Author Topic: बाई गं...  (Read 1187 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
बाई गं...
« on: March 09, 2010, 04:37:08 PM »
बाई गं...
                                                       उत्तम कांबळे  


बाई गं तशी तू युगानुयुगं लढतच असतेस... तुझ्या लढाईला कॅलेंडरनं पकडलं त्याला म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिनाला आज पूर्ण झाली शंभर वर्षं...

किती भरभर गेली नाही का शंभर वर्ष? असं म्हणतात, की युद्धानं, लढायांनी भरलेली वर्षं खूप भरभर सरकतात... तारखांचं कॅलेंडर हलतच राहतं... क्रिकेटच्या धावफलकासारखं...!
पृथ्वीच्या पाठीवर असंख्य लढाया झाल्या असतील... पण पृथ्वीशिवाय त्या कुणालाच मोजता येत नसतील... पण तुझ्या लढाया लक्षात राहतील बाई... कारण या लढायांचा आशय वेगळा... त्यात भरलेला संयमही वेगळा... या लढाया दीर्घकाळ चालणाऱ्या... कोणत्याही ऋतूत न थांबणाऱ्या... त्या चालू आहेत अनंतकाळ... बाकीच्या लढायांच्या तशा काहण्या वेगळ्या... काही जमिनीच्या तुकड्यासाठी, काही हंडाभर सोन्यासाठी, काही माणसं, जनावरं आणि बायका पळवण्यासाठी... विशेष म्हणजे माणसं मारण्यासाठी झालेल्या या साऱ्या लढाया... तुझ्या अजेंड्यावरच्या लढाईचं मात्र फक्त एकच कारण आणि ते म्हणजे माणूस म्हणून मान्यता मिळवण्याचं ! माणसासाठी आवश्‍यक असणारं स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मूल्ये मिळवण्याचं...
बाई, या पृथ्वीवरच्या माणूस नावाच्या प्राण्याची उत्क्रांती पाहणारी तू एक साक्षीदार आणि निर्मितीही...

तू जीव जन्माला घालणारी... जीवाला आकार आणि अर्थ देणारी... या जीवाच्या संगोपनासाठी हवा तो त्याग करणारी... त्याच्यासाठी आपलं अवघं आयुष्यच उधळून देणारी...
मनुष्य प्राण्याचं जीवन सुंदर व्हावं, समृद्ध व्हावं, व्यापक व्हावं यासाठी तुझी भागीदारी कुणालाही न मोजता येणारी... बाई गं तूच माणसाच्या हुंकाराला शब्द दिलेस आणि शब्दांना गोडवा देत देत संगीतच निर्माण केलंस... निसर्गाचं चक्र न्याहाळत-न्याहाळत शेतीचा शोध लावलास तू... तू बनलीस भूमीकन्या, भूमीभगिनी आणि तसं पहायला गेलं तर भूमीच...

बाई गं कुण्या एकेकाळी तुझ्या नावाची संस्कृती होती. तुझ्या नावाची पराक्रमी कुलं होती...तुझं सैन्य होतं...तुझा न्यायाचा दरबार होता... सारं काही होतं तुझ्याच सात-बारावर... जे काही होतं ते तुझ्याच तर कर्तृत्वातून आलं होतं... सारं काही मिळवणारी तूच आणि त्याचं न्यायवाटप करणारीही तूच होतीस बाई...

तुझ्यातूनच जन्माला आल्या असंख्य देवता... जसं, की मातृदेवता, जलदेवता, वायूदेवता, तृणदेवता, सुवर्णदेवता, सौंदर्यदेवता, न्यायदेवता वगैरे वगैरे...
या साऱ्या देवता म्हणजे तुझ्यातल्या मायाळू, लढाऊ, निर्मिती, सहजीवन आदी गुणांची जणू प्रतिकंच...

बाई गं तू नव्हतीस नुसतीच इंग्लडची राणी तर जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी तूच होतीस सम्राज्ञी... तू कुठं तरी नैऋत्येला राज्य करणारी निऋर्तीही होतीस असं अभ्यासक सांगतात... तुझ्या राज्यात न्यायाला प्रचंड महत्त्व होतं... पिसारा फुलवून समता चालायची असंही सांगतात... पण चक्र बदललं बाई आणि तू उरलीस फक्त सजीव आकृती पुरतीच! कोण्या तरी मुलुखातून किंवा नांगर घुसलेल्या रानातून पुरूषप्रधान संस्कृतीचं आलं वादळ आणि त्यानं सारंच नेलं तुझं हिरावून... तुझं स्वातंत्र्य, तुझ्यासाठीची समता, तुझं स्वतःचं म्हणून असलेलं अस्तित्व, तुझा विचार, तुझी प्रतिभा आणि तुझ्या चेहऱ्यासह सारं सारं काही नेलं हिरावून...तुझ्यातली बाई, तुझ्यातली ताई, तुझ्यातली आई, तुझ्यातला माणूस, सारंच काही मारण्याचं पद्धतशीर प्रयत्न झाले सुरू...तुझ्यातली एक मादीच तेवढी जिवंत ठेऊन...

