Author Topic: मराठी लेख : स्वप्न  (Read 2834 times)

Offline janki.das

 • Jr. Member
 • **
 • Posts: 76
मराठी लेख : स्वप्न
« on: December 28, 2011, 12:46:26 AM »

हि स्वप्न माझी नसून अजय ची आहेत. मी फ़क़्त MK वर share करत आहे...Original Author : http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=16770674425822612824"एक गुपित सांगु का तुला? हसायच नाहीस हं.. "ती म्हणली
"सांग.. नाही हसणार" ..
"अरे काल रात्री, खूप छान स्वप्न पडल होत मला ... संततधार पाऊस पडत होता. मातीचा गंध चहुकडे दरवळ्त होता..
पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब मला वेडावत होता... मी त्या पावसात ओलेचिंब भिजले होते.. माझ्या रोमा-रोमात जणू ओला प्राजक्त फ़ुलून आला होता.. तो पाऊस काही वेगळाच होता..."
ऐकल आणि खूप हसू आल मला... चिडून ती म्हणाली... काय रे, हसतोयस काय असा... तुला पटत नाहिये का? जा, बोलू नकोस माझ्याशी!!!!!!!!!
अग काय सांगु आता.. पटणार नाहीच तुला...... काल मलाही एक स्वप्न पडल होतं.. अगदी वेगळंच.............
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
.............................................................................
काल पहिल्यांदाच........... स्वप्नात मी पाऊस झालो होतो !!! :) :)आज सकाळी चहा पिताना मला हसू आवरेना... त्यावर आई म्ह्टली सुध्दा की, "अरे काय वेड लागलय का? काय हसतोयस असा.. "...
आता काय सांगु आईला, काल मला काय स्वप्न पडलेलं......


"भरून आलेल आभाळ....गार वारा.. मग हलकेच सुरू झालेला,मातीत भिजत गेलेला आणि
मग सगळीकडे दरवळत उठलेला पाऊस..घरात आज आम्ही दोघेच.. एकसंध ऐकू येणारी ती
पावसाची रिमझिम,ती ऐकताना मनाला अनाहुतपणे सापडलेली तरल,मोहक लय.. अशात चहाची तल्लफ़.. मी तिला चहा कर म्हटलेल.. तिने "तूच कर. मलाही ठेव",उत्तर दिलेल..मी खोटखोट चिडून पुन्हा एकदा सांगितल आणि तिच्याकडून पुन्हा तेच उत्तर आलेल.. हळूच गालातल्या गालात हसताना तिला मी चोरट्या नजरेने पाहीलेले...... मग मी खिडकीत येऊन उभा राहिलेलो.. डोळ्यात तो बेधुंद पाऊस आणि तिचा तो हवा हवासा वाटणारा खट्याळपणा अलवार साठवत गेलेलो... ती सुध्दा मग माझ्या जवळ येऊन उभी राहिलेली..आणि "अहाहा,काय भारी वाटतय असा हा पाऊस पहायला.. फ़क्त हातात चहाचा कप हवा होता बास....!!!" म्हणत हसलेली.. आता मात्र न राहावून मलासुध्दा हसू आलेल... आणि मग ती अलगदपणे माझ्या मिठीत शिरलेली... त्यानंतर दोघे मिळून चहा करायला गेलेलो.........................................
.....................................................आणि नेमक तेव्हाच लक्षात आल की घरामध्ये दूध संपलेल..
.
ती,मी आणि बाहेरचा पाऊस त्या गॅस वर उकळणार्या चहाकडे पाहात स्वप्नभर हसलेलो......"कुठेतरी वाचलेल
पहाटेच स्वप्न खर ठरत म्हणून..


रोज पहाटे तुझ स्वप्न पडत..
आणि रोज सकाळी उठल्यावर मी फ़क्त हसतो..
आरशासमोर उभा राहिल्यावर माझ्यातला मी
मलाच समजावत बसतो.."आज नाही तर नाही. उद्या नक्की पुर्ण होईल.."
मी यावर काहीच बोलत नाही..
माझा आणि माझ्या मनाचा का कोण जाणे पण या स्वप्नांवर खूप विश्वास आहे..
आज इतकी वर्ष झाली तरी यात काहीच फ़रक पडला नाहीये..
तू स्वप्नात येणं...
मी माझ्यावर हसणं..
मीच मला समजावणं....
तुझ्या आठवणी,भासांच्या मागोमाग दिवस सरत जाणं..
पुन्हा रात्र होणं...
पुन्हा तू स्वप्नात येणं....
.......................
....................
कुठेतरी खरच वाचलेल मी,
"पहाटेच स्वप्न खर ठरत म्हणून.. "
कुठे वाचलेल बर? ??? ??? ??? ??? ??? ??
.........................................
.........................................
.........
बहुतेक तुझ्या डोळ्यात वाचल होत नक्कीच..... त्याशिवाय
मी कसा विश्वास ठेवीन यावर... तूच सांग....."इतका कसा रे स्वप्नाळू तू ?........ इतकी सुध्दा स्वप्ने पाहू नयेत....
किती रमशील स्वप्नांच्या दुनियेत?" अस माझ्यावर चिडून मला म्हणाली होतीस
आणि............................
...........................................
........................................
.......................................
........................................
......................
प्रत्येक रात्री तुझी असंख्य स्वप्ने अगदी न चुकता माझ्याकडे पाठवली होतीस.....

