Author Topic: एक अशी रसिका...  (Read 1275 times)

Offline अमोल कांबळे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 101
  • Gender: Male
  • मी माझा मैत्रेय!
    • मी माझा मैत्रेय!
एक अशी रसिका...
« on: July 10, 2011, 12:40:15 PM »बऱ्याचदा कलाकाराचं मूळ व्यक्तिमत्त्व आणि त्याचा अभिनय यामध्ये कमालीची तफावत आढळते. फार मोजक्या कलाकारांची वृत्ती, त्यांचा स्वभाव त्यांच्या कामात उतरलेला दिसतो. अशांच्या यादीत रसिकाचं नाव खूप वरचं होतं. एक अभिनेत्री म्हणून आणि एक स्त्री म्हणून तिच्यातले गुण वेगवेगळे करणं केवळ अशक्य.

कोणत्याही चौकटीत न बसणारी अत्यंत बिनधास्त अशी रसिका अनेकांशी फटकून वागायची. पण, मला तिच्या वृत्तीचा तो सकारात्मक माज वाटतो. या स्वभावामुळे तिचं अंतरंग लगेच कळायचं नाही. दुनियेशी वागण्याचा तो तिचा अॅटिट्युड होता. या स्वभावामुळेच हिंदी सिनेमा-सीरिअल करताना ती कधी बुजली नाही. मला आठवतंय, कॉलेजमध्ये असताना तिने एक एकांकिका केली होती. त्यातलं तिचं कॅरेक्टर काहीसं पुरुषी होतं. पण तिने कोणताही मुलाहिजा न बाळगता ते निभावलं. त्या स्पधेर्ची मी परीक्षक होते. मी तिला बक्षीस दिलं की नाही, ते नाही आठवत आता. पण तिचं काम मात्र नंतर बराच काळ मनात राहिलं होतं. १९९३ मध्ये ती यू टीव्हीचा एक शो करायची. त्यावेळी मी 'लाइफ लाइन'ची तयारी करत होते आणि आमच्या अशाच गप्पा सुरू झाल्या. त्यावेळी रिसेप्शनिस्टच्या एका छोट्या भूमिकेसाठी मी तिला विचारलं. तिनेही होकार दिला. खूप चामिर्ंग रोल होता तो. त्यातून ओळख वाढली. पुढे गजेंद अहिरेचं 'उंच माझा झोका गं' हे नाटक मी करत होते. एखाद्या मॉडेलसारखी दिसणारी मुलगी आम्हाला त्यात हवी होती. अनेक मुली पाहिल्या. काही सुंदर होत्या. पण त्यांना अभिनय येत नसायचा. काहींचा अभिनय चांगला असायचा, पण मॉडेलला लागणारा बोल्डनेस त्यांच्याकडे नव्हता. त्यावेळी रसिकाचं नाव माझ्या डोक्यातही नव्हतं. पण निर्मात्या लता नावेर्कर यांच्यासोबत सहज गप्पा मारताना वेगळ्या संदर्भात तिचा विषय निघाला आणि रसिका नावाची एक मुलगी कशी गोड, बिनधास्त आहे, हे मी त्यांना सांगत होते. त्यातून तिलाच या भूमिकेसाठी बोलावायचा निर्णय झाला. कारण, तिच्या व्यक्तिमत्त्वात असलेली धडपड.. एक रेस्टलेस एनजीर् या नाटकातल्या 'मनी'ला हवी होती. त्यानिमित्ताने ती मुंबईत आली आणि सुरुवातीचे सात-आठ महिने माझ्या घरीच राहिली.

