"या जगात कोणी अज्ञानी नसतो. सगळ्यांना सगळं कळतं. फक्त काही काही गोष्टी मुलांना कळणं आणि मुलींना कळणं यात फरक आहे या जगात. मुलांना पहिल्या वेळी गोष्टी नाही कळाल्या तरी नंतर त्या कळायला हजार संधी मिळतात. प्रेमाच्या बाबतीत मुलीसाठी पहिलीच संधी शेवटची असते. मुलं मागचं सगळं विसरून परत दुसर्या मुलीवर प्रेम करू शकतात. कारण मी तुला मघाशी म्हणालो ना? मुलं प्रेम करतंच नाहीत. मुलं फक्त आरसे असतात. त्यांना दुसरी कोणी तेवढाच जीव लावणारी मिळाली तर मग त्यांना तिच्याशी जुळवून घ्यायला फार जड जात नाही. कारण त्यांना प्रेम करायचंच नसतं त्यांना फक्त गोष्टी रिफ्लेक्ट करायच्या असतात. पण मुलीसाठी तसं नसतं तिच्यासाठी प्रेम धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं तिला ते एकदा कोणावर केलं की मग परत दुसर्या कोणावर जीव लावायला परत नाही घेता येत. तिचं ह्रदय एकदा तिच्यापासून गेलं की मग गेलंच. त्यामुळे जर हारणारंच असशील तर मग अजून एक घर पुढे जाऊ नकोस. जेव्हा चेकमेट होशील तेव्हा तुझ्या आजूबाजूला कोणीच नसेल आणि कोणी असलं नसलं तरी तुझा आवाज कोणालाच ऐकू येणार नाही. मन काचेपेक्षा जास्त नाजूक असतं. ते तुटल्यावर ना आवाज येतो ना काचा दिसतात. फक्त जखमा आतल्या आत आयुष्यभर वहात राहतात. हे सगळं तुला सांगायचं कारण म्हणजे तू बाकीच्यांसारखी नाही आहेस. ज्यांच्या आयुष्यात हजार जण येतात आणि जातात. हजार आले गेले नाहीत तरी त्यांना हजार प्रपोज करून जातात. त्यांना स्वतःचं मन शाबूत ठेवून दुसर्यांच्या मनाची मोडतोड कशी करायची ते चांगलं ठाऊक असतं. स्वतःला जखमी न करता दुसर्याच्या मनाशी कसं खेळायचं ते त्यांना चांगलं कळतं. तू त्यांच्यात नाही आहेस. आत्ताचा मुलगा तुझ्या आयुष्यातला पहिलाच मुलगा आहे आणि कदाचित शेवटचाच मुलगा असेल. तुला दुसरी संधी कधीच मिळणार नाही आहे. उरलेलं सारं आयुष्य त्या ह्र्दय माणसाला उधार दिलेल्या ड्रॅगनसारखंच जगावं लागेल. नशीबाचे पण फटकारे सहन करावे लागतील आणि ज्याला ह्र्दय दिलं त्याचे पण फटकारे सहन करावे लागतील. सहन करू शकशील नंतर?"
- 'अरण्यरुदन' या नवीन कादंबरी मधून