इतरांसारखच काल माझ मन सुध्दा माझ्यावर......
माझ्या स्वप्नांवर हसलं होत... ..
.................................
....................
.......................
................
.
.
फ़रक इतकाच, काल पहिल्यांदाच स्वप्नात मी
तू माझी होताना पाहील होतं........इतक्या वर्षांनंतर अशी अगदी अचानक भेट होईल


अस खर तर कधी स्वप्नात देखील वाटल नव्हतं...
....
माझ्याकडे डोळे भरून पाहत होतीस... ..


एकसंध बोलत होतीस....


"कसा आहेस रे?......
......
ए आठवतय तुला,
आपण याच ठिकाणी भेटायचो बर्याचदा...


आठवतय तुला,
सकाळी जिथे भेटायचो ती चहाची टपरी....
...
आठवतय तुला,
रोज संध्याकाळी इथेच चौकात एक गजरेवाला यायचा...


आठवत तुला,
तो कॉलेजचा पहिला दिवस.... ती पहिली भेट...
..
आठवत तुला...
....................................
.............................................
........................................
.......................................................
................................................................"
प्रत्येक वाक्यागणिक "आठवतय तुला" विचारता विचारता


बरच काही आठवल होत तुला..................

कोण तू?


काय पाहीजे?"


तुझी स्वप्नं अनोळखी नजरेने
पाहत मला विचारतात


आणि रोज मला त्याना
स्वत:ची ओळख पटवून द्यावी लागते.........
.
.
.
तुझी स्वप्नं सुध्दा खरच...............
अगदी तुझ्यासारखीच आहेत....« Last Edit: December 28, 2011, 12:57:25 AM by janki.das »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline janki.das

 • Jr. Member
 • **
 • Posts: 76
Re: मराठी लेख : स्वप्न
« Reply #1 on: December 28, 2011, 12:47:41 AM »
स्वप्न ८

"इन्किलाब जिंदाबाद.......!!"
"
इन्किलाब जिंदाबाद.......!!"
"
इन्किलाब जिंदाबाद.......!!"
"
इन्किलाब जिंदाबाद.......!!"
"


तुला प्रत्यक्षात बघून खूप दिवस झालेत..

तुझ्या स्वप्नांनी सुध्दा

असहकार चळवळ सुरू केली आहे बघ....
.
.......................................
.
.

.
.......................................
आता तरी येवून जा.
स्वप्न ९

स्वप्न एके स्वप्न
स्वप्न दुणे स्वप्न
स्वप्न त्रिक स्वप्न
.
.
.
.स्वप्न दाहे स्वप्न...

सगळीकडे स्वप्नच स्वप्नं
भरून राहिली आहेत....

त्यामुळे हल्ली
कुठलही अवघड, कठीण, वास्तववादी गणित
सोडवायला घेतल तरी
मला आधीच माहीत असत
की उत्तर शेवटी

’स्वप्न" च येणार आहे.

स्वप्न १०

लाल बुंद
चंद्र,
लाजलेली
सुर्यकोर,
एक अस्खलित
जांभळी..
बोलणारी
फ़ुलं........
दिसणारे
गंध........
मोगर्याच्या
मनात
काही खुललेले
रंग..
सप्तरंगी
धुकं.....
त्यावर पांढरशुभ्र
इंद्रधनु..........
त्याच्या
टोकाला
मग माझं मन
फ़ुलपाखरू
होऊन..
...
...
पुन्हा एक स्वप्न..स्वप्न ११

इकडून तिकडे येरझार्या घालतोय..
आज काहीही झाल तरी
तुझ एकसुध्दा स्वप्न
मी बघणार नाहीये...
मी ठरवलय
अगदी ठाम....पहिल्यांदाच
आज झोपतच नाही
त्यापेक्षा..
म्हणूनच बाहेर
येरझार्या घालतोय..
.
.
रात्री ३ वाजत आले
शेवटी सहज म्हणून
बेडरूम मध्ये आलो,
पाहतो तर................
तुझी असंख्य स्वप्ने
माझी वाट पाहून पाहून
बिछान्यावर निजून
गेली होती......
.
.
.
झोपेत सुध्दा किती सुंदर
दिसतात ही स्वप्नं.............!!!!!!!!!!
निर्मळ.. निरागस....
मी त्यांच्याकडे
बघत राहीलो फ़क्त..
माझी नजरसुध्दा
हलली नाही.....
....................
....................
....................
.....................

