[size=-1]Black Hole : CH-1: ती विहिर
संध्याकाळची वेळ. एक मोठा जुना वाडा.. सुर्य नुकताच पश्चीमेकडे मावळला होता आणि आकाशात अजुनही त्याच्या मावळण्याची चिन्ह दिसत होती. वाड्याच्या समोर थोडं मोकळं पटांगण होतं. आणि त्या पटांगणाच्या पलिकडे दाट झाडी होती. हवा जोरात सुटली होती आणि त्या हवेच्या झोताप्रमाणे ती आजुबाजुची झाडे डोलत होती. वाड्याला लागुनच एक अरुंद जुनी विहिर होती. त्या विहिरीच्या भोवतालीसुध्दा गवत चांगलं उंच उंच वाढलेलं होतं. त्यावरुन असं जाणवत होतं की ती विहिर बऱ्याच वर्षांपासून कुणी वापरलेली नसावी. त्या वाड्यापासून काही अंतरावरच नजर टाकल्यास एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटी वस्ती वसलेली दिसत होती. त्या वस्तीतली लोक सहसा या वाड्याकडे फटकत नव्हती.
त्या वस्तीतलं एक निग्रो पोर फ्रॅक, वय साथारणत: सात-आठ वर्षाचं, दिसायला गोंडस. आपल्या वासराला चरायला घेवून तिथेच त्या वाड्याच्या आजुबाजुच्या शेतात आलं होतं. त्या वासराचीही त्याच्यावर माया दिसत होती. फ्रॅंकने त्याला चुचकारताच तो समोर उड्या मारत धावायचा आणि फ्रॅंक त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावू लागायचा. असं धावता धावता ते वासरु त्या वाड्याच्या आवारात शिरलं. फ्रॅंकही त्याच्या मागे मागे त्या आवारात शिरला. त्या वाड्याच्या आवारात शिरताच फ्रॅंकचं अंग शहारल्या सारखं झालं, कारण त्याला घरुन सांगणं होतं की कधीही त्या वाड्याच्या परिसरात जायचं नाही. पण त्याचं वासरु समोर त्या परिसरात शिरल्यामुळे त्याला जाणं भाग होतं.
तो वासराच्या मागे धावता धावता ओरडला, '' गॅव्हीन ... थांब''
त्याच्या घरचे सगळेजण त्या वासराला प्रेमाने 'गॅव्हीन' म्हणायचे.
एव्हाना ते वासरु त्या आवारात शिरुन, पटांगण ओलांडून त्या वाड्याला लागुनच असलेल्या विहिरीकडे धावायला लागलं.
'' गॅव्हीन तिकडे जावू नको ... '' फ्रॅंक पुन्हा ओरडला.
पण ते वासरु त्याचं काहीही ऐकायला तयार नव्हतं.
ते धावत जाऊन त्या विहिरीभोवती जो खडकाचा ढिगारा होता त्यावर चढलं.
आता फ्रॅंकला त्या वासराची काळजी वाटायला लागली होती. कारण त्याने गावात त्या विहिरीबद्दल नाना प्रकारच्या भितिदायक कथा ऐकलेल्या होत्या. त्याने ऐकलं होतं की त्या विहिरीत पडलेला कोणताही प्राणी प्रयत्न करुनही कधी परत आलेला नाही. आणि जे कोणी त्या प्राण्यांना काढण्यासाठी त्या विहिरीत उतरले होते तेही कधी परत आले नव्हते. म्हणूनच कदाचित गावातले लोक त्या विहिरीला 'ब्लॅक होल' म्हणत असावीत. फ्रॅंक जागच्या जागी थांबला. त्याला वाटत होतं की आपण मागे धावल्यामुळे कदाचित ते वासरु पुढे पुढे पळत असावं. आणि असंच जर ते पुढे पळालं तर ते नक्कीच त्या विहिरीत पडणार होतं.
फ्रॅंक जागच्या जागी जरी थांबला तरी ते त्या खडकाच्या ढिगाऱ्यावर चढलेलं वासरु खाली उतरायला तयार नव्हतं. उलट ते त्या ढिगाऱ्यावर चालत त्या ब्लॅकहोलभोवती गोल गोल चालायला लागलं.