पण तू हरली नाहीस बाई... खरं तर बाई नसतेच कधी हरत... ती मात करते साऱ्या वादळांवर, दुष्काळांवर, पृथ्वीचा गर्भ चिरून येणाऱ्या आगीवर आणि माणूसघाण संस्कृतीवर...
तू पुन्हा लढायला लागलीस... सती जाऊन जीव गमावणार नाही असा केलास निर्धार केलास तू... बालपणी कोवळ्या कपाळावर बाशिंग बांधणार नाही असंही ठणकावून सांगितलंस तू... सावित्रीबाईचं बोट धरून शाळेत पाऊल ठेवलंस तू... सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करू लागलीस तू... गुलामीची जाणीव झाली तुला ... स्वतःही माणूस असल्याची जाणीव झाली तुला...

तू लढून लढून मिळवलास मतदानाचा हक्क आणि देसोदेशी राष्ट्रपती-पंतप्रधान होऊन दाखवलंस आपल्या राजकीय शक्तीचं विराट रूप... निसर्गविधीही नाकारणारे अन्यायी कायदे कारखान्यांतून हद्दपार केलेस तू... समान काम, समान दामाचा नारा घुमवलास बाई तू... सर्वच क्षेत्रातील दारं ठोठावत राहिलीस तू आणि सर्वच ठिकाणी यशाचे कळसही उभारलेस तू...

व्यवस्थेनं किती किती छळलं तुला...जळत्या चितेवर ढकलून पाहिलं तुला... गुलामांच्या बाजारात विकून पाहिलं तुला... बालमातेचं ओझं लादून पाहिलं तुला... गर्भाशयात आणि गर्भाशयाबाहेरही मारून पाहिलं तुला... एवढंच काय गर्भाशयही हिरावून घेऊन पाहिला तुझा... अंधारात ढकलून पाहिलं तुला... मुंडण करून पाहिलं तुला... चित्रविचित्र कायदे आणि परंपरेत करकचून बांधून पाहिलं तुला... चूल आणि मूल शब्दप्रयोग जन्माला घालून पाहिलं तुला... आणि चारित्र्य मोजण्यासाठी अघोरी मार्गावर नेऊनही पाहिलं तुला... पण तू हरली नाहीस! बाई गं, तुझ्या लढाईनं या साऱ्या गोष्टींशी मुकाबला केला...

व्यवस्थेनं किती किती तरी कारणांवरून जाळून बघीतलं तुला... पण तू फिनिक्‍स होऊन भरारी मारत राहिलीस... अगदी अंतराळात जाऊन कल्पना चावला बनलीस... तू वीरांगना बनलीस आणि करूणेची महाकथाही बनलीस...
बाई गं तुला माहित होतं की ही लढाई काही एकटीदुकटीची नाहीय... साधी सोपीही नाहीय... न्यू यॉर्कमध्ये कारखान्यात आग लागून खाक झालेल्या 140 बाया पाहिल्या होत्यास तू... बाया जाळण्याची शेकडो षडयंत्रही बघीतली होतीस तू... चितेपासून हुंड्यापर्यंत, चारित्र्यापासून ते मर्यादाभंगापर्यंत अनेक कारणं पाहिली होतीस बाई तू... भारतातच बघ ना! 1931 मध्ये झालेल्या जनगणनेत केवळ एक वर्ष वयाच्या 1515 आणि दोन वर्षापर्यंतच्या 1785 बालविधवा पाहिल्या होत्यास तू... परसबागेतील विहिरीमध्ये बुडवून मारल्या जाणाऱ्या शेकडो बायाबापड्यांचे आक्रोश ऐकले होतेस तू... संतती प्रतिबंधक उपकरण वापरल्याबद्दल शिक्षा झालेली लढाऊ भगिनी पाहिली होतीस तू... ही सारी कारणं पुरुषप्रधान संस्कृतीनं फक्त तुझ्याचसाठी तयार केली होती... तुझं खच्चीकरण करण्यासाठी... तुझं पंखच कापण्यासाठी... माणूस म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यासाठी ... स्वतःचीच एकाधिकारशाही चालवण्यासाठी... या क्रूर संस्कृतीनं प्रत्येक काळात, प्रत्येक युगात माणूसकीची अगणित थडगी उभारली होती... काही थडगी तुझ्या भगिनीच्या मरणानंतर तर काही जिवंतपणीच उभारली होती... या साऱ्या थडग्यांवर अश्रू ढाळत होतीस तू, अश्रूतून फुलं फुलवत होतीस तू आणि नव्या लढायासाठी भरभरून ऊर्जाही पीत होतीस तू... तुला कळत होतं की वर्षानुवर्षे चालणाऱ्या लढाईसाठी आपल्यासारख्या बायांची जागतिक पातळीवर संघटना पाहिजे...

