निशा..
एका छोटुश्या गावात राहणारी निशा..आणि तिचे आई बाबा .. घर तसं छोटंसंच.. शेताच्या अलीकडे बांधलेली एक झोपडी.. तिचा काहीसा भाग पावसाळ्यात पडलेला..मोलमजुरी करून कसे बसे जगणे त्यांचे..बाप दारूत वाया गेलेला..घरात लक्ष नसायचं.. निशा तशी खूप हुशार.. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शाळेत जाणे तिला शक्य नव्हते..हातावरचं पोट बिचाऱ्यांच..डिसेंबर महिना आणि त्यात शेतं ओसाड पडलेली..कठीण परिस्तिथी आली होती त्यांच्या नशिबी..तरी पण आईने हार मानली नव्हती..तिने तिचं शिवणकाम परत सुरु केलं. जुनी मशीन होती तिची दुरुस्ती करून तिने कामाला सुरवात केली होती. कसेही करून निशाला दिवसातून दोन वेळेला तरी ती जेवू घालायची...अंगानी सडपातळ.. कपाळावर मोठं कुंकू.. अंगावर एक पण दागिना नाही... हिरवं लुगडं नेसलेली..असं काहीसं तिचं वर्णन..जीवाचं रान करून निशाला मोठ करायचं हेच तीच स्वप्न..
निशा म्हणजे एक बोलकी बाहुली होती..लुकलुकणारे डोळे, सदैव खटयाळ हसू गालावर...गप्पा गोष्टीत तर ती सगळ्यात पुढे असायची.. प्रत्येक गोष्टीत आईला मदत करायची.. सगळ्यांची लाडकी अशी निशा, सदैव तिच्या एक हात मोडलेल्या बाहुली बरोबर गप्पा गोष्टीत रंगलेली असायची...कसे बसे दिवस जात होते.. शेतांची झालेली उधळण आणि शिवणकामात सुधा असलेली मंदी अश्यात तीची आई एका बिकट प्रसंगात सापडली.. एकदा घरात काहीच नव्हतं आणि आज रात्रीच्या जेवणाचं काय? हाच प्रश्न आईला सतत खिन्न करत होता..संध्याकाळची वेळ, तिने धीर केला नि मनाशी काही ठरवून ती निशाला म्हणाली "निशा, मी जगन काका कढे जाऊन येते.. तोवर तू खेळत बस." निशा आपल्या बाहुली सोबत खेळायला बसली.. तशी तिच्या जेवणाची वेळ जवळ आलीच होती.. आणि तिला भूक पण लागलीच होती.. इथे आईच्या मनात काहूर .. जगन काका तसे मनाने श्रीमंत माणूस.. पण त्यांची पण परिस्थिती हलाखीची झाली होती..पावसाने हाती आलेलं पीक खाऊन टाकलं होतं.. तरीही आईने विचार पक्का केला आणि आशेने ती जगन काकांच्या घरच्या दिशेने निघाली.. मनात तिच्या एकचं विचार.. कसेही करून निशासाठी आजच्या पुरता एक वाटी भात मिळावा.. ती जगन काकांकडे आली.. त्यांना तिचा चेहरा पाहताच सर्व कळून गेलं होतं.. ते म्हणाले,"म्या आणि आमचं बिर्हाड सकाळपासनं उपाशी हाय बघं..दोन मक्याची कणसं हाताला लागलीत.. पण ती सोन्या साठी ठेवलीती बघं.. एक निशेसाठी घिवून जा हवं तर.." काकांचा तो उदास स्वर ऐकून आई तिथून तशीच निघाली.. डोळ्यातले अश्रू लपवत तिने अजून दोन चार घरांकडे धाव घेतली..पण तिला कुठूनही एक वाटी तांदूळ मिळवता आले नाही.. ती संपूर्णपणे हताश झाली.. तिचा जीव कावरा बावरा झाला.. माझी निशा आज उपाशी राहणार.. या चिंतेने ती हिरमुसली होती.. आता घरी तरी कोणत्या तोंडाने जाऊ ? .. वाण्याकडे तरी कोणत्या तोंडाने जाणार होती ती..त्याच्या कढे आधीच इतकी थकबाकी झाली होती आणि नवरा असा दारूत उध्वस्त झालेला.. स्वतःच्या नशिबावर ती रडायला लागली.. क्षणभर तिने विचार केला आणि मग घरी जाण्याचा निर्धार केला....घरी येताच..निशा तिला बिलगली... नि म्हणाली "आई! बर झालं तू लवकर आलीस.. मला ना भूक लागली आहे गं...माझ्यासाठी काय खाऊ आणलास हां?" बस आईने सावरलेला हुंदका..पुरासारखा फुटला.. तिच्या डोळ्यात अश्रूंच्या जलधारा.. निशाने पुन्हा विचारलं "आई! तू का बर्र रडते आहेस? खाऊ नाही मिळाला का?" आई ने निशाला कवटाळलं आणि रडत रडत सांगितलं, "निशा ! तुझ्या आईला आज तुझ्यासाठी खाऊ नाही मिळाला गं"..आईची हळहळ पाहून निशाच्याही डोळ्यात पाणी आले.. आपल्या इवलुश्या हाताने आईचे डोळे पुसत पुसत ती म्हणाली.. " आई, मलाना आज भूकच नाहीये गं.. आज दुपारीच खूप जेवले.. मला नकोये खाऊ..!" आणि नंतर तिचं खट्याळ हसू.. आई चक्क विरघळली.. तिने तिला कुशीत सामावून हुंदका सावरला... त्या दिवशी आई आणि निशा दोघे ही उपाशीच झोपले..