कधी सकाळ झाली
कळलच नाही...


स्वप्न १२

दररोज सकाळी
तुझ्या स्वप्नाला
तुझ्याकडे परत
सोडवायला येतो मी.....
जे तुझ आहे
ते तुझ्याकडेच राहील..
तस वचन दिलच
होत..
आज इतकी
वर्षे झाली तरी
गेट मधून आत जाताना
पाणावलेल्या डोळ्यांनी
तुझ स्वप्न
माझ्याकडे एकटक
पाहत राहत......
डोळे ओलेचिंब झालेले असतात
पण अश्रू ओघळत नाहीत...
भावनांना आतल्या आत
दाबून ठेवायला
स्वप्नांना जमायला
लागलय आजकाल
माझ्यासारखच.....
आज ही शेवटची
भेट असेल
कदाचित.......
अस काहीतरी मनात
वाटून जात..
त्या शांततेत
भूतकाळ
गर्दी करू लागतो...
मी मग थांबत नाही तिथे
जातो म्हणत
तिथून निघतो..
आणि दररोज तुझ स्वप्न
रडवेल होऊन म्हणत,
"अरे किती वेळा
सांगितल तुला,
जातो नाही,
नेहमी येतो
म्हणाव म्हणून... "
.
.
.
तुझ्यातल
ते वेडेपण
तुझ्या स्वप्नांनी
जिवंत ठेवलय
अजून..

मला स्वप्नांचा,
माझ्या पेमाचा
गहिवर येतो...Offline janki.das

 • Jr. Member
 • **
 • Posts: 76
Re: मराठी लेख : स्वप्न
« Reply #2 on: December 28, 2011, 12:49:21 AM »
स्वप्न १३

ती खूपच चिडली होती
आज माझ्यावर..
मला म्हटली,
"तुला माझ्यापेक्षा माझी
स्वप्नेच जास्त आवडतात ना...
मला भेटतच जावू नकोस मग तू...
जवळ घेवून बस माझ्या स्वप्नांनाच....
सारख.. स्वप्न.. स्वप्न... स्वप्न.....
मी निघून जाते आता..
तुला माझी गरज नाही उरलीये आता....
अरे हसतोयस काय असा?
मी खरच खूप चिडलीये.........
काय झाल?
का हसतोयस?"

"काही नाही ग...." , मी हसू आवरत म्हटल...
"आधी सांग नाहीतर मी चालले बघ... ",
ती अजून चिडली....
........................................
........................................
"अग काही नाही..
काल अगदी अशीच भांडली होतीस ......
पहाटेची स्वप्नं खरी होतात तर......
... आज पटल मला.. "


स्वप्न १४

आज सकाळ दबक्या पावलांनी
अंगणात येऊन
शांत बसली आहे..

सुर्य उगवलाय आजही
पण आभाळ न रंगवता..

आज तुझ्या आठवणी,
मौन उराशी कवटाळून
कुणाच्यातरी
आठवणीत बुडून गेल्यासारख्या
एका कोपर्यात
मांडी घालून बसून आहेत..

आज स्वप्नांना
बर वाटत नाहीये.
रात्रीपासूनच
तापाने फ़णफ़णत होती
उशाशी बसून होतो
मी रात्रभर त्यांच्या

तुझे भास आज
स्वत:मध्येच
हरवून गेल्यासारखे
एकटक कुठेतरी नजर लावून
खिडकीत उभे आहेत
.
.
.
.
दरवर्षी हे असच होत..

कुणीच विसरल नाहीये हा दिवस

जेव्हा तू

दूर निघून गेली होतीस

कायमची..
स्वप्न १५

स्वप्नातलं घर.. तू आणि मी...

कोकण...............
टुमदार कौलारू घर...
ऐसपैस पडवी...
तिथे एक पाटाचा झोपाळा अगदी
तुला आवडतो ना तसाच...
घराच्या एका बाजुने
अंब्याची बाग..
दुसर्या बाजुने
एका रांगेत उभी असलेली
नारळाची झाडे. . . . .
अंगणात मध्ये एक तुळस...
बाजुने अंगणभर फ़ुललेली फ़ुलबाग..
मोगरा... प्राजक्त....
पण तू मोगर्यामध्ये रमलीस की
प्राजक्त हळहळायचा आणि
प्राजक्तामध्ये हरवून गेलीस की
मोगर्याला राग यायचा...
मग या दोघांचीही
समजुत काढायला ,
समजुतदार निशिगंध
सुध्दा तिथे हवाच...
घराभोवती एक लाकडी कुंपण...
कुंपणभर सजलेली ..नटलेली.. सदाफ़ुली
वरच्या मजल्यावरच्या
खोलीला समरुन
एक खिडकी..
आणि ती खिडकी उघडताच
समोर दिसणारा
निळाशार समुद्र....
आणि तो बघताना
नेहमी माझ्यासोबत तू...
पुन्हा समुद्र किनार्यावर
ते आपल शंख-शिंपले वेचत वेचत
वाळूवर पाऊल ठसे उमटवत
दूर-दूरवर चालत जाणं..
त्या पाऊल खूणा
पुसून टाकत
लाटांच ते फ़िदीफ़िदी हसणं...
आणि मग तुझा तो
त्यांच्यावरचा नकटा राग....
आणि मी मिठीत घेतल्यावर
तुझ्या माझ्यात
उतरत जाणारी ती
संध्याकाळ....
.
.
रोज सुर्यास्त होताना पाहणं..
लाल-केशरी रंगात रंगलेलं आभाळ..
त्यात हरवून जात
एकमेकांना बिलगून
बसलेलो तू आणि मी.....
..
..
..
स्वप्नातलं घर.. तू आणि मी.....स्वप्न १६

