामीण ढंगाने बोलणारी, चुणचुणीत तरुणी होती. "बोला साहेब!'
मी यादी पुढे केली आणि प्रश्‍नार्थक चेहरा केला. यादी बघून ती महिला म्हणाली, "कुठलं डिपार्टमेंट?'
"आँ'- मी. ""नाही अशी यादी करून खरेदीला येणारे म्हणजे कुठलंतरी डिपार्टमेंट किंवा सरकारी ग्रंथालय म्हणून विचारते.''
"नाही. मी प्रवासाला जातो आहे म्हणून!'- मी.
"यातलं एकही पुस्तक नाही, असं करा, ही यादी ठेवून जा आणि उद्या या. मी प्रकाशकांकडून मागवून घेते आणि तुम्हाला फोन करते. पण यादीतल्या या आणि या प्रकाशकाची खात्री नाही. पुस्तकं द्यायला खूप कटकट करतात आणि रोख ऍडव्हान्स मागतात.''
""बरं, मग मीच प्रकाशकांकडे गेलो तर? आता इथपर्यंत आलोच आहे तर अजून थोडं पुढे!''
""अहो साहेब, तुम्ही कुठे कुठे फिरणार? आणि प्रकाशनाच्या ऑफिसात पण कधी-कधी ही पुस्तकं मिळत नाहीत.''
मी चिकाटीने विचारलं की हे प्रकाशन कार्यालय आहे कुठे? एक नारायण पेठ, दुसरे सदाशिव पेठ, तिसरे शनिवार पेठ, चौथे माडीवाले कॉलनी, पाचवे पेरूगेट इत्यादी.
मी धीर न सोडता दोन चार प्रकाशकांकडे जायचं ठरवलं. प्रथम तिथून जवळ नारायण पेठेत! कुलूप! जेवणाची सुट्टी. पुढच्या कार्यालयात गेलो. कार्यालय सुरू होतं; पण विक्री विभागात काम करणारे नव्हते. संपादन खात्यात काम करणाऱ्या एका महिलेने माहिती पुरविली, ""काय आहे की विक्री म्हणजे रोखीचा व्यवहार आणि रोकड हाताळावी लागते. ही पुस्तकं महाग असतात ना? आणि हिशेबाचा प्रश्‍न असतो ना? आणि कमी भरले तर पदरचे घालावे लागतात.''

