Author Topic: नव वर्ष स्वागताचा थरार  (Read 794 times)

Offline sanjaymane 1113

  • Newbie
  • *
  • Posts: 32
  • Gender: Male

                                     ३१ डिसेंबर २०११ . २०१२ च्या स्वागताचा दिवस. सकाळपासून २०१२ च स्वागत कोणत्या पद्धतीन कराव याचाच विचार करत होतो. पारंपारिक पद्धतीन नवीन वर्षाच स्वागत करायचं नव्हत. आणि दारू किंवा इतर कोणतंही व्यसन नसल्यान अशा ग्रुप मध्ये मी कधीही जात नाही. अनेक पर्यायांचा विचार केल्यानंतर नव वर्षाच स्वागत समुद्रात फिरून कराव  अस नक्की केल. त्या करिता चांगल्या बोटीचा शोध सुरु झाला. कुटुंबासोबत  रात्रीचा प्रवास करायचा असल्याने मोठी बोट हवी होती. ब-याच प्रयत्नानंतर प्रवासी वाहतूक करणारी लॉंच मिळाली. हि लॉंच मिळवून देण्यासाठी धावपळ करणा-या इसमानेच आम्हाला  एक सल्ला दिला. जवळच समुद्रात एक छोटस बेट आहे तिथे तुम्हाला रात्री कार्यक्रम साजरा करता येईल अस त्याच म्हणण होत. मी ते मान्य केल. पण त्या बेटावर जाण्यासाठी आणखी एका छोट्या होडीची गरज होती. तीही त्यानेच उपलब्ध करून दिली. एव्हढंच नाही तर त्या बेटावर पूर्ण अंधार असल्याने जनरेटर आणि म्युझिक सिस्टीम सुद्धा त्यानेच उपलब्ध करून दिली.
                                      एव्हढी सगळी तयारी झाल्यावर मी घरी आणि माझ्या दोन मित्रांना माझा बेत सांगितला. त्यांनीही कुटुंबासोबत येण्याची तयारी दाखवली. मग जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची तयारी करून संध्याकाळी आम्ही श्रीवर्धन हून दिघी या गावाकडे निघालो. रात्री ९-०० वाजता आम्ही लॉंच  मध्ये चढलो. आमचा प्रवास सुरु झाला पण कुठे जायचं याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती , तिथे काय आणि कशी परिस्थिती असेल याचाही अंदाज नव्हता. खलाशांच्या म्हणण्यानुसार साधारण १० मिनिटांत आम्ही बेटावर पोहोचणार होतो. सोबत छोटी होडीही होती. पण अंधारात त्यांचाही अंदाज चुकला आणि तब्बल दीड तासानंतर आम्ही त्या बेटाच्या जवळ पोहोचलो. तिथून छोट्या होडीतून त्या बेटावर एक एक जण तराफ्याने पोहोचलो. आणि तिथले वातावरण पाहून सगळेच खुश झालो. आमच्या आधीच खलाश्यांनी तिथे जाऊन जनरेटर लाऊन ट्युबलाईट चालू केल्या होत्या. चारही बाजूनी समुद्राचे अथांग पाणी आणि बेटावर आम्ही. माझ्या दिवसभराच्या मेहनतीच चीज झाल्यासारखं वाटल . समुद्रातून बोटीचा प्रवास आम्ही अनेकदा केला होता. पण समुद्रातल्या एका निर्जन  बेटावर रात्र घालवण्याचा अनुभव थरारक होता हे मात्र निश्चित .
                                     जेवण झाल्यावर डि जे चालू करून आम्ही मनसोक्त नाचलो . रात्रीचे दोन अडीच कधी वाजले   ते कळलेच  नाही. खरतर आम्ही खलाश्यांना केवळ जेवण करून निघणार असंच सांगितल होत. पण त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. उलट आणखी कशाची गरज लागणार आहे का ते विचारत होते. पण त्यांच्या चांगुलपणाचा आणखी गैर  फायदा घेणे आम्हाला बरोबर वाटले नाही. आम्ही अडीच वाजता निघालो. मात्र त्या नंतरही त्यांनी आम्हाला दिघी पोर्ट या मोठ्या बंदराचा फेरफटका मारून आणले . काहीही ओळख देख  नसताना  आमच्यासाठी दिघी गावातील  त्या आठ दहा माणसांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू.
                                     परत निघताना  आम्हा सर्वांच्याच चेह-यावर भरपूर समाधान होत. नव वर्षाच्या स्वागताचा हा थरार  आम्ही कधीही विसरणार नाही हे मात्र नक्की.

------संजय माने , श्रीवर्धन.

Marathi Kavita : मराठी कविता


Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):