सुंदर स्वप्नांच
सुंदर विश्व
रोज रात्री ’स्वप्नात’ दिसत..
तिथे सगळ काही
अगदी हवहवसं वाटणार..
या विश्वात मग आपल मन
कधी पक्षी होऊन
मुक्त..स्वच्छंदी उडत राहत...
तर कधी दवबिंदू होऊन
पानापानांत भिजून जात..
मोकळा श्वास घेतल्याच
समाधान झोपेतसुध्दा
माझ्या चेहर्यावर
उमटल्याशिवाय राहात
नसाव नक्कीच..
इथली प्रत्येक
गोष्ट न गोष्ट आपली असते...
इथला चंद्र..चांदण्या.. इतकच
काय अगदी आभाळसुध्दा
आपल्याच मर्जीतल..
पण अस सगळ असल
तरीसुध्दा तुझ्या
अस्तित्त्वाचा
चमचमता तारा मात्र
दरवेळी माझ आभाळ
सोडून जातो..
आणि तो निखळताना पाहत
.
.
.
.
.
मी लगेच डोळे मिटून
पुन्हा तुलाच मागतो..

स्वप्न १७

किती दिवस अस गप्प राहणार..
मनाचे ..स्वप्नांचे खेळ
आत पुरे झाले!!!!!
आज तिला सगळं सगळं
बोलून टाकणार,
ठरवल अगदी मी पक्क.. 'मनाशी'....
आज सकाळपासून सगळच कस
छान..सुरळीत चालू आहे
ही संध्याकाळ सुध्दा आज
अगदी स्वप्नात पाहली होती तशीच..
स्वप्न तर नाही ना हे
म्हणून दोनवेळा
जोरात चिमटासुध्दा
काढून बघितला स्वत:ला....
.
तिच्या कपाळावरची चंद्रकोर
नेहमीप्रमाणे वेड लावणारी..
केसांमध्ये माळलेला गजरा..
स्वत:शीच लाजत .. मुरडत
तिच्या केसांना घट्ट
बिलगून बसला होता
"नशिबवान आहेस बेट्या."
मी म्हटल सुध्दा... मनातल्या मनात
"तू आज खूपच
सुंदर दिसत आहेस.." मी म्हणताच,
"तुला मी रोजच दिसते" अस लगेच उत्तरत...
तिचं ते
मिष्किल डोळे करत हसणं!!!!!!!!
मी पुन्हा घायाळ ..त्या अदेवर..
घायाळ होण्यातली मजा ती भेटल्यावर
कळली मला..
स्वत:ला सावरत.. भानावर आणत
मी तिच्यासमोर येऊन उभा राहिलो..
एका पायावर खाली बसत..
तिचा हात हातात घेत..
दोन क्षण डोळ्यात पहात.. म्हटल
"माझ्याशी लग्न करशील....
माझ पुर्णत्व तुझ्याशिवाय अपुर आहे..
आयुष्यातली सगळी सुखे
तुझ्या ओंजळीत आणून ठेवीन..
तेही अलगदपणे!!!
त्या सुखांचही ओझं
होऊ देणार नाही तुला..
....
.....
.....
.....

..
...

किर्र..
किर्र.. किर्र..
किर्र.......

च्यायला!!!!!! ७ वाजले....
आज पुन्हा उठायला
उशीर झाला....
उठता उठता चिमटा काढल्यावर
लाल झालेला हात पाहत..
स्वत:शीच
हसत मी कॉलेजला
जायच्या तयारीला लागलो..
स्वप्न १८

"आ कर.. मोठा आ !!!
आता जीभ पाहू......
हमम...
श्वास घे.... पुन्हा एकदा....",
अस करत डॉक्टरांनी माझी
एकूण एक सगळी
स्वप्ने तपासली....
आणि मग बाहेर
येत मला म्हणाले,
"अरे उगाच काळजी करतोस...
काहीही झालेलं नाहीये
तुझ्या स्वप्नांना.....
सगळी अगदी १०० टक्के
निरोगी आहेत..
एकदम ठणठणीत !!!!
...
..
फ़क्त तू

धीर सोडू नकोस...