या काळात तिला जवळून अनुभवता आलं. बॉण्डिंग वाढलं. आमच्या वयात अंतर होतंच. ती लहान होती. त्यामुळे मी तिच्यावर आईपणा गाजवायचे. मुंबईत ती नवखी होती. त्यामुळे मी नेहमी तिला शिस्त लावण्याचा प्रयत्न करायचे. पण माझ्या शिस्तीच्या चौकटीच्या पलीकडे ती होती. अगदी बिनधास्त! प्रत्येक गोष्टीकडे तिची बघण्याची पद्धत, तिचा दृष्टिकोन हे कमालीचं वेगळं असायचं. समोर आलेल्या व्यक्तिमत्वांमधलं किंवा वाट्याला आलेल्या भूमिकांचं ती मर्म शोधायची. यातूनच तिला काल्पनिक कॅरेक्टर्स सापडायची. म्हणजे आपापसात बोलताना, आम्हाला सांगून ती एखाद्या भूमिकेत शिरायची. त्या भूमिकेत राहून ती इतरांशी बोलत रहायची. अशावेळी आजुबाजूच्यांनी तिच्याशी सीरिअसली बोलत रहायचं आणि 'त्या' कॅरेक्टरमध्ये घुसलेली ती सर्वांना उत्तर द्यायची. मी तिला बऱ्याचदा असं कॅरेक्टर उभं करायला सांगे. अशावेळी मी तिला ते मनोरंजनासाठी सांगते की काय असं वाटायचं. पण नंतर मी तिला त्याचं कारण सांगितलं. रसिकाला ते कॅरेक्टर दिसायचं. त्याची देहबोली, बोलण्याची स्टाइल हे सारं आत्मसात करतानाच, त्या कॅरेक्टरची दुखरी नस ती पकडायची. त्या कॅरेक्टरमध्ये घुसून तिचं आयुष्य ती उलगडून दाखवे. एक दिग्दशिर्का म्हणून मला तिची ही खुबी खूप महत्त्वाची वाटायची.

गेल्या काही वर्षांपासून ती हिंदी सिनेमा-मालिकाही करत होती. तिथे काम करताना येणारे अनुभव ती नेहमी आम्हाला सांगायची. कळत-नकळत अशा कामांचा प्रभाव तिच्यावर पडायचा. तिने कधीच कुठल्या कामाची तक्रार केली नाही. एखादं काम नाही आवडलं, तरी 'बोअर झालं जाम', या वाक्यापलीकडे ती कधीच गेली नाही. कित्येकदा संध्याकाळी-रात्री तिचा फोन यायचा. मी कामात असले, तरी पाच मिनिटं येऊन जाते, असं ती सांगायची. यावरून तिच्या मनातलं काहीतरी तिला सांगायचंय, हे कळायचं. 'प्रपंच'मध्ये तिचं मूळ कास्टिंग नव्हतंच. पहिला एपिसोड पाहिल्यावर तिने तिच्या रोलबद्दल विचारलं. मी म्हणाले, अगं तू नाहीयेस यात. 'असं कसं? तुझी सीरिअल आणि मी नाही?', असा तिचा आपुलकीचा थेट पण धारदार प्रश्न. मी तिच्यासाठी 'प्रपंच'मध्ये नवा रोल घातला. अर्थात, तिने त्याचं सोनं केलं. त्यामुळे त्या सीरिअललाही खूप फायदा झाला.

गेली अनेक वर्षं तिच्यावर आजाराची टांगती तलवार होती. पण, तरीही तिने काम सुरू ठेवलं. अभिनयासोबत ती उत्तम लिहायचीसुद्धा. 'यंदा कर्तव्य आहे', 'व्हाइट लिली..'मधून तिचं लिखाण आपण पाहिलंच. आपल्यातल्या लेखिकेची ओळख तिला खूप लवकर व्हायला हवी होती, असं मात्र मला मनोमन वाटतं. अत्यंत संवेदनशील तरीही कणखर असणारी ही मुलगी एक वेगळं युनिक रसायन होती.

प्रतिमा कुलकर्णी

Marathi Kavita : मराठी कविता

एक अशी रसिका...
« on: July 10, 2011, 12:40:15 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):