बाई गं तसं तुझं मागणं तरी काय? आभाळाएवढं मागणं नाही तुझं ! मी माणूस आहे... माणूस म्हणून मान्यता द्या एवढंच काय तुझं ते मागणं... पण व्यवस्था नाही अजूनही दिलखुलासपणे मान्य करत... अजूनही हुकमी पत्ता आपल्याच हातात ठेऊन तुला काहीतरी देण्याचं नाटक करते... तुला हवी राजकारणात 50 टक्के सत्ता पण व्यवस्था तीस टक्केही द्यायला तयार नाही.
बाई गं आतापर्यंत शंभर मार्च आणि तेवढेच उन्हाळे येऊन गेले पण तुझ्या साऱ्याच बेड्या निखळल्या असं कोण म्हणेल बरं ? काही बेड्या गळून पडल्या हे खरंच... पण काही नव्यानंही निर्माण झाल्या... काही नव्या बेड्यांना व्यवस्थेनं फुलं लटकवली आहेत तुला गुलामी जाणवू नये म्हणून...

नव्या काळात एकीकडं तुला हक्कही दिले जात आहेत आणि दुसरीकडं तुझं वस्तूत रूपांतरही होत आहे...
हक्क तपासून घे आणि वस्तूत जाण्याऐवजी माणसातच राहण्याचा प्रयत्न कर...
वस्तू तुझं सौंदर्य वाढवतील कदाचित पण आत्मसन्मान हिरावून घेतील...
सारं काही मिळालं पण आत्मसन्मानच गमावला तर काय गं शिल्लक राहील बाई?

बाई गं तुझी लढाई संपलेली नाहीय... तुला अजूनही लढावं लागणार आहे... इतिहास पाठीवर घेऊन, वर्तमानातल्या निखाऱ्यांवर पाय ठेऊन आणि भविष्य डोळ्यात साठवून तुला लढावंच लागणार आहे... व्यवस्था हरत नसते लवकर तर नव्या लढाया लादत नवी कारणंही उपलब्ध करून देत असते... हे सारं सारं तुझ्याइतकं अन्य कुणाला कळेल बरं? बाई गं तू आहेस लढायांचा संदर्भग्रंथ आणि उगवतीला दाखवलेलं एक सुंदर स्वप्न... तुझ्याशिवाय जगाची कल्पनाच नाही... स्वतःला जप... स्वतःच्या लढाऊ इतिहासाला जप... लक्षात ठेव बाई... तुझी लढाई कोणा पुरुषाविरूद्ध नाही तर ती आत्मसन्मानासाठी आहे. समूह जीवनासाठी आहे आणि झालंच तर सहजीवनासाठी आणि माणूस म्हणून मान्यता मिळवण्यासाठी तर आहेच आहे.
पुनःपुन्हा लक्षात ठेव बाई हे सारं...

विश्‍वास ठेव उद्याचा सूर्य तुझ्याच ओंजळीतून उगवेल कदाचित...
कूस जपून ठेव तुझी सूर्याला तेथेच विसावायचं आहे.
बाई गं लक्षात ठेव तुझ्या लढाया कोणा कॅलेंडरवरल्या मार्च -एप्रिलमध्ये मावणाऱ्या नाहीत... त्या आभाळमिठी घेणाऱ्या आणि कपाळी सागर लेणाऱ्या आहेत... त्या तिथं मोठ्या वळणाकडं जाण्यासाठी तुला आठ मार्चला काळीज भरून शुभेच्छा!  

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Swan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
Re: बाई गं...
« Reply #1 on: March 10, 2010, 10:26:37 AM »
गौरी ग..असाच पोस्ट करत रहा ग