Author Topic: अहिंसा  (Read 707 times)

Offline प्रशांत नागरगोजे

  • Full Member
  • ***
  • Posts: 665
  • Gender: Male
    • my poems
अहिंसा
« on: May 22, 2012, 08:17:39 AM »
     तुमच्यापैकी कितीजण अहिंसक आहात आणि कितीजण हिंसक आहात? जास्त विचार करू नका, प्रश्न सोपा आहे. तुमच्या मनात आलेही असेल,” अरे मी हिंसक आहे वा अरे मी अहिंसक आहे.” पण कितीजण या शब्दाच्या अर्थाला अनुसरून वागतात? देव जाणे.

     अहिंसा म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो महात्मा गांधी. अहिंसा या शब्दाला सातासमुद्रापलीकडे प्रसिद्धी देणारा महान आत्मा. गांधीच्या मते अहिंसा म्हणजे,” दुसऱ्याने एका गालावर मारली तर आपण दुसरा गाल पुढे करायचा. मारनाऱ्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत होईल आणि तो अहिंसेचा उपासक होईल.” बस एवढंच. ही आहे गांधींची अहिंसा. मग जे गांधीजींच्या अहिंसेचे उपासक आहेत त्यांनी खुशाल आपला गाल सामोर करत राहावं.
 
     पण कधीकधी मनाला प्रश्न पडतो आणि बापूंना विचाराव वाटत,” बापू एका गालावर १००० वेळा चपराक खाता येईल हो, पण जर समजा माझ्या डोळ्यांसमोर कोणी एखाद्या मुलीची अब्रू लुटत असेल तर मी काय करावं? मी फक्त पाहत राहावं का? की अजून दुसरी मुलगी आणून त्या नराधमाच्या हातात स्वाधीन करावी? त्या मुलीनं तुमच्या अहिंसेला अनुसरून काय म्हणावं? सांगा बापू सांगा.” अहिंसेच्या उपासकांनो, तुमाचाकडे जर याचे उत्तर असेल तर लगेच कळवा.

     “बापू, देश स्वतंत्र झाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी. पण देश आहे तसाच राहिला, म्हणावी तितकी प्रगती झाली नाही देशात. राजकारणी लोकांनी देशाला, देशातील जनतेला लुटायचं धोरण चालूच ठेवलं आहे. गेली ६५ वर्षे, देशातील जनता या राजकारणी लोकांच्या बुद्धीत सदसद्विवेक येण्याची वाट पाहत आहे, पण अजून काही सदसद्विवेक बुद्धीचा मान्सून देशात पोहोचला नाही. तुमच्या अहिंसेला कधी यश मिळेल बापू? तुमच्या अहिंसेला अनुसरून ही देशाची जनता स्वतःच्या स्वातंत्र्याचा हक्क विसरली आहे. प्रत्येक गोष्ट ती सोसते आहे.”

     “बापू तुम्ही तर श्रीरामाचे भक्त. मरताना तुम्ही ‘हे राम‘ म्हणालात, हो ना? बापू, पण तो राम हिंसक हो, सीतेला फक्त हात लावणाऱ्या महापराक्रमी रावणाचा त्याने वध केला. तुम्ही अहिंसक, राम हिंसक, कसं जमल हो तुमचं? रामाने सीतेसाठी रावणाचा वध केला, देशासाठी शहीद झालेल्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेवासाठी तुमच्या डोळ्यातून एक अश्रू तरी टपकला का हो? भारतमाता ही माझी, तुमची तशीच त्यांचीही आईच, मग तिच्यासाठी सुळावर गेलेल्या आपल्या शहीद बांधवांसाठी तुम्ही का दया नाही दाखवली? मला काय म्हणायचंय ते तुम्हाला कळलेच असणार. सांगा बापू. ”

     “ बापू, नथुराम गोडसे तर तुम्हाला नक्कीच आठवत असणार? म्हणे तुमचाच अनुयायी होता तो पण पुढे चालून तुमच्या विचारांशी त्या सळसळत्या रक्ताचं जमल नाही. आणि तोच तुमचा अनुयायी तुमचा विनाशक ठरला. मी वाचलाय नथुराम गोडसे, मला तो बरोबर वाटला. तो तरी काय करणार बिचारा, कारण त्याने दुख: पाहिलं होतं, जे तुमच्यापर्यंत येऊन देखील तुम्ही कळवळला देखील नाहीत.”

     “बापू, देश स्वतंत्र झाल्यावर बरेच दिवस देशाचा कारभार तुमच्या वचनांवर चालत होता. मग देश अहिंसक होण्यासाठी तुम्ही का प्रयत्न केले नाही? म्हणजे देशात पोलीस वगेरे जे होते वा आहेत, यांचा कारभार बंद का नाही केला. तसा हुकुम दिला असता तर बरेच बंदुकधारी कमी झाले असते. देशात एकही बंदुकधारी नाही, असा हा अहिंसक भारत देश म्हणून आपला देश गौरविला गेला असता. देशाच्या सरहदिवरील सेनेचा कारभार तुम्ही बंद करायला हवा होता, पण का केला नाहीत? तुम्हाला ते जमलं ही असतं कारण तुम्ही देशाचे राष्ट्रपिता होता.”
 
     “देशाच्या स्वातंत्र्यात तुमच्या अहिंसेचा वाटा आहे, पण तुमची अहिंसा हिंदू-मुस्लीम ऐक्य जोपावू शकली नाही. देशाचे दोन तुकडे झाले. तुमच्या अहिंसेच सामर्थ्य इथे फिकं पडलं.”
   
     “हे राष्ट्रपित्या, मी काही बाबतीत मनापासून तुमचा आदर करतो, पण काही बाबतीत मुळातच नाही. त्यातली अहिंसा ही एक गोष्ट. तूम्ही सांगितलेली अहिंसा अनुसरून देशाचा नागरिक स्वत:चे स्वातंत्र्य विसरत चाललाय. स्वतःवरचा अन्याय तो सहन करत जगतोय. स्वतःवरचा अन्याय सहन करून स्वतःला मारणारी अहिंसा ही एकप्रकारची हिंसाच होय. ही अहिंसा म्हणजे आत्महत्येचा दुसरा भाग. आत्महत्येत आपण स्वतःला मारतो, आणि या अहिंसेत दुसरा आपल्याला मारतो आणि आपण त्याला विरोध ना करता, थोडासा हातभार लावतो. मान्य आहे, हिंसा करू नये. समोरचा जर दुर्बल असेल, समोरच्याचा जर काही अपराध नसेल तर हिंसा करू नये. हिंसा करणे हे पापच, पण स्वतःची हिंसा करवून घेत असाल तर ती अहिंसा नव्हे, ती एकप्रकारची हिंसाच.” 

     मित्रहो, इथे मी मला पडलेले प्रश्न मांडलेत, तुम्ही प्रत्येकजण या लेखाशी सहमत असाल असे नाही. आणि मीसुद्धा तुमच्या दृष्टीने बरोबर वा चुकीचा असेल. तरी काही जणांना जर मी चुकीचा वाटत असेल तर कृपा करून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. जर या प्रश्नांना साजेशी उत्तरं भेटली तर मी तुमचा आभारीच राहील.
                                 
-आशापुत्र                             

Marathi Kavita : मराठी कविता