Author Topic: जहॉं मेरी कश्ती डुबी...  (Read 2393 times)

Offline dhundravi

  • Newbie
  • *
  • Posts: 34
जहॉं मेरी कश्ती डुबी...
« on: April 15, 2010, 09:08:43 PM »



मुझे तो अपनोंने लुटा... गै़रोंमे कहॉं दम था....
जहॉं मेरी कश्ती डुबी...  वहॉं पानी बहोत कम था...

शाररिक वेदनांपेक्षा, मानासिक यातनांनी भरलेला हा जख्मी शेर लिहणारा घायाळ शायर माझ्यासारखाच कुणीतरी खुप आतुन दुखावलेला जीव असणार.... आपल्याच जवळच्या माणसांकडुन दुखावलेला.... आपल्याच हक्काच्या गोष्टींकडुन फसवला गेलेला...! म्हणुन हि पहिली ओळ की 'मुझे तो अपनोंने लुटा... गै़रोंमे कहॉं दम था....' 
.... आणि शेवटच्या ओळीचा अर्थ शेवटीच सांगेन.....

काय सांगु तुम्हाला की काय दुःख असतं आपल्याच कुणाकडुन तरी फसवलं जाण्याचं.... मी पण फसवलो गेलोय... माझ्यातल्याच त्या माझ्या तीन सखींनी, माझ्या आयुष्याच्या जोडीदारींनी, माझ्या हक्काच्या तीन गोष्टींनी मला लहानपणापासुन दगा दिलाय... त्या माझ्या गद्दार सहचारीणी म्हणजे..... माझी सहनशक्ती, स्मरणशक्ती आणि पचनशक्ती.... 

माझ्या सहनशक्तीचं तर विचारुच नका....
परवाचीच गोष्ट घ्या.... रात्रीची वेळ.. एकदम गर्द अंधार... येतोय का जातोय हेही कळत नव्हतं.... सुनसान रस्ता... आणि एक सुंऽऽऽऽदर ऊजळ मुलगी... मी पहातच राहिलो... भानावर आलो आणि पाहिलं तर समोर चार मवाली गुंड... त्यांनी तिला घेरलं आणि छेड काढायला लागले.... तुम्हाला सांगतो कुठे अन्याय पाहिला, कुठे अत्याचार पाहिला, कुठे जबरदस्ती पाहिली, कुठे गुन्हेगारी पाहिली की मला सहनच होत नाही... त्या गुंडांचा तिला होणारा त्रास पाहिला आणि सहनच झालं नाही मला... मी....... मी.......
.........मी टिव्ही बंद केला आणि पांघरुण डोक्यावरुन घेऊन देवाचं नाव पुटपुटत झोपुन गेलो..... हे असं टिव्ही बंद करणं सोप्पं असतं, पण रोजच्या जीवनात सुद्धा माझी सहनशक्ती मला दगा देत आलीये......

मी खुप हळवा माणुस आहे हो.... नाही सहन होत मला काही.... भिती, राग, भांडणंच काय पण मला खुप प्रेम, माया असा भावनांचा अतिरेक पण सहन होत नाही. एकदा (म्हणजे आयुष्यात एकदाच) मी आणि बायको पिक्चरला गेलो होतो.... सहनच झाला नाही हो तो पिक्चर.... या तुम्हालाही एक झलक दाखवतो...

...पहिल्याच सीनमध्ये हिरो दवाखान्यात एका बेडवर झोपलाय...(त्यावर मृत्युशय्या असं लिहलय)... त्याच्या शेजारी अतिशय करुण डोळे आणि अतिशय लाल-भडक ओठ असलेली... नाही नाही, हिरॉईन नाही, त्याची आई... कधी एकदा आटपतय अशा चेह-यानी बसलीये... आणि तो म्हणतोय की "आई मी चाललो... एक शेवटची इच्छा.... मला लहानपणी भात भरवायचीस अगदी तस्सच्यातस्स भरव.... मग ती पर्स मधुन एक डबा काढते आणि त्याला लाळेरं बांधुन... चमचा त्याच्या घशात कोंबुन.... तस्सच्यातस्स भरवायला सुरवात करते... तो फुर्रर्रर्रर्रर्र करुन घास तिच्या तोंडावर उडवतो... ती त्याला थोबाडीत मारते... तो ताटली तिच्या तोंडावर फेकतो.. ती त्याच्या डोक्यात चमचा मारुन त्याला बेसीनमधे आपटते. आणि....

