क्षितीज लाल रंगात न्हात असताना अबोल अन शांतपणे अंधाराच्या प्रतीक्षेत असते. दिवसभर इकडून तिकडे उंदारणारे ऊन सांजवेळेला हळवे होत जाते..गाव-शिवाराच्या झाडीतून हळूच पळत राहते. निळेभोर आकाश सूर्यास तेव्हा आपल्या कुशीत घेते आणि या सांजमेण्यास आधार देत असते. तेव्हा सूर्याची किरणे नभाच्या पदरी गडप होत जातात. हि वसुंधरा लाजून तमाचा शालू स्व:ताच्या अंगावर पांघरून घेते.
तेव्हा आठवणींचा अंकुर नकळत मनात वाढत राहतो...नकोशी हुरहूर मनात दाटत जाते. सांजवारा आठवणींचे तरंग हलकेच उठवून जातो. दूर गेलेले कोणीतरी आठवत राहते...निरोपाचे केविलवाणे हसू ओठाबाहेर सांडते. एक वेडी आशा मनात गुंफत जाते. मनात कुणाचीतरी पावले हळुवार पडत येतात. उजाड मनाचा रस्ता भरून जातो. मुक्तीचे समाधान डोळ्यात भरून येते. अनिवार स्नेहाने,प्रेमाने,जिव्हाळ्याने कुणीतरी पाठीवर हात फिरवल्याचा भास होतो. कुठल्यातरी वळणावर भेटलेले कुणीतरी..नाते जोडून गेलेले पुन्हा नाते गुंफण्यास परत येईल असे वाटत राहते.
अंत:करणाची प्रीतफुले हळूहळू उमलायला लागतात आणि आपसूकच स्व:ताच स्व:ताला पारखा झालेला मी, सांजादिव्याचा वेडा होतो. तेव्हा आयुष्याची हि क्षणभंगुरता माझ्याच पदरी येते. अचानक मनाभोवती अंधाराचे साम्राज्य पसरते. मनातही अंधार दाटून येतो. ती नसतानाही तिचे मोहमयी भास मनात पसरत जातात. पसरलेल्या अंधारात कुणाचीतरी सोबत असावी असे वाटू लागते पण स्व:ताचीच सावलीही स्व:ताला दिसेनाशी होते. काहीच कळेनासे होते. वेदनेचे आभाळ झुकत जाते.
पण या काळ्याकुट्ट अंधारातही अंधाराशी लढणारा दिवा दृष्टीस पडतो तेव्हा मनातही सुखाच्या जगण्याचा आशेचा एक सांजदिवा लुकलुकायला लागतो. तेव्हा आयुष्यापासून दुरावलेले रस्ते जवळ येऊ लागतात. जगण्याचे मार्ग पुन्हा सोपे वाटू लागतात. कोरड्या झालेल्या चैतन्याच्या प्रवाहास पुन्हा ओल मिळू लागते. हातामध्ये आयुष्य उभारण्याच्या उमेदिकरता नवं बळ संचारू लागते. अंधाराच्या साम्राज्याशी एकाकी लढणारा मी शांत गुलाबी चांदण्यात जगू पाहतो.