बघत राहा....

एक दिवस
नक्की पुर्ण होतील..."
स्वप्न १९

संध्याकाळ होत
आली की तुझी स्वप्ने
माझ्यासमोर खुर्चीत
येऊन बसतात
आणी मग "चिअर्स"
म्हणत
पेग वर पेग
रिकामे करतात...
ही नशा असते
.
.
तुझी...
म्हणून मग मलाही
त्यांना अडवता
येत नाही....
पण मी मात्र पहिलाच पेग
शेवटपर्यंत पुरवतो...
नशेची एकदा सवय
होत गेली की,
समजुतदारपणाही वाढतो
बहुतेक...
एखादा पेग मारून मी शांत
बसून राहतो,
त्या स्वप्नांकडे बघत...
शेवटी दोघांपैकी
कुणीतरी एकाने
शुध्दीवर राहणं
गरजेच असतं.....
कारण पुन्हा
त्या झिंगलेल्या
तुझ्या नशेत चूर झालेल्या,
भान हरवलेल्या,
स्वप्नांना.........
सांभाळत, सावरत
.
.
मलाच
.
आख्खी रात्र
.
पार करायची असते...

Offline janki.das

 • Jr. Member
 • **
 • Posts: 76
Re: मराठी लेख : स्वप्न
« Reply #3 on: December 28, 2011, 12:51:26 AM »
स्वप्न २०

खिडकीतून पाऊस बघत उभा होतो. सलग ५ शिंका आल्या....
...आल्या पण कालच्या स्वप्नाची आठवण घेऊनच.........
---
मुसळधार पाऊस.....
६ वाजताच सगळीकडे अंधार....
ती घरात एकटीच... माझी वाट पाहात...
पावसावर उगाचच त्रागा करत स्वत:शीच पुटपुटत -
"या पावसाच गणितसुध्दा अजिबात कळत नाही..
सकाळी एक थेंबसुध्दा नव्हता..
आणि आता नुसत थैमान घातलय.
आज ऑफ़िसमधून पाच वाजताच निघतो अस म्हणाला होता.
सात वाजत आले तरी ह्याचा पत्ता नाही.
पावसाचे दिवस असताना ह्याला लवकर निघायला काय होतं.
त्यात सकाळ्पासूनच अंगात बारीक ताप होता. मग तीन-चार वाजताच निघावं ना?
ह्याला ताप आणि सर्दी झाली की हा असा केविलवाणा
होऊन जातो की बास.. मलाच कसतरी होत मग. "
....
तेवढ्यात दारावर थाप पडली
तिने दार उघडल. बाहेर मी..... नखशिखांत भिजलेला.
थंडीने अक्षरश: कुडकूडत......
.
मला आत घेत... टॉवेलने माझे डोके पुसत पुसत
ती माझ्यावर चिडूनच बोलली.
"अरे काय हे, पाच वाजता निघणार होतास.",
तुझी सात वाजताची डॉक्टरांची appointment होती हे सुध्दा विसरलास ना?
अंगात ताप असताना एक दिवससुद्धा लवकर निघता येत नाही का?
अंग बघ, किती गरम झालय. "
ती चिडून आत स्वयंपाक घरात गेल्यावर मी बाहेरून आवाज दिला,
'ये अग, आपल्या दोघांना मस्त आल्याचा चहा
कर ना... '
आतून काहीच उत्तर आल नाही..
मी तिच्यासमोर उभे राहत हात पुढे केला, '
ये. हा घे, मोगर्याचा गजरा.............
सकाळी निघताना तू म्हणाली होतीस ना,
आज गजरा माळायची इच्छा झाली आहे.
पाच वाजताच निघालो अग, पण एवढ्या
मुसळधार पावसात एकही दुकान सापडेना.
फ़िरून फ़िरून दमलो.
शेवटी एकेठिकाणी मिळाला..
कितीही जपून
आणायचा म्हणलं तरी
थोडासा
भिजलाच बघ..........."स्वप्न २१