फ्रॅंकला काय करावं काही कळत नव्हतं. त्याने तिथे थांबलेल्या परिस्थीतीतच सभोवार एक नजर फिरवली. त्या वाड्याच्या उंच उंच जुन्या भयाण भिंती आणि आजुबाजुला पसरलेली दाट झाडं. त्याला आता भिती वाटायला लागली होती. आतापर्यंत तो या वाड्याबद्दल आणि त्या ब्लॅकहोबद्दल नुसता ऐकून होता. पण आज तो प्रथमच तिथे त्या आवारात आला होता. लोकांच्या म्हणण्यानुसार खरोखरंच ते सगळं कसं भयाण होतं. किंबहुना लोकांकडून ऐकल्यापेक्षा त्याला ते जास्त भयाण वाटत होतं. पण त्याचा त्या वासरावर एवढा जीव होता की तो त्याला तिथे तसंच एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. एव्हाना हळू हळू चालत फ्रॅंक त्या विहिरीजवळ जावून पोहोचला. फ्रॅंक त्या विहिरीच्या अलिकडच्या काढावर होता तर ते वासरु खडकावरुन चालत जावून दुसऱ्या काठावर पोहोचलं होतं. तेवढ्यात त्याने बघितलं की त्या खडकाच्या ढिगाऱ्यावरुन चालता चालता त्या वासराच्या पायाखालचा एक मोठा दगड घसरला आणि घरंगळत विहीरीत जावून पडला.
'' गॅव्हीन... '' फ्रॅंक पुन्हा ओरडला.
एवढा मोठा दगड त्या विहिरीत पडला तरी आत काहीही आवाज झाला नव्हता. फ्रॅंकने काठावर उभं राहून खाली विहिरीत डोकावून बघितलं. खाली विहीरीत एका अंतरापर्यंत विहिरीचा काठ दिसत होता. पण नंतर ना काठ, ना पाणी ना विहिरीचं बुड, नुसती काळी काळी न संपणारी भयानक पोकळी दिसत होती. कदाचित हेही एक कारण असावं की लोक त्या विहिरीला 'ब्लॅकहोल' म्हणत असावीत. अचानक त्याने बघितले की पुन्हा त्या वासराच्या पायाखालचा अजुन एक दगड सरकला आणि घरंगळत विहिरीत जावून पडलां. पण हे काय त्या दगडाबरोबरच ते वासरुसुध्दा विहिरीत पडू लागलं होतं.
'' गॅव्हीन...'' फ्रॅंकच्या तोंडून निघालं.
पण तोपर्यंत तो दगड आणि ते वासरु विहिरीत पडून त्या भयानक काळ्या पोकळीत गुडूप झाले होते. ना पडण्याचा आवाज ना त्यांच्या अस्तित्वाचं कोणतही चिन्ह.
फ्रॅंक कावरा बावरा झाला. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं.
तो विहिरीत वाकुन ते वासरु दिसेल या वेड्या आशेने पाहत होता आणि जोरजोराने ओरडत आणि रडत होता, '' गॅव्हीन ... गॅव्हीन...''
बराच वेळ फ्रॅंक तिथे विहिरीच्या काठावरुन आत डोकावून पाहत रडत होता. रडता रडता त्याचे अश्रू सुकले होते. आता त्याच्या लक्षात आले होते की त्याचा प्रिय गॅव्हीन आता कधीही परत येणार नव्हता. आता थोडं अंधारुही लागलं होतं आणि तो वाड्याचा आणि विहिरीचा परिसर त्याला जास्तच भयानक जाणवू लागला. तो आता तिथून विहिरीच्या काठावरुन उठला आणि जड पावलाने आपल्या घराकडे परत जावू लागला.
फ्रॅंक वाड्यापासून थोड्याच अंतरावर पोहोचला असेल त्याला मागुन कशाची तरी चाहूल जाणवली. एक भितीची लहर त्याच्या सर्वांगातून गेली. तो भराभर पावले टाकीत तिथून शक्य होईल तेवढं लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात त्याला मागुन आवाज आला. तो क्षणभर थबकला.
हा तर आपल्या ओळखीचा आवाज...
मोठ्या हिमतीने त्याने मागे वळून पाहाले.
आणि काय आश्चर्य त्याच्यामागुन त्याचं वासरु 'गॅव्हीन' 'हंबा' 'हंबा' करीत धावत येत होतं.
त्याच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहू लागला.
'' गॅव्हीन... '' त्याच्या तोंडातून आनंदोद्गार निघाले.
पण हे कसं झालं?...
हे कसं झालं त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्या क्षणी त्याला त्याचं प्रिय वासरु गॅव्हीन परत मिळालं होतं ह्या पलिकडे काहीही नको होतं. त्याने आपले हात पसरवुन त्याच्याकडे धावत येणाऱ्या वासराला मिठी मारली. आणि तो त्याचे लाडाने आणि आनंदाने पटापट पापे घ्यायला लागला.