इथे मी रोख पैसे आणि यादी घेऊन खरेदीला निघालो होतो आणि ही पुरंध्री मला जोखीम, रोकड, जबाबदारी आदी मराठी मध्यमवर्गीय भुतांची भीती घालत होती.
"असू दे मी थांबतो'- मी.
"तुम्ही दुकानातून का खरेदी करत नाही?' महिला.
""अहो मिळत नाहीत. तुम्हीच सांगा कोणत्या दुकानातून घेऊ? तुम्ही कुठून घेता?''
""छे, छे, मी कधीच खरेदी करत नाही. इथूनच वाचायला नेते आणि परत आणते.''
सुमारे 10 मिनिटांनी विक्री-विभाग प्रमुख जोखीम तरुणी अवतरली. वय सुमारे 30 वर्षे. हातातल्या बोटांत 4-5 अंगठ्या आणि बोलताना त्याच्याशी कायम चाळा! त्या महिलेच्या आसनासमोर खुर्चीत मी बसलो होतो. माझ्याकडे अगदी स्टायलिश दुर्लक्ष करून मोबाईलवर बोलणे चालूच ठेवले. संपादन खात्यातील महिलेची आणि जोखीम विक्रीची माझ्या कळत नकळत काहीतरी नेत्रपल्लवी झाली आणि भ्रमणध्वनी संभाषण आटोपते झाले.
""काय हवंय?''- जोखीम.
""ही पुस्तकं!'' मी यादी दाखवताच, ""ही पुस्तकं आमची नाहीत.''- कपाळभर आठ्यांसह जोखीम.
""तुमची पुस्तकं मी मार्क केली आहेत...''
""तुम्ही दुकानातून का घेत नाही?''- जोखीम.
""मिळत नाहीत.''- मी.
""अहो, हे दुकानदार आम्हाला बदनाम करायला टपलेले असतात. आधी ऑर्डर नोंदवत नाहीत. पैसे भरत नाहीत. आणि आम्हाला त्रास. अगदी फटके मारले पाहिजेत''- जोखीम.
""ते बरोबर आहे. पण मी परदेशी जातो आहे. आणि ही पुस्तके घेऊन जायची आहेत.''- मी.
""अय्या, म्हणजे तुम्ही एन.आर.आय. आहात?'' जोखीम.
""नाही, पण वर्षात 2-4 वेळा जातो''- मी.
""गेल्या वर्षीच आम्ही पट्टाया, बॅंकॉक उरकून आलो.''-जोखीम.
""मॅडम, पुस्तकाचं काय?''- मी.
""थांबा, गोडाऊनमध्ये पाहते.''- जोखीम.
""अरे राम, जरा गोडाऊनमध्ये जा, ही यादी घेऊन.''
माझी यादी आणि राम गडप झाले. अर्धा तास झाला, पण पत्ता नाही. मध्यंतरी जोखीम इकडे तिकडे जाऊन कामाचं नाटक करून आली. माझ्याखेरीज कार्यालयात कोणीही ग्राहक आला नाही आणि एकंही दूरध्वनी आला नाही. संस्थेचे मालक म्हणजे प्रकाशक जवळपासही नव्हते. चौकशी केल्यावर कळलं, की ते वृत्तपत्रांच्या कार्यालयामध्येच असतात आणि त्यांच्या पब्लिसिटी एजंटबरोबर वृत्तपत्रांतून येणारे बातमी-कम-जाहिरात मॅनेज करत असतात.
अर्ध्या तासानंतर मी स्वतः गोडाऊनमध्ये गेलो. राम बेपत्ता आणि माझी यादी तिथल्या एका टेबलावर होती. ती यादी घेऊन मी स्वतः पुस्तकं शोधली. 1-2 मिळाली. त्यावरील धूळ झटकून, तळघरातून हाशहुश करत वर आलो. पाहतो तो काय "जोखीम' बेपत्ता! मी परत संपादकीय महिलेला विचारलं.
""कुठे गेल्या?''
""अहो, कॅश ऑवर्स संपले, ती घरी गेली.'' मी कपाळावर हात मारला. पुस्तक तिथे ठेवली आणि बाहेर पडलो. रस्त्यावर येऊन गाडीत बसलो, तोच रामू अवतरला.
""साहेब, पुस्तकं हवीत का?''
""हो, म्हणून तर आलो.''
""मी देतो 15 टक्के सवलतीत''
""कसं काय?''
""मी बुकक्‍लबचा मेंबर आहे आणि मला 30 टक्के सवलत आहे. त्यातील 15 टक्के तुमचे! जरा पलीकडे जाऊन व्यवहार करू.''- रामू
""रामू, मला बुकक्‍लबचा मेंबर होता येईल का?''
""हो साहेब, पण पुस्तकं मिळणारच नाहीत.' ""आँ!''
""हो साहेब, आम्ही सर्व स्टाफ रिंग करूनच स्वतःकडे पुस्तकं ठेवतो. आमच्याखेरीज कुठेच सवलतीत मिळणार नाहीत, दुकानातसुद्धा.''- रामू.
या प्रकाशकाचं भविष्य उज्ज्वल आहे. मी तसाच पुढच्या प्रकाशकाकडे गेलो. अगदी अरुंद रस्ता, जुनाट इमारत, पॅसेजमध्ये कशीबशी चालत जाण्याची जागा होती. उरलेल्या जागेत शुभ्र पांढरीकोरी करकरीत होंडा सिटी गाडी. त्याच्या मागच्या-पुढच्या काचेवर प्रकाशन संस्थेची स्टिकर्स लावलेली. माझ्या मनात आलं, "अरे व्वा, हे प्रकरण भारदस्त दिसतं आहे.' आत शिरल्यावर कार्यालयसदृश हॉल होता. उजवीकडे एक केबिन. त्यात कोणीच नव्हतं, पण टांगता दिवा टेबलवर लावलेला होता. डावीकडे टेबलांवर स्टाफ होता. एकासमोर जाऊन मी यादी पुढे केली. त्या माणसाने त्याचा उजवा हात उंचावून "तिकडे' असे दर्शविले. तोंड बंद! मी विचारलं ""का?'' ""हा संपादकीय विभाग आहे. विक्री तिकडे बाहेर, बाण आहे ना तिकडे. तुम्हाला गाडीमुळे बाण दिसला नसेल.''