दिवस गेले.. डिसेंबर चा महिना जवळ आला.. आणि नाताळ येऊन ठेपला.. मैत्रिणींचं ऐकून निशाचं सकाळपासूनचं चाललं होतं.. " आई तुला माहिती आहे का?? आज च्या दिवशी सांताक्लोज मुलांच्या सार्या इच्छा पूर्ण करतो.. आपण की नई मोजा खिडकीला लटकावयाचा.. नि मग सांताक्लोज येऊन आपल्याला हवं ते त्यात ठेवून जातो...किती छान ना?" आईने रागाच्या स्वरात म्हंटल "निशे.. नको हा बावळटपणा ! कोण सांताक्लोज? कुठून येणार?" निशा म्हणाली "अगं, आई तो न आकाशातून येतो.. आणि आपण झोपी गेल्यावरचं येऊन हळूच भेटवस्तू टाकून जातो.. श्या..!! तुला तर काही माहितीचं नाही.. मी आज खिडकीला मोजा टांगणार.. मग बघच तू.. सांता मला काय भेट देतो ते.. !!" तिने भुवया उंचावत उत्साही नजरेने पाहिलं.. आई थोडी उदास झाली.. ती विचार करू लागली.. आता मोज्यात मी ठेवू तरी काय? हिच्या आवडीचं.. ? आणि मी काही ठेवलंच नाही तर.. तिला किती वाईट वाटेल? काय अवस्था होईल बिचारीची.... तिचं तिलाच कळत नव्हतं काय करावं ते.. आणि तिच्याकडे असं काहीच नव्हतं जे ती निशा ला देऊ शकेल.. तिने शेवटी काही न टाकण्याचा निर्णय घेतला.. पण आईच मन.. तिलाच खायला उठलं.. रात्रीच जेवण उरकून झोपण्याची तयारी केली.. निशा ने आईला न जुमानता मोजा टांगला.. आईने पाहिलं.. नि काळजीत मग्न होऊन ती झोपण्याचा प्रयत्न करत होती...बराच वेळ ती निशा कडे पाहत होती..आणि मग..डोळ्यातून नकळत अश्रू ढाळत होती...नंतर तिला झोप कधी लागली ते कळलेच नाही.. सकाळी सकाळी.. निशाचा ओरडण्याचा आवाज ऐकून ती जागी झाली.. "आये! उठ ना.. गं !!, आपण पाहू चल.. सांता अंकल ने त्यात काय ठेवलंय ते.." आई थोडी खिन्न झाली.. कारण तिला माहिती होतं यात काही नाहीये ते.. तिने तिच्या हट्टासमोर..माघार घेतली.. आणि ती मोज्याजवळ आली.. नि म्हणाली.. तूच बघना काय ठेवलंय ते तुझ्या सांता अंकल ने .. निशा ने मोजा उघडला.. आणि जोरात उड्या मारू लागली ...."आई! बघ बघ.. सांता अंकल ने मला हवं तेचं मला दिलं.." आईने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली.. " काय??.." मोजा उघडताचं ..तिला त्यात एक ब्लाउझपीस दिसला.. ती म्हणाली.. " मला आईला द्यायला काहीतरी हवं होतं नि सांता अंकल ने नेमकं तेच दिलं..!!" आईच्या डोळ्यात पाणी आलं.. तिने ओळखलं होतं की निशानेच ब्लाउझपीस टाकला होता.. ते पाहून आईने तिला घट्ट मिठी मारली..निशा मिठीत येऊन म्हणाली ...”आई गं, तु दिलेल्या खाऊचे पैसे जमवून मी आणलं होतं”... आई म्हणाली "गुणी गं माझी निशा!" घट्ट मिठी अजून घट्ट झाली आणि तिने डोळ्यातलं पाणी पुसलं.
लेखक - अमित दोडके
पहिल्यांदा लिहण्याचा प्रयत्न केला आहे - आपले अभिप्राय कळवा