पुन्हा सकाळ....
पुन्हा माझा
नवीन जन्म
.
.
दिवसभर तुझ्या
आठवणी आजुबाजूला
घोंगावत राहतात
लचके तोडत राहतात..
रक्तबंबाळ
करतात मला....
मी पळत राहतो दूर,
तुझ्या आठवणींपासून..
दिवस कण्हत राहतो
संध्याकाळची वाट बघत..
जस जशी संध्याकाळ होऊ लागते
तशा जखमा वेदनारहीत होतात..
खात्री करून तुझ्या आठवणी
माझ आभाळ
सोडत सैलावतात. निघतात... परतीच्या वाटेने
.
.
थोडा मोकळा श्वास घेतो न घेतो तोच
तुझे भास समोर उभे ठाकतात..
बघता बघता सगळीकडे
भरून राहतात..
मग मी ओळखीच्या वाटा टाळत
अनभिद्न्य वाटेने
स्वत:ला वाचवत पळत राहतो..
.
थकतो.. दमतो..
ती वाट, तुझे भास
सरता सरत नाहीत..
शेवटी कोसळतो..
आणि मी माझा
देह सोडून जातो....
पण तरिही अतॄप्त असा...
घुसमट कायम..
.
मेलो तरी ’माझी रात्र’ मला खायला उठते
आणि तेव्हा
माझ्या रात्र रुपी पिंडाला
तुझी स्वप्ने येऊन शिवतात
.
आणि मी मुक्त होतो...
.
.
पुन्हा सकाळ.....
पुन्हा माझा
नवीन जन्मस्वप्न २२

कोर्टाच्या पायर्या चढतोय दररोज.....
अजून....खटला सुरु आहे ....
.
.
तारखांवर तारखा
पडत आहेत....
.
.पण
नक्की जिंकू आपण...
खात्री आहे मला..
.
.
तुझा राग साहजिक आहे
पण माफ़ कर..
.
खरच.....
मलासुध्दा
याची कल्पना नव्हती,
कधी
माझ्या रात्रींनी
माझ्याही नकळत
या स्वप्नांवर
नुकसान भरपाईचा
खटला दाखल केला ते......

स्वप्न २३

आयुष्यात हव्याह्व्याशा
वाटणार्या, इच्छिलेल्या.....
सगळ्या क्षणांचा
खजिना मला
सापडला
..
..
सापडला खरा..
.
.
पण या खजिन्यावर
इच्छाधारी
नागासारखी
फ़णा काढून
बसून आहेत...
..
ही स्वप्ने....
.
माझ्या अगणित
रात्रींचा
फ़ुत्कार मला
ऐकू येतो फ़क्त..

स्वप्न २४

तुझ्याविषयी बोलताना चांदण्यासुध्दा

माझ्याबरोबर रमून जातात...

पुरतील एवढी तुझी स्वप्नं

माझ्याकडून घेऊन जातात..

तुझी प्रत्येक गोष्ट मग

आम्ही दोघं आठवत बसतो

विसरलच काही तर ते सांगायला

वाराही झुळूक बनून येतो........

आमच्या अशा गप्पांमध्ये तेव्हा

रात्रही थंडीत जागत राहते.........

पहाटसुध्दा मग पहाटे पहाटेच

दाट धुक्यांवर निजून जाते...

स्वप्न २५

सरत चालली रात्र तरिही आज झोप येत नव्हती..
नेहमी भेटणारी स्वप्नं तुझी कुठेच दिसत नव्हती..

दमुन भागून स्वप्न तुझ इतक्यात घरी आलं..
बेल वाजवून दारावरची पायरीवरती बसलं...

किती उशीर अरे? त्याला पाणी देत म्हटलं..
गटकन पिऊन पाणी मग ते गालातल्या गालात हसलं...

माहीत होत झोपणार नाहीस धावत धावत आलोय म्हणून...
उशीर झाला,माफ़ कर मित्रा, रात्र तुझी गेली सरून...

पण आज तुझ पहाटेचं स्वप्न मी आलोय बनून.....
शेवटची भेट आज आपली...........
.......येईन उद्या वास्तव बनून.................

स्वप्न २६

रोज रात्री घड्याळामध्ये,
वाजतात जेव्हा साडे तीन..
चांदोबाच्या घरामधून,
ऐकू येते व्हायोलीन...

आर्तता ती भेदून जाते,
स्वप्ने माझी हळहळतात.
आठवणींच्या सागर लहरी
शरीरभर स्थिरावतात...

स्वप्ने माझी जाऊ लागतात,
माझ्यापासून अलगद दूर..
आर्त आर्त त्या सुरांमध्ये,
मिसळत आपले काही सूर..

स्वप्नाळलेली रात्र सुध्दा
मनामधून काहुरते.......
चांदण्यांच्या डोळ्यामधून,
आभाळ क्षणभर पाणावते..

रोज रात्री घड्याळामध्ये
वाजतात जेव्हा साडे तीन....
रात्रीलाही जाणवतो मग,
स्वप्नील या जगण्याचा शीण..

भेटला पाहीजे चंद्र एकदा,
सांगीन त्याला अगदी स्पष्ट...
वेड्या अस इतक सुध्दा,
स्वप्नांवरती भाळायच नसत..

पुर्ण होत नाहीत म्हणून,
अस खचून जायच नसत रे...
स्वप्नांसाठी आपण सुध्दा,
एक स्वप्न बनून राहायच रे...

रोज रात्री घड्याळामध्ये,
वाजतात जेव्हा साडे तीन..
...................