त्याच गृहस्थाने यादीवर नजर टाकली आणि कपाळावर आठ्या घालत म्हणाले, ""अशी थिल्लर पुस्तकं आम्ही काढत नाही. आमची सर्व "टायटल्स' विचारप्रवर्तक असतात.'' मराठी पुस्तकांना "टायटल्स' म्हणतात, हा शोध मला लागला आणि इतर पुस्तके थिल्लर, म्हणजे मी चिल्लर हेपण समजलं.
मी बाणाच्या दिशेने गेलो. दोन कामगार पुस्तकांचे गठ्ठे बांधत होते. एक मोठ्या वयाचे गृहस्थ टेबलामागे बसले होते. आतापर्यंत मला प्रकाशनसंस्था आणि त्यांचीच पुस्तके ही ओळख झाली होती. एका प्रकाशकाचे पुस्तक दुसरीकडे विचारूसुद्धा नये, हा नियम अंगवळणी पडला होता. ही नवीन जातिव्यवस्था मजेदार होती. पुस्तकं खरेदी करताना लेखक, पुस्तकाचे नाव या गोष्टी गौण होत्या. प्रकाशक कोण? हा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा! त्यातून पुस्तकांची जात कोणती, हा शोध लागला.

या नवीन ज्ञानामुळे सरावलेला मी आता याच प्रकाशनाची पुस्तकं तोंडी विचारायची ठरविली. ""हे पुस्तक आहे का?'' त्या वयस्कर गृहस्थांनी मान आडवी हलवली. म्हणजे नाही. ""बरं ते पुस्तक,'' माझा चिवट प्रयत्न. ""तेही नाही.''
आता हतबुद्ध व्हायची वेळ माझ्यावर होती.
""अहो, त्या पुस्तकांचं प्रकाशन गेल्याच आठवड्यात झाल्याचं मी वाचलं आणि पुस्तकं नाहीत असं कसं?''- मी.
""ती आवृत्ती संपली.''
""आठ दिवसांत आवृत्ती संपली?''

त्या वयस्कर गृहस्थाने मला "खाली बसा,' अशी खूण केली. अगदी जवळ तोंड आणवून कानात गायत्री मंत्र सांगितल्यासारखे कुजबुजले. ""अहो, शंभरचीच आवृत्ती होती. ती केव्हाच संपली. पुस्तक छापलेलं आहे. पण आता दुसऱ्या आवृत्तीची जाहिरात आली, की पहिलं पान तेवढं बदलायचं. तेव्हा हे पुस्तक अजून आठ दिवसांनी मिळेल.''
मला स्वतःची पाठ थोपटून घ्यावीशी वाटली. सकाळी 11 वाजता पुस्तक खरेदीला निघालो. आता चार वाजेपर्यंत पुस्तक मिळालं नसलं, तरी ज्ञान बरंच मिळालं होतं. फुकट!
या गृहस्थाबरोबर थोडी बातचीत करावी असं ठरवलं आणि सरसावून बसलो. तेवढ्यात पलीकडच्या संपादकीय दालनातून काही आवाज ऐकू येऊ लागले. एक पुरुषाचा खरखरीत आवाज आणि एक स्त्रीचा. नीट काही समजलं नाही पण अभिव्यक्ती, आविष्कार, जाणिवा, नेणिवा वगैरे शब्द पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. ते गृहस्थ चपापले आणि बोलायचे थांबले. मला हळूच म्हणाले, ""आमचे प्रकाशक म्हणजे मालक आलेले दिसतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडत्या कवयित्री आहेत. आता मला जास्त बोलता येणार नाही. तुम्ही पुढच्या आठवड्यात या.''