.....आणि मला पुढचं दिसेनाच... ते प्रेम मला सहनच होईना.. मी हमसुन हमसुन ओक्साबोक्शी रडायला लागलो. पुढच्या मागच्या एकेक रांगा रिकाम्या झाल्या आणि कुणी ओळखु नये म्हणुन बायको तोंडावर रुमाल बांधुन बसली. तेंव्हा पासुन मी पिक्चरचा आणि बायकोनी माझा धसकाच घेतलाय....

.......मला चेष्टा सहन होत नाही, अपमान सहन होत नाही, मनाला लागलेली रुखरुख, झालेली चूक, इतकच काय साधी भुक मला सहन होत नाही हो..... एकदा भुक लागली की काही सुचत नाही, कळत नाही... हात थरथरायला लागतात... कामाच्या महत्वाच्या कागदांचा बोळा केला जातो... त्या बोळ्याऐवजी तिथं भजी दिसायला लागतात...
एकदा तर भुकेनी इतका कडकडलो की घरी येऊन बायकोला "झालं असेल तसं जेवायला वाढ" म्हणालो. तिनी धुतलेले तांदुळ ताटात वाढुन दिले. खर तर तिची विनोदबुद्धी धुतल्या तांदळाइतकी स्वच्छ आहे पण मला तो विनोद सहनच झाला नाही. आत्मक्लेषात मी मुठीमुठीनी ते तांदुळ खायला सुरवात केली. त्या तांदळाची पावडर तर पचली नाहीच, पण तीन दातही गेले आणि वर लहान मुलीनी "बाबानी खडु का खाल्लेत ?" असं विचारलं. तेंव्हापासुन भात खाणं तर दुरंच... तो पहाणंही मला सहन होत नाही.....
त्यात तो पिक्चरमधला भात भरवण्याचा सीन आठवला तर तो भाताचा घास तोंडातल्या तोंडातच फिरत राहतो.....आणि शेवटी आत जायच्या ऐवजी बाहेर येतो.... 'भात खायचा नाही' हे मी हातावर गोंदवुनच घेतलय....
.....गोंदवुन घेतलय कारण कधी कधी विसरायला होतं हो...

माझ्या स्मरणशक्तीचं तर विचारुच नका....
बालपणी शाळेमध्ये असताना रात्री जागुन पाठ केलेल्या कविता दुस-या दिवशी आठवायच्या नाहीत. एकदा चुकुन, पंगेश माडगांवकरांच्या 'टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले'  ह्यातलं फुले विसरल्यामुळे 'टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची मुले' असं म्हणालो होतो. हसुन हसुन सगळीच मुल अंगावर पडली.
एकदा कविता पाठ झाली होती पण वेळ विसरलो आणि शाळेतच खेळत बसलो. मास्तर पेटलेच. त्यांनी बोलावलं आणि अत्यंत खोचट आवाजात म्हणाले की, "अस्मादिकांचं शुभनाम कळेल काय ?" मला ह्याचा अर्थ कळाला नाही, पण वाटलं की ते कविता म्हणायला सांगताहेत. स्मरणशक्तीनी दगा दिला आणि चक्क कविता आठवली.... आणि पाठ केल्याप्रमाणे मी ती जोशात म्हंटलीसुद्धा....
"आम्ही कोण म्हणुनी काय पुसशी ? आम्ही असु लाडके...   देवाचे दिधले जग तये आम्हांस खेळावया "
मास्तरांच्या अंगाची लाही लाही झाली. ते पट्टीचे शिक्षक असल्यामुळे पट्टीमार्फत ती लाही लाही त्यांनी माझ्या हातावर वाजवायला सुरवात केली. मला मारता मारता म्हणाले, "देणा-याने देत जावे.. घेणा-याने घेत जावे"... माझा पुन्हा गैरसमज झाला आणि मी ती कविता पुर्ण केली.... "घेणा-याने एक दिवस, देणा-याचे हात ही घ्यावे"... मास्तरांनी खरंच त्यांचे हात दिले........... पण माझ्या गालावर.... !

शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव हे कित्येकदा पाठ करुनही मी पेपरमध्ये दादा कोंडकेच लिहुन यायचो.  स्मरणशक्तीवर विसंबुन एकदा दादा कोंडके असं उत्तर पाठ केलं तर उत्तर लक्षात राहिलं आणि मी पुन्हा दादा कोंडकेच लिहुन आलो. मग मास्तरांनी दिवसभर मला दादा कोंडकेच्या आवाजात पाढे म्हणायला लावले.
सन-सनावळ तर लक्षातच राहायचे नाही हो... कित्येकदा तर आईबापाच्या जन्माआधि पोराला जन्माला घातलय मी....

भूमितीच्या पेपरात समद्वीभूज त्रिकोण, समभूज चौकोन आणि समांतरभूज काहितरी, म्हणुन जे काहि काढायचो ते चुकुन आठवलं तरी माझा चेहरा वक्राकार होतो आणि अंगावर सरळ रेषेत काटे उभे राहतात. (पण आमच्या मास्तरांना सुद्धा ते आकार नीट माहित नसावेत. कारण माझ्या प्रत्येक आकृतीसमोर ते मोठ्ठं वर्तुळच काढायचे.) अर्थात बहुतेक सगळ्याच शिक्षकांना माझ्या पेपरावर हि गोळ्या गोळ्यांची रांगोळी काढायची संधी मिळायची. 

पुढे मोठा झालो आणि स्मरणशक्तीच्या घोळांची संख्याही मोठी झाली. पायजम्यावर ऑफीसला जाणे... दुधासाठी म्हणुन पातेलं घेऊन जाणे आणि त्यात वर्तमानपत्र आणणे... वगैरे वगैरे... एकदा बायकोनी वजन पहायचा काटा आणायला सांगीतलेला.... विसरलो आणि तो चुकुन तिच्या वाढदिवसाला घेऊन आलो. (त्या दिवशी तिचा वाढदिवस होता हे शप्पथ माझ्या लक्षात नव्हतं हो....) एकदा.... एकदा... काय बरं सांगणार होतो मी.....
...................असो. ह्या साठी एक वेगळा लेख लिहीन... आजचा विषय वेगळा आहे. उगाच त्या चविष्ट बासुंदीत ह्या अवांतर चारोळ्या जास्त नको.....


आणि पचनशक्ती... माझ्या पचनशक्तीचं तर विचारुच नका....
(खरंच विचारु नका.... ह्याचे किस्से अगदी गळ्यापर्यंत भरलेले आहेत. उगाच घशात बोट घालाल आणि त्या भडाभडा बाहेर आलेल्या चारोळ्यात बासुंदीच दिसायची नाही.....)

तुम्हाला सांगतो.... मला दुःख दगा झाल्याचं नाहीये... त्याची सवयच आहे मला... मला दुःख आहे ते माझ्या त्रि-शक्तींनी एकाच वेळेला दगा दिल्याचं...  खरं तर मागच्या विदारक अनुभवानंतर पुण्यात पुन्हा कुणाचं 'गि-हाईक व्हायचं नाही' हे ठरवलं होतं.... पण पुन्हा एकदा स्मरणशक्तीनी दगा दिला, सगळं सगळं विसरलो.... सहनशक्तीनी दगा दिला.... एकदा ऑफिसवरुन येता येता मला भुक असह्य झाली आणि कोणत्या हॉटॆलमध्ये शिरतोय हे न पाहताच मी हॉटॆलमध्ये शिरलो..... ते एक साऊथ इंडीयन थाळीचं हॉटेल होतं.

क्रमशः .................

धुंद रवी. 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dhundravi

  • Newbie
  • *
  • Posts: 34
Re: जहॉं मेरी कश्ती डुबी...
« Reply #1 on: April 15, 2010, 09:09:50 PM »
मी आत गेलो तर मालक स्वच्छ पांढ-या लुंगीत कपाळावर पांढ-या गंधाचे उभे आडवे पट्टे ओढुन दोन्ही हात कोप-यापासुन जोडुन माझ्या स्वागताला उभे होते. मी पण त्यांच्याकडे पाहुन तसाच नमस्कार केला. तर त्यांनी 'घालीन लोटांगण'सारख्या  टाळ्या वाजवत स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घातली. मी पण.
त्यांनी कानाला हात लावला. मी पण.
त्यांनी नाकाला हात लावला. मी पण.
मग त्यांनी २-४ थोबाडीत मारुन घेतल्या. मी पण.
ते अचानक दोन पायांवर खालीच बसले. मी नाही.
मी तिथल्याच एका रिकाम्या टेबलावर हळुच बसुन घेतलं.... ते एकदम ओरडुन म्हणाले " एन्डेश्वरा इनीक्य इन्न ओत्तरी आळकारं एन्डे हॉटॆली वेरानपाडआ ".
मी जाम घाबरलो. बहुतेक मी खाली न बसल्यामुळे ते चिडलेत असं वाटुन मी घाबरुन खाली बसलो. पण ते माझ्यासाठी नव्हतंच. त्यांची पुजा चालली होती. ती थोड्या वेळानी संपली आणि ते दरवाज्यातल्या फोटोंकडे वळाले.