[/size][size=-1]
Books - Marathi Novels - Black Hole / CH:2 जाकोब[/size][size=-1]
सकाळची वेळ.. सुर्याच्या उगवण्याची नुकतीच चाहूल लागलेली. त्यातच एक सुंदर हिरव्यागार हिरवळीने वेढलेली छोटीसी कॉलनी. आणि त्या कॉलनीत वसलेली छोटी छोटी टूमदार घरं. कॉलनीतलं वातावरण कसं सकाळच्या मांगल्याने आणि उत्साहाने भरुन गेलं होतं. मधूर पक्षांचा किलकिलाट वातावरणात जणू अजुनच स्फुर्ती भरीत होता. कॉलनीतली आणि कॉलनीच्या भोवतालची हिरवीगार झाडे सकाळच्या हवेच्या मंद मंद झुळूकेबरोबर हळू हळू डोलत होती.
जसं जसं उजेडायला लागलं कॉलनीमध्ये आता काही पादचारी दिसायला लागले. सकाळच्या हवेचा आणि मांगल्याचा आस्वाद घेत ते फिरायला निघाले होते. काही जण जॉगींग करतांना दिसू लागले तर काही सायकलीही कॉलनीतल्या रस्त्यावरुन धावू लागल्या.
त्या कॉलनीतल्या बंगल्यांच्या समुहात अगदी मधोमध असलेला एक बंगला. इतर बंगल्याप्रमाणे याही बंगल्याच्या समोर हिरवागार गवताचा लॉन आणि छोटी छोटी फुलझाडे लावलेली होती. त्या फुलझाडांना आलेली फुलं जणू एकमेकांशीच स्पर्धा करीत असावी असं जाणवत होतं. अचानक एक सायकल त्या बंगल्याच्या गेटसमोर येवून थांबली. पेपरवाला मुलगा होता. त्याने पेपरची पुंगळी केली आणि नेम धरुन ती बरोबर बंगल्याच्या दरवाजासमोर फेकली. तो पेपरवाला मुलगा पेपर फेकून आता तिथून निघणार तेवढ्यात दारासमोर एक कार येवून थांबली. कारमधून एक उंच पुर्ण, गोरा, पिळदार शरीर असलेला उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण, जाकोब उतरला. वय साधारण तिसीच्या आसपास असावं. कारमधून उतरल्यानंतर बंगल्याच्या आवाराच्या गेटकडे जाता जाता त्याने प्रेमाने त्या पेपरवाल्याच्या डोक्यात हळूवार एक चपटी मारली. पेपरवालाही त्याच्याकडे पाहून गोड हसला आणि आपल्या सायकल घेवून पुढे निघाला.
बंगल्याच्या आत हॉलमध्ये एक सुंदर पण तेवढीच खंबीर तरुणी, स्टेला फोनचा नंबर डायल करीत होती. तिचं वय साधारण अठ्ठाविसच्या आसपास असावं. तिचा चेहरा नंबर डायल करता करता तसा गंभीरच दिसत होता पण तिच्या चेहऱ्याभोवती एक आभा पसरल्याप्रमाणे जाणवत होती. तिच्या डोळ्याभोवताली दिसणाऱ्या काळ्या कडा ती एवढ्यात कोणत्यातरी गंभीर काळजीतून जात असावी असं सुचवित होत्या. तिच्या बाजुलाच, तिची ननंद, एक एकविस बावीस वर्षाची कॉलेजात जाणारी तरुण मुलगी, सुझान उभी होती. सुझानही सुंदर होती आणि तिच्यात कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलींचा एक अल्लडपणा दिसत होता.
'' कोण डॉ. फ्रॅकलीन बोलताय?'' स्टेलाने फोन लागताच फोनवर विचारले.
तिकडच्या प्रतिक्रियेसाठी थांबल्यानंतर स्टेला पुढे फोनवर म्हणाली, '' मी मिसेस स्टेला फर्नाडीस, डॉ. गिब्सन फर्नाडीसची पत्नी...''
तेवढ्यात डोअरबेल वाजली. स्टेलाने सुझानला कोण आहे हे बघण्यासाठी खुणावले आणि ती पुढे फोनवर बोलू लागली, " नाही हे तुम्ही जे संशोधन करीत होता त्या संदर्भात मी फोन करते आहे...''
सुझान वहिनीने खुणावल्याबरोबार समोर दरवाजाजवळ आली आणि तिने दार उधडले. समोर दारात जो कोणी होता त्याला पाहताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारल्या गेले. दारात जाकोब उभा होता.
