सिगरेट हा डाएटींगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, म्हणून आम्ही स्मोकिंग करतो.’ असे आता मुली बिनधास्तपणे कबूल करतात. मुलांच्या बरोबरीने आता महिलावर्गातही मोठय़ाप्रमाणावर धूम्रपान होऊ लागले आहे. पूर्वी लपून-छपून धूम्रपान करणाऱ्या मुली आता सर्रास धूम्रपान करू लागल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही धूम्रपान का करतो? याचे उत्तरही त्या बिनदिक्कतपणे देऊ लागल्या आहेत.
प्रत्येक नाक्यावर, कॉलेजच्याबाहेर, कधीतरी गाडी चालवताना, पाटर्य़ामध्ये, ऑफिसच्या कामामधून स्मोक ब्रेक्स् घेताना अनेक तरुण-तरुणी सिगरेटशी मैत्री करताना दिसतात. आश्चर्याचे म्हणजे मुली धुम्रपान करतात यात काही गैर आहे असे समजणारे आता खूप कमी झाले आहे. जे धुम्रपान करत नाहीत त्यांना अनेकदा असे वाटते की स्मोक केल्याने असा काय आनंद मिळतो, असे कुठले दु:ख सिगरेटचा तो एक पफ घेतल्याने नाहीसे होते. तर मुलींनी या सिगरेटशी नाते का जोडले, हा प्रश्न अनेकांना पडतो. एक कारण जे अनेकांना माहीत नसतं ते म्हणजे डायटींगसाठी. हे ऐकल्यावर तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण हे बऱ्याच मुलींच्या बाबतीत खरं आहे. सिगरेटमुळे भूक मरते आणि डाएटिंग करण्याचा हा सर्वात सोप्पा मार्ग कारण यात व्यायाम ही करावा लागत नाही अथवा कडू औषधेदेखील घ्यावी लागत नाही. मिडिया, मॉडलिंग यासारख्या क्षेत्रात तर सिगरेट ओढणे हे कूल समजले जाते. पार्टीजमध्ये सिगरेट, दारु ही तुम्ही किती फॉरवर्ड आहात याची लक्षणं आहेत, पण खरंच तसे आहे का?
केवळ कुतूहलापोटी प्यायलेली पहिली सिगरेटनंतर आयुष्याची सोबती बनून जाते. क्षणिक सुखासाठी अनेकदा आयुष्यभराच्या आजाराला यामुळे बळी पडावे लागते. मग सिगरेटचे हे फॅड हळूहळू नशा बनत जातं आणि किती ही वाटलं तरी ही ती सोडता येत नाही. पण म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत का? जरुर प्रयत्न करायचे, यात यश मिळविलेलेदेखील भरपूर तरुण-तरुणी आहेत. काही तरी नवीन करायचे, सर्व काही ट्राय करायचे, आयुष्यात रिस्क घ्यायची हा काहींचा हेतू असू शकतो. पण आजची ही फॉरवर्ड जनरेशन स्वत:च्या चुकांमधून शिकणे पसंत करते. किती ही कूल बनण्याचा प्रयत्न करत असलो तरी ही आमच्या मर्यादा ओलांडणार नाही याची पूरेपूर काळजी ही जनरेशन घेत असते.
काही वर्षांपूर्वी मुली धूम्रपान करतात या कल्पनेनेच लोकांना घृणा वाटायची, पण जग बदललेले आहे अणि ते सुद्धा वेगाने. आज जर मुली मुलांबरोबर खांद्याला खांदा मिळवून आयुष्य जगत असतील तर हे का नाही, असा प्रश्न अनेक मुली विचारतात. म्हणूनच ‘टू स्मोक ऑर नॉट टू स्मोक’ हे ज्याने-त्याने ठरविलेलेच उचित ठरेल.
पूनम बूर्डे,
झेविअर्स महाविद्यालय