बराच वेळ माझ्याकडे कुणीच फिरकलं नाही आणि ती प्रतिक्षा मला सहन होईना. तो अपमान मला सहन होईना. मग भुक सहन होईना. त्याचा परिणाम माझ्या स्मरणशक्तीवर व्हायला लागला. मी गजनीतल्या आमीरसारखं किंवा कुठल्याही पिक्चरमधल्या सुनीलशेट्टीसारखं बधिर चेह-यानी इकडे तिकडे पाहायला लागलो. माझा भांबावलेला चेहरा पाहुन माझ्या दिशेनी एक काळी आकृती केळ्याचं पान घेऊन येताना दिसली.

मी जरा चरकलोच. कारण मागं एकदा एका साऊथ इंडीयन मठात जेवणाचा योग आला होता. तिथं सगळं एकदम कडक सोवळ्यातलं होतं. त्यांनी माझे कपडे काढुन घेतले आणि मला नेसायला एक छोटा सोवळ्याचा पंचा दिला होता. आख्खा वेळ त्या मिनी स्कर्टमध्ये मी लाजुन चुर झालो होतो. जे समोर ताटात पडेल ते धपाधपा गिळुन बाहेर पडलो आणि ते न पचल्याने भडाभडा....... असो.

........... हा माणुस तर तो पंचासदृश्य-मिनीस्कर्टही नाही तर केळ्याची पान घेऊन येत होता. ना ना शंका-कुशंकांनी माझं मन भरुन गेलं. इथे खुप कडक सोवळं तर नसेल ना? ह्या शंकेनी तर छातीच धडधडायला लागली. भुकेनं तडफडुन मेलो तरी चालेल पण केळ्याची पानं नेसुन जेवायला बसायचं नाही, असं ठरवुन टाकलं. माझ्या अब्रुची लक्तरं मी त्याला अशी केळीच्या झाडावर टांगु देणार नव्हतो..... 
     
त्यानी ती केळ्याची पानं आणुन माझ्या टेबलवर आपटली आणि माझ्याकडे वरपासुन खाली बघत... केळीच्या पानांकडे कडे हात करत तो म्हणाला "इद एडतो.... नंग ळेन्दो तिन्नुम....?"

मी घाबरुन त्याचा अंदाज घ्यायला लागलो. तो 'इद एडतो' म्हणाला होता का 'इथं फाडतो'... मला आठवेना. मी कपडे घट्ट पकडुन बसलो. (आणि.... 'नंग ळेन्दो' म्हणजे काय.... शी... काहितरीच....) त्या साऊथ इंडीयन दुःशासनापासुन वाचण्यासाठी मी नॉर्थ ईंडीयन कृष्णाचा धावा करायला लागलो. एक पाय टेबलाबाहेर काढुन पळुन जाण्याच्या पवित्र्यात असताना एक नजर दरवाज्यावर टाकली तर तिथं दुर्योधन हातात उदबत्ती घेउन डान्स करत होता आणि ती अभेद्य तटबंदी भेदुन जाणं शक्यच नव्हतं. पण देव धाऊन आला आणि मला स्पर्श न करताच तो दुःशासन निघुन गेला. मी पवित्रच राहिलो.