'' तु? ... त्या दिवशी ..."'
'' मी... गिब्सनचा मित्र ... स्टेला आहे का आत'' जाकोबने तिचे वाक्य मधेच तोडून विचारले.
सुझानने वळून आत स्टेलाकडे बघितले.
तेवढ्यात संधीचा फायदा घेवून जाकोब आत घुसला सुध्दा. आत येवून तो सरळ स्टेला जिथे फोन करीत होती तिथे हॉलमध्ये गेला. सुझान दारात उभी राहून गांगारल्यागत त्याला आत जातांना पाहतच राहाली. तिला त्याला काय म्हणावे काही सुचत नव्हते.
स्टेलाचे अजुनही फोनवर बोलणे चालूच होते, '' मी कधीतरी पुन्हा तुम्हाला फोन करुन त्रास देईन...''
तिकडचे संवाद ऐकण्यासाठी मधे थांबून ती म्हणाली, '' सॉरी ... ''
पुन्हा ती तिकडचे संवाद ऐकण्यासाठी थांबली आणि, '' थॅंक यू '' म्हणून तिने फोन ठेवून दिला.
तिच्या चहऱ्यावरुन तरी तिने ज्यासाठी फोन केला होता त्याबाबतीत ती समाधानी जाणवत नव्हती. एवढ्यात तिचं लक्ष तिच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या जाकोबकडे गेलं. तिने प्रश्नार्थक मुद्रेने जाकोबकडे आणि सुझानकडे आलटून पालटून पाहाले.
'' हाय.. मी जाकोब ... गिब्सनचा मित्र'' जाकोबने ती काही विचारण्याच्या आधीच आपली ओळख करुन दिली.
'' हाय '' स्टेलाने त्याच्या हायला प्रतिउत्तर दिले.
तेवढ्यात स्टेलाचं लक्ष त्याच्या मनगटावर बांधलेल्या एका चमकणाऱ्या पारदर्शक खड्याकडे गेलं. एवढा मोठा आणि एवढ्या तेजस्वीपणे चमकणारा खडा कदाचित तिने पहिल्यांदाच बघितला असेल. ती एकटक त्या खड्याकडे बघत होती.
'' आपण कधी पुर्वी भेटलो?'' जाकोबने विचारले.
'' मला तर तसं वाटत नाही'' स्टेलाने उत्तर दिले.
'' काही हरकत नाही भेट ही कधीतरी प्रथम असतेच ... मला वाटते गिब्सनने आपली ओळख पुर्वी कधी करुन दिली नाही ... म्हणजे तसी संधीच आली नाही म्हणाना... '' जाकोब म्हणाला.
इतक्या वेळपासून आपण बोलत आहोत पण आपण त्याला साधं बसायला सुध्दा सांगीतलं नाही..
एकदम स्टेलाच्या लक्षात आले.
'' बसाना ..प्लीज'' ती सोफ्याकडे निर्देश करीत म्हणाली.
जाकोब सोफ्यावर बसला आणि त्याच्या विरुध्द दिशेला असलेल्या सोफ्यावर स्टेला बसली की जेणेकरुन ती त्याच्याशी आरामात बोलू शकणार होती.
'' ऍक्चूअली... मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं'' जाकोबने सुरवात केली.
स्टेलाच्या चेहऱ्यावर उत्सुकता पसरली.
सुझान अजुनही तिथेच घूटमळत होती. जाकोबने नजरेचा एक तिक्ष्ण कटाक्ष सुझानकडे टाकला. ती काय समजायचं ती समजली आणि तिथून आत निघून गेली.
मग त्याने बराच वेळ स्टेलाच्या नजरेला नजर भिडवित तिच्या डोळ्यात रोखुन पाहाले.
'' पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावे लागेल'' तो अजुनही तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला.
'' कुठे?'' तिने आश्चर्याने विचारले.
जाकोब आता उठून उभा राहाला. त्याने कोपऱ्यात टेबलवर ठेवलेल्या स्टेला आणि गिब्सन, तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे निरखुन पाहत म्हटले, '' माझ्यावर विश्वास ठेव .... तु एवढ्यात ज्या गोष्टीमुळे एवढी चिंताग्रस्त आहेस हे त्याच संदर्भात आहे ''
तो आता बाहेर दाराकडे जावू लागला.
स्टेला सोफ्यावरुन उठली आणि मुकाट्याने त्याच्या मागे मागे जावू लागली.
क्रमश:...[/size]