हलका हलका
होत जाणारा
पाऊस...
चिंब भिजून....
शांत पहुडलेला,
रस्ता........
गार,
सैलावलेलं..
वारं...........
वडाच झाडं...
ऊबदार,
पारंब्या !!!!!!
चहाची
टपरी......
गरम झालेलं
आलं......
शांतपणे उकळत
असलेलं
दूध....
नखशिखांत
भिजलेला
मी......
.
.
सलग
चार
शिंका....
.
.
दोन कप
चहा....
...
..
पुन्हा
एक
स्वप्न !!!स्वप्न २८

सकाळ झाली की,
रोज आयुष्यनामक सदरा
अंगावर चढवतो मी,
बाहेर पडण्याआधी......
..
अगदी रोज...
जिथे तू,
तुझ्या आठवणी उठून दिसत
असतात तिथेच तो उसवतो..
फ़ाटतो....
ह्या जागा कायम
ठरलेल्याच.......
...
...
आणि रोज रात्री
अगदी बिनचुक.....
.
.
ही स्वप्ने,
ह्या ठिगळांवर
रफ़ू करून देतात.......
.


स्वप्न २९

रोज तू स्वप्नात येतेस...
म्हणतेस, मला चंद्र हवाय...
मी लगेच आणून देतो..
मग म्हणतेस मला चांदण्याही
हव्यात...
मी त्याही आणून देतो..
तेव्हा आभाळ मात्र
रिकाम्या नजरेने
माझ्याकडे रागाने बघत राहत..
मी लक्ष देत नाही...
....
.....
मग सकाळ होते..
स्वप्न संपलेल असत....
मी माझ्या
एकलेपणाशी
हातमिळवणी करतो..
..
पण..
दिवसभर
तेच आभाळ
माझ्या रितेपणावर
फ़िदीफ़िदी हसत राहत....
स्वप्न ३०

आज हातात गुलाबाच फ़ुल
घेऊन आतुरतेने....
वाट बघत बसली होती माझी रात्र
या स्वप्नांची...
अगदी बाराच्या ठोक्याला
तुझी स्वप्नं दारात हजर झाली
नऊवारी साडी.. नाकात नथ
कपाळावर चंद्रकोर.
केसात गजरा
बाजुबंध..
पायात पैंजण..
..
..
इतकी सुंदर... इतकी नाजूक
स्वप्नं.. अगदी कल्पिलेली..
पाहून रात्र घायाळ !!!!!
अक्षरश: उचलून कवेत घेतल
या स्वप्नांना.. कुठे ठेऊ काय करू
अस झाल होत रात्रीला..
.
.
एका धक्क्यातून सावरत होती रात्र
तोच
..
...

या स्वप्नांनी
गुलाबाच फ़ुल पुढे करत
रात्रीला विचारल...
.
.
'will u be
my valentine ?'

Offline janki.das

 • Jr. Member
 • **
 • Posts: 76
Re: मराठी लेख : स्वप्न
« Reply #4 on: December 28, 2011, 12:52:45 AM »
स्वप्न ३१

पुन्हा जड
होत जातं आभाळ...
विझत जातात
चांदण्या....
काहुरतो चंद्र
..
थरथरते रात्र...
.

माझी झोपेतून
जागे व्हायची वेळ आली की
हे असच होत...
निरोप द्यायची वेळ येते
सगळ्यांवरच,
या रंगलेल्या
स्वप्नांच्या
मैफ़िलीला..
.
.म्हणूनच
सगळ्यांनी हट्ट
धरलाय
...
कायमचे डोळे बंद
कर म्हणून...
.
.
म्हणजे
ही मैफ़ील
अखंड सुरू राहील..स्वप्न ३२

तू म्हणालीस, "मी मागशील ते देशील?"
...
"तू फ़क्त मागून तर बघ.....", मी अस म्हटल खर
..
...
पण...
तू माझी स्वप्नं मागशील
अस कधीच वाटल नव्हत...
...
...
तरीही

कसलाच विचार न करता
लगेच सगळी स्वप्ने

तुझ्या ओंजळीत दिली...
..
..
ती घेतलीस...
आणि.. दूर निघून गेलीस
मागे वळून न बघता...
...
किती सहज होत
तुझ्यासाठी हे सगळ....
....
...
..

अंगठा कापून दिल्यावर
त्या एकलव्याची
काय अवस्था
झाली असेल हे आता
कुठे कळायला लागलय मला...
स्वप्न ३३

दिवसभर ही स्वप्ने
तुझ्या आठवणींमध्ये
भिजत राहतात...
ओलीचिंब होतात...
संध्याकाळ उलटून गेली की,
थरथरत्या अंगानिशी घरी येतात..
मी झोपलोय हे पाहून
मला पेटवतात
आणि
माझी शेकोटी बनवून
रात्रभर जागी राहतात....
.....
सकाळ होईपर्यंत ही
स्वप्ने वाळतात...
कोरडी ठणठणीत होतात...
आणि इकडे माझी राख झालेली असते..
..
....
तरीसुध्दा
रोज
या राखेतून
फ़िनिक्स पक्षासारखा
नवा जन्म घेतो मी....
.
.
कारण
तुझ्या स्वप्नांना
रोज रात्री
एक हक्काची शेकोटी हवीच....
नाही का?
स्वप्न ३४

आज स्वप्नं आली
ती कवितांची मैफ़ील होऊनच...
एकेक कविता ही स्वप्ने सादर करत होती..
आणि मी मनमुराद आस्वाद घेत होतो..