आता माझ्या स्मरणशक्तीनी दगा द्यायला सुरवात केली. दुःशासनानी जो काही प्रश्न विचारला होता त्याचं अर्थ काय आणि त्याचं उत्तर मी हो दिलय का नाही... मला काहीच आठवेना. हेच काय मी कुठल्या भाषेत बोलु शकतो हे ही आठवेना.... मालकांची पुजा संपली आणि दरवाजा मोकळा झाला. आता मी पळु शकत होतो. पण मालक गोडंसं हसले आणि म्हणाले... "वण्ण्क्कम. सावकास जेव्हा... हव्हा तेवढा ख्हा.. लिम्मीट नाय.... पन थालीत काय टाकु नका साहेब... ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो... आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय....भरपुर आनंद घ्या"   

मला काय बरं वाटलं म्हणुन सांगु ! एक तर तो इसम पुणेकर मराठी नाही, साउथ इंडीयन आहे आणि मी साउथ इंडीयन नाही, पुणेकर मराठी आहे... हे मला समजलं होतं आणि दुसरं म्हणजे अनलिमिटेड थाळी !!
मी बकासुरासारखी त्या गाडीभर अन्नाची आणि ते घेऊन येणा-या आण्णाची वाट बघायला लागलो.     

ब-याच वेळानी तो दोन्ही हातात काहितरी पांढरं पांढरं मूठ भरुन घेऊन आला. मी लाजत म्हणालो, अरे उगाच कशाला रांगोळी वैगेरे... त्यानी ते केळ्याच्या पानावर वाढलं. एवढं मीठ तर मी जन्मापासुन अगदी कालपर्यंत खाल्लं नसेल.... ते इतकं का वाढलं ते कळालं नाही.... मग तो गेला आणि सुमारे १६ वाट्या घेऊन आला. तिथं आठ टेबल्स होती. म्हणजे प्रत्येकी दोन दोन... पण तो इसम सगळ्या वाट्या माझ्याच टेबलवर ठेऊन गेला... आज त्यांचा भांडी घासायचा माणुस आला नसावा. थोड्या प्रयत्नांनी त्या वाटीत काय होतं हे सांगता आलं असतं.... असो....

"ये क्या है ?" - त्यानी माझ्या टेबलावर मांडलेल्या रुखवताकडे बघत मी विचारलं. "अर्रे.. आपीच तो बोला के स्पेशल साऊथेंडीयेन थाली" त्यानी माहिती वाढली.

हे मी कधी बोललो होतो कुणास ठाऊक. पण मी एकदम खुष झालो. थाळी म्हणजे जास्त काही रिस्क नसते. थोडं फार इकडे तिकडे. हे नाही आवडलं तर ते. हि भाजी नाही आवडली तर ती. पोळी नाही आवडली तर पुरी. रस्सा नाही आवडला तर सुकी भाजी. भात आपण खात नाही पण त्याबदल्यात थाळीवाले एक्स्ट्रॉ पोळ्या देतातच की.... जेऊन माणुस तृप्त झालाच पाहिजे....

भुकेनी माझ्या पोटातुन गुरगुर आवाज यायला लागले. मला पण गुरगुरवांसं वाटायला लागलं. पण ते काम मालक करत होते. दरम्यानच्या काळात एक नविन कस्टंबर आलं आणि माझ्या समोरच्या टेबलवर बसलं. त्यानी बसल्या बसल्या ऑर्डर दिली आणि त्यालाही एक केळीच पान आणि १६ वाट्या मिळाल्या. म्हणजे माझ्या टेबलवरच्या वाट्या माझ्याच होत्या....

मी अर्जुनासारखी लढायच्या आधिच कच खाल्ली. पण माझा पराभूत चेहरा पाहुन भगवान श्रीकृष्ण त्या हॉटेल मालकांच्या रुपाने पुन्हा धाऊन आले.
नाही... त्यांनी वाट्या कमी केल्या नाहीत, तर त्यांनी मला त्यांच्या नियमाची आठवण आणि युद्धाची जाणिव  करुन दिली. "ते आमच्या हाटेलचा एक नियम असतो... आमी कोनलाकाय वाया घालवुन देत नाय....भरपुर आनंद घ्या"   
मी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि माझ्याच पचनशक्तीला आवाहन केलं. १६ वाट्या म्हणजे सुमारे सहा ते आठ पोळ्या..... कमरेचा आव्वळ पट्टा थोडा सैल करुन मी आनंद घ्यायला तय्यार झालो !   

तो गेलेला माणुस एक मोठ्ठी परात घेऊन आला. मी पुन्हा लाजलो कारण मगाशीच मी पहिलं कस्टंबर असल्यामुळे मालकांनी मला उदबत्तीनी ओवाळलं होतं. मला वाटलं की आता 'बोहोनी' म्हणुन परातीत माझे पाय धुतात की काय....