आता इथून उठणे भाग होते. मी बाहेर पडलो. भुकेची जाणीव झाली. रस्त्यावरचा एक उडपी गाठून क्षुधाशांती केली. परत निघालो. लकडीपूल ओलांडताना डावीकडे एक प्रसिद्ध इंग्रजी पुस्तके विकणारे दुकान आहे. मराठी तर नाहीच; पण काही इंग्रजी पुस्तके तरी घ्यावीत. म्हणून ठरवले. पाच वाजून गेले होते. गाडी पार्क केली आणि फेरीवाल्यामधून वाट काढत दुकानाकडे निघालो. हे पुण्यातलं जुनं इंग्रजी पुस्तकाचं दुकान! सर्वपल्ली राधाकृष्णन, नेहरू, यशवंतराव चव्हाण वगैरे थोरांनी गौरवलेलं. ही भारदस्त कीर्ती आणि मी खरेदी काय करणार आणि किती? दडपण होतंच. मराठी पुस्तक खरेदीचा फज्जा उडालाच होता. तेव्हा तो विचार सोडूनच दिला.
दुकानाच्या बाहेर शोकेसमध्ये एक दोन मराठी पुस्तकं दिसली. असतील गंमत म्हणून ठेवलेली, असा विचार करून आत शिरलो. "या साहेब' एका वयस्कर गोऱ्या चष्मेवाल्या किरकोळ देहयष्टीने माझे स्वागत केलं. अरे वा. इथे मराठी बोलतात की! चला! मी सांगितलं की, ""मला पुस्तकं हवीत.''

""काही खास आवड?'' चष्मा.
मी एक-दोन माझ्या आवडीची पुस्तकं सांगितली.
""एक मिनीट हा।।'' तोवर तुम्ही ही पुस्तकंपण बघा.'' असं म्हणून तो एक क्षण बाजूला गेला आणि पुढच्याच मिनिटाला मी सांगितलेल्या लेखकाची तीन पुस्तकं आणली.
""ही घ्या. त्यातलं हे चांगलं आहे.'' आता थक्क व्हायची पाळी माझ्यावर होती. रॅक्‍सवर ठेवलेली पुस्तकं मी चाळली. आणि एक-दोन बाजूला काढली.
""या लेखकाचं हे नवं पुस्तक आलं आहे. साहेब, हे घ्या.'' त्या माणसाने मला एकही प्रश्‍न न विचारता अचूक आवड ओळखून, प्रकाशक कोण हा प्रश्‍न न विचारता, मला जे अभिप्रेत होतं ते आणून दिलं.

दुकानात फिरताना मागे टेबलामागे एक उत्साही चेहरा दिसला. जरा ओळखीचा वाटला म्हणून जवळ गेलो आणि नमस्कार केला. अंदाज बरोबर निघाला. ते गृहस्थ महाविद्यालयात माझ्यापुढे एक वर्ष होते आणि लोकप्रिय होते. इतर चौकशी झाल्यावर त्यांनी ""इकडे कुठे?'' विचारलं. झालं! मी माझ्या सर्व अनुभवाचा धबधबा ओतला. ते फक्त ऐकत होते. माझी मराठी पुस्तकाच्या खरेदीची रडकथा आणि आता इंग्रजी पुस्तक खरेदी सांगून झाल्यावर त्यांनी शांतपणे ""चहा घेणार का?'' असा प्रश्‍न विचारला. माझ्याकडून होकार कधी गेला ते मला कळलंच नाही.

त्यानंतर त्या गृहस्थांनी (जे त्या दुकानाचे मालक होते हे नंतर कळलं) मला विचारलं, ""कुठली मराठी पुस्तक?'' मी तत्परतेने यादी पुढे ठेवली. त्यांनी त्यांच्या सेवकाला हाक मारली. यादीतील प्रत्येक पुस्तक कुठल्या रॅकवर आहे, कुठल्या कप्प्यात आहे, ते सांगितलं. एखादे पुस्तक नसल्यास ते कुठून आणायचे हेही सांगितलं. इतर गप्पा होईपर्यंत इंग्रजी व मराठी पुस्तकं पिशवीत घालून बिल करून, डिस्काऊंट देऊन माझ्यासमोर आली. मी रोख रक्कम मोजली आणि त्यांचे आभार मानले.

मला एक प्रश्‍न विचारावासा वाटला, ""काय हो, तुमच्याकडे वेगळं काय?'' ते म्हणाले, ""इतर लोकं पुस्तकं विकतात, आम्ही ज्ञान वाटतो. आमच्या स्टाफचे आणि अर्थात माझे पुस्तकांवर अतोनात प्रेम आहे. येणाऱ्या कस्टमरची आवड ओळखून कमीत कमी प्रश्‍न विचारून त्याला पुस्तकं दाखवतो. खरेदी काय करायची हा त्यांचा निर्णय!''
मी माझी सर्व मराठी पुस्तकं एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाच्या दुकानात खरेदी केली आणि समाधानही!
हे सकाळीच का नाही सुचले?  

Marathi Kavita : मराठी कविता