"काढ सखे,गळ्यातील
तुझे चांदण्यांचे हात....
क्षितीजाच्या पलिकडे
उभे दिवसांचे दूत... "
....
"होते म्हणू स्वप्न एक
एक रात्र पाहिलेले...
होते म्हणू वेड एक
एक रात्र राहिलेले....."

"चल उभारा उंच शिडे ती गर्वाने वरती..
कथा या खुळ्या सागराला...
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला .."

" ओळखलतं का सर मला?, पावसात आला कोणी...
कपडे होते कर्दमलेले.... केसांवरती पाणी..."

"सर्वात्मका शिवसुंदरा,स्वीकार या अभिवादना...
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु,आमुच्या ने जीवना..."

"रे परत पाखरा, परत जायचे आज,
ये अस्तगिरीवर क्षणाक्षणाने सांज...
रवि सुवर्ण-तारुसम लोपेल समुद्री,
पसरील पंख काळोख, निळ्या आकाशी
ये गाऊ तोवर,बैस जरा मजपाशी.."

"नात्यास नाव आपुल्या, देऊ नकोस काही,
सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही...."
...............
...
सकाळी उठल्यावर लक्षात आल,
आज कवि कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस.......
..
स्वप्न ३५

हल्ली रोज एक स्वप्नं पडत.
विचित्र...
........
माझाच खूण होताना रोज पाहतो मी....
सगळीकडे अंधार..
सोसाट्याचा वारा.. मुसळधार पाऊस..
अनोळखी पावलं घराच्या दिशेने
झपझप चालत येतात..
विजांचा कडकडाट होतो..
मग दार उघडून घरात घुसतो..
आता मला पावलांचा आवाज
स्पष्ट ऐकू येऊ लागतो
मी झोपलेल्या खोलीमध्ये
ही व्यक्ती शिरते..
आणि माझा खूण होतो..
.....
गेले कित्येक महीने हेच स्वप्न..
पण तो चेहरा मात्र दिसत नव्हता..
...
काल रात्री मात्र जेव्हा
त्या खुण्याने माझ्यावर हल्ला केला तेव्हा
त्याला प्रतिकार करत मी विचारल,
’कोण तू? .. का मारतोय मला?’
त्याने माझा खूण करण्यापूर्वी उत्तर दिल-
तुझा अपराध हाच की
...
तू तिला अडवल नाहीस...
ती दूर निघून जाताना"
...
..
चेहरा दिसला नाही..
पण त्याची गरज उरली नव्हती..
आवाज ओळखीचा होता-
..
..
..

माझाच खूण...
माझ्या हातूनच
घडत होता..
स्वप्न ३६

हल्ली आरशासमोर उभा राहीलो
तरी मीच मला ओळखू येत नाही..
त्या आरशातून दिसणार,
मागे कित्येक वर्ष उभ असलेल..
जुनं लाकडी कपाट.. ,त्याच्या एका बाजुला
असलेल देवघर.. गणेशाची मुर्ती..
उदबत्तीची सोंगटी..
सगळ सगळ ओळखीच असतं..
फ़क्त मी सोडून...
....
आरसा सुध्दा माझ्याकडे
अनोळखी नजरेने पाहात असतो..
.....
हरवून गेलोय कुठेतरी..
...
..
तस म्हटल तर
आयुष्यातल्या खूप काही
गोष्टी हरवल्या आहेत...
....
पण तरिही...
या इतिहासजमा वस्तूंचे
उत्खनन ही स्वप्ने करतच
असतात...
..
...
या स्वप्नांना तरी
मी सापडेन
का नाही
काय माहीत?
...
...
कुठल्या तळाशी
जाऊन बसलोय मी
.
देव जाणे !!!!!!!!!

Offline utkarsh

 • Newbie
 • *
 • Posts: 23
Re: मराठी लेख : स्वप्न
« Reply #5 on: December 31, 2011, 12:35:31 AM »
i dont have words for this......
« Last Edit: January 03, 2012, 02:35:16 PM by sam05 »

Offline vivekkapgate

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: मराठी लेख : स्वप्न
« Reply #6 on: January 13, 2012, 12:55:01 AM »
अगदी अप्रतिम ...........
"स्तब्ध झाले शब्द माझे ... स्तब्ध झाल्या भावना "!!!!!!!!!