पण नाही हो.....  त्यांनी त्यापेक्षा वाईट केलं होतं. माझ्यावर आकाशच कोसळलं होतं.... पेपर फुटला आणि सत्वपरीक्षेत मी नापास झालो होतो.... मग धरणी दुभंगली आणि मी आत गाडलो गेलो.... दुर्योधन आणि दुःशासनानी डाव साधला होता... भर सभेत मला.... .........................!
त्या दुःशासनानी माझ्या वस्त्राला हात घातला असता तरी मला चाललं असतं पण त्यानी स्पेशल साऊथ इंडीयन थाळीवाल्या परातीला हात घातला आणि त्या परातीतला डोंगर माझ्या पानावर उलटा केला....


...भाताचा डोंगर.... !!


त्या १६ वाट्यापण नानाविध प्रकारच्या, रंगांच्या, प्रतीच्या, चवीच्या, आकारमानाच्या, वासाच्या, भासाच्या, त्रासाच्या द्रवांनी भरुन गेल्या.... समोरचा कस्टंबर तर त्या स्पेशल थाळीवर तुटुन पडला होता. त्या महाकाय डोंगराचे त्यानी १६ मोठ्ठे मोठ्ठे गोळे केले होते. प्रत्येक गोळ्यावर तो एक वाटी उलटी करायचा आणि तो ढीग तोंडाची गुहा उघडुन आत सोडुन द्यायचा.... धडाम...!
प्रत्येक घासाला होणारा मच्याक-मच्याक आवाज आणि दर तीन घासानी त्याचा 'आसमंत हदरवुन टाकणारा' ढेकर ह्यानी मला मळमळायला लागलं..... हॉटेलचा नियम तो तंतोतंत पाळत होता. तो आनंद घेत होता आणि तेही काहीही वाया न घालवत... अगदी त्या गुहेच्या दरवाज्यातुन निसटलेला एखादा रस्श्याचा ओघळही त्याच्या हनुवटीवरुन खाली कोसळला तरी त्याच्या मांडीपर्यंत पोहचायच्या आधिच तो झेलायचा आणि चाटुन टाकायचा....     

माझ्या सहनशक्ती आणि स्मरणशक्तीनी तर साथ सोडलीच होती आणि आता मी फक्त पचनशक्तीच्या भरवशावर जिवंत राहु शकलो असतो. पण तो भाताचा डोंगर फोडुन मी चमच्यात २०-२२ शीतं घेतली आणि मनाचा हिय्या करुन तोंडाशी आणली की तो बकासुर अर्वाच्य ढेकर द्यायचा आणि माझा चेहरा, आवेश आणि चमचा गळुन पडायचा.... ह्या गतीनी मला तो भात संपवायला सात महिने तरी लागले असते.

काहितरी करणे अपरिहार्य होते. तेवढा भात खाणं तर शक्यच नव्हतं. तेवढा काय केवढाच भात खाणं शक्य नव्हतं. मी एक मध्यम आकाराचा गोळा केला, पानाबाहेर ठेऊन त्याला नमस्कार केला आणि मोठ्यांने म्हणालो की, "देवाला !!" हे पाहुन मालक प्रसन्न हसले आणि माझा एक घास खपला होता....मग काही गोळे मी ह्या पुढील देवतात नमस्कार करुन वाटुन टाकले.
एक देवीदेवता, एक वास्तुदेवता, एक नागदेवता, एक गृहदेवता, एक निसर्गदेवता, एक कामदेवता, एक दामदेवता, एक ग्रामदेवता, एक अग्नीदेवता, एक वायुदेवता, एक सुर्यदेवता, एक वरुणदेवता, एक तरूणदेवता, एक बालदेवता, एक कालदेवता, एक जलदेवता, एक फलदेवता, एक फुलदेवता, एक कुलदेवता, एक कुळदेवता, एक मुळदेवता, एक खोडदेवता..... दोन जोडदेवता .... एक..... (ह्या पुढे काही सुचेनाच हो.... मग शेवटचे चार... रमेश देवता, सीमा देवता, अजिंक्य देवता आणि कपिल देवता...... म्हणुन ती चित्रावत संपवली. पण ह्यात २८ गोळे संपले होते.)

.....तरी अजुन बराच भात राहिला होता.

