Author Topic: कविता वाचन...... स्वतःशी  (Read 873 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
कविता वाचन...... स्वतःशी
« on: June 12, 2012, 12:47:25 PM »
कविता वाचन...... स्वतःशी

एखादी कविता एकदम काळजाचा ठाव का घेते कळत नाही....... मग मी ही फार चिकित्सा करत बसत नाही - ते शब्द छान आहेत म्हणून.... का आशय उत्तम आहे म्हणून.... का अगदी लयीत आहे म्हणून......
पण तरी ही असं होतंच की...
एखादी कविता गुणगुणायला भाग पाडते....
एखादी विचार करायला भाग पाडते....
एखाद्या कवितेत इतका सुंदर विचार मांडलेला असतो की आपले विचारच बंद होतात - जणू ती आपल्यावर एक गारुड करते.
एखाद्या कवितेत मन आपलंच प्रतिबिंब शोधू लागतं....
कधी कवितेतील अनुभवाशी मन समान धागा जोडू पहातं.....
खरं तर कविता मला एकट्यालाच वाचायला आवडते - अगदी आवडती व्यक्तीदेखील शेजारी नको
कधी कधी प्रतिसाद / अभिप्रायातून आपल्या विचारांपेक्षा वेगळाच विचार / परसेप्शन वाचायला मिळतं - पण हे फार फार क्वचित...
कविता वाचायच्या आधी माझी पाटी कोरी आहे ना हे मी आवर्जून पहातो.
फार संभ्रमित अवस्था, संतप्तता, खूप उत्साहितता, मनाचं इरिटेशन, मिश्किलपणा असे भाव मनात असतील तर माझ्याबाबतीत तरी काव्यवाचन होउ शकत नाही.
काव्यवाचन हे एकट्यानेच करायचे या मताचा मी आहे. (जाहीर काव्यवाचन करु नये व तेथे रसिकाने जाउ नये असा मात्र भाव अजिबात निर्माण करु इच्छित नाही) कविता वाचनात - मधेच कुणाची हाक, फोन, डोअरबेल हे सगळे व्यत्यय पूर्ण रसास्वाद नष्ट करु शकतात. वर म्हटल्याप्रमाणे आपली अगदी आवडती व्यक्ती ही तेव्हा शेजारी नको असे वाटते.
फारच क्वचित असं होतं की आपला सगळा मूडच ती कविता बदलवू शकते. मनस्तापही दूर करुन अगदी सुगंधी गारवा देऊन जाते. असा क्षण किंवा अशी कविता भाग्यानेच लाभते.
आवडलेली कविता किती काळ आपल्या स्मरणात रहाणार, पुढे केव्हाही ती तेव्हढीच आवडती रहाणार का असा विचारही मग मनात येत नाही.
खूपदा त्या कवितेशी एकरुपच होण्यात अतिआनंद असतो. शक्य असेल तर वाचनानंतर शांत बसून अथवा डोळे मिटून तो आनंद उपभोगत रहावा अशी मनस्थिती होते.
त्या आनंदातून बाहेर आल्यावर मग तो कोणाबरोबरतरी शेअर करावा असे वाटू लागते.
बरेच वेळा आपली मनस्थिती अनुकूल नसेल किंवा कवितावाचनाला अनुकूल अशी परिस्थिती नसेल तर खूप चांगल्या कवितेवरही अन्याय होउ शकतो.
कधी एखाद्या कविचं नावंच असं मोहिनी घालणारं असतं की ती कविता सगळ्यात आधी वाचायला घेतली जाते. दुसरं असं की त्या नावाला जोडून काही अपेक्षाही सुरु होतात. अर्थात कधी या अपेक्षा पूर्ण होतात किंवा कधी अपेक्षाभंग......
किती किती परिमाणं, वेगवेगळी परिस्थिती, आपली मनस्थिती....अशा अनंत गोष्टी - या सगळ्यातून घडणारं कवितावाचन..... हे नेहेमीच जमलेलं थोडंच असणार .... यावर कडी म्हणजे हे "मला" वाटणारं, "दुसर्‍याला" वाटेलच असं नाही......नाही का..... ?
एखाद्याच्या अभिव्यक्तीशी दुसर्‍यानं एकरुप होणं ....... किती अवघड गोष्ट जणू एक आश्चर्यच (क्वचित घडणारी गोष्ट) !
शब्दातून / कवितेतून कोणी अभिव्यक्त होउ पहातो....... काय करणार.....त्याचं अभिव्यक्तिचं साधनंच ते आहे नं....
आणि...
दुसरा घटक म्हणजे रसिक....... त्या अभिव्यक्तीशी कधी कधी चक्क एकरुपच होतो आणि त्याच्याकडून नकळत शब्द येतात - वा, बहोत खूब, क्या बात है.....
हे शब्द ऐकायला त्यावेळेस कवि थोडाच तिथे हजर असतो ?
पण या मनाचे त्या मनाशी सूर जुळतात ते असेच..... कधीतरी....भाग्यानं....एक आश्चर्यच !


-shashaank purandare.

Marathi Kavita : मराठी कविता