Offline dhundravi

  • Newbie
  • *
  • Posts: 34
Re: जहॉं मेरी कश्ती डुबी...
« Reply #2 on: April 15, 2010, 09:10:36 PM »
.....तरी अजुन बराच भात राहिला होता. मी भाताची शीतं केळीच्या पानांच्या रेषा आहेत अशी सजवायला सुरवात केली. त्या हिरव्यागार केळीच्या पानावर ह्या पिवळ्या रेषा एकदम उठुन दिसत होत्या... (मग तुम्हाला काय वाटलं.... पांढरा होता भात ? छे.....!!)
एकेक वाट्या गट्टागट घशात रिकाम्या करुन प्रत्येकाखाली एकेक छोटा गोळा सरकवला. त्या बकासुराचं लक्ष नाहीये असं वाटुन २ गोळे त्याच्या पानात सरकवले. त्यानी ते करताना पाहिलं म्हणुन अजुन २ सरकवले. इतकं केल्यानंतरही दोन ओंजळ भात राहिलाच होता आणि तो आनंद पोटातच ढकलावा लागणार होता.... पण आधिच त्या वाट्यावर वाट्या रिचवल्यानी तो ........आनंद पोटात माझ्या माईना रे माईना !

भात आत जायला विरोध करत होता, मी जबरदस्ती करत होतो. आधि तोंडावर, मग गळ्यावर, मग छातीवर आणि नंतर पोटावर अश्या क्रमाने बुक्क्या मारल्या की जायचा खाली..... पण हळुहळु करत ट्रॅफिक जाम होतं गेलं आणि आतली शीतं बाहेर डोकवायला लागली. देवाची कृपा की भात संपला होता आणि मी युद्ध जिंकलो होतो....  मी युद्ध जिंकलो होतो.... मी युद्ध जिंकलो होतो....

पण इतक्यात तो दुःशासन पुन्हा एक परात घेऊन आला आणि शेवतचा वार करत म्हणाला, "राईस ?". त्यानी राईस म्हंटल्या बरोब्बर राईसची एक प्रचंड लाट पोटातुन वर उसळुन आली आणि..... "ब्ळोगळ्ळ्ळ्ळोळोळोभडऑक्ळ्ळ्ळ्ळ ड्ळळ्ड्श्ळ्श्ळ्ळश्ळ्श्ळॆळळॆळ्र्व्व्ळ्र्व्ल्ळ्ळ्व्र्ल र्ळ्ळ्ळ्ळ्ळ्भ्ळ्क्भ्ळ्क्भ्ळ्क"

आता रिकाम्या पोटी मला बरं वाटत होतं. मग मला भगवान श्रीकृष्णांची गीता आठवली. "तुम क्या लाये थे, जो तुमने खो दिया?..... जो लिया यॅहिसे लिया, जो दिया यॅहिपे दिया.... क्यु व्यर्थ चिंता करते हो.... जीवन यही है...."

.....मी 'जीवन' शोधत मोरीकडे गेलो.

बकासुर तिसरा डोगर संपवुन शेवटच्या पठारावर आला होता. मी सरळ जाऊन मोरीत अंघोळीला बसलो. कसेबसे चार थेंब नळातुन बाहेर पडले आणि पाणी संपलं. सहनशक्ती, स्मरणशक्ती आणि पचनशक्ती....  आणि आता नशिबाचा दगा..... !

माझा त्या थाळीवर, त्या मालकांवर, त्या वाढप्यावर राग नाहीये... वो तो गैर थे !
राग नशीबावर....ते तर माझंच होतं ना ? पण माझ्याच नशिबाच्या फे-यात अडकुन मी पार लुटलो होतो.... दुर्दैवाच्या भोव-यात अडकुन मी पार बुडलो होतो. दुःख लुटण्याचं किंवा बुडण्याचं नव्ह्तं हो.... दुःख ह्याचंच की.... 

मुझे तो अपनोंने लुटा... गै़रोंमे कहॉं दम था....
जहॉं मेरी कश्ती डुबी...  वहॉं पानी बहोत कम था...

धुंद रवी. 

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: जहॉं मेरी कश्ती डुबी...
« Reply #3 on: April 19, 2010, 05:52:34 PM »
 :D :D :D

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: जहॉं मेरी कश्ती डुबी...
« Reply #4 on: April 20, 2010, 10:32:40 AM »
hehehehe  :) ;) :D :D :D
laich bhari lekh aahe ha.......... :) thanks for sharing......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):