Author Topic: उभा ठाकला ..... ठाकला साजण दारी.....  (Read 693 times)

Offline shashaank

  • Full Member
  • ***
  • Posts: 558
  • Gender: Male
उभा ठाकला ..... ठाकला साजण दारी.....

अगदी केव्हाही कोसळेल असं गच्च भरलेलं आभाळ..............
पण...ना ढगांचा गडगडाट.... ना वीज....... एकूणच वातावरणात एक विचित्र शांतता भरुन राहिलेली......
झाडंही अगदी शांत, निचळ उभी, पानंही न हलवता .......

खूप दूरवर .. कुठेतरी पावसाचं आगमन झालेलं.......
त्यामुळे हवेत झालेला बदल, हलकेच जाणवतोय न जाणवतोय असा दरवळणारा सूक्षम मृदगंध........
आत्ता येईल, आत्ता येईल तो... असं वाट पहायला लावणारा तो..... जाणवतोय... दर्वळतोय.. पण नजरेस मात्र पडत नाहीये........
....कसं हे जीवघेणं वाट पहायला लावणं याचं ?.......
डोळे मिटून शांत बसावं असंही वाटत नाहीये....... नुसतीच तगमग...तगमग...... आतबाहेर..... घुसळुन निघतोय जीव अवघा.....
एखादा विचार तरंग, कुठली गाण्याची ओळ, सुरावट.... काहीच मनावर उमटत नाहीये......

पावसाला पहायला आतुरलेलं मन ... कधी वेडंपिसं..... तर क्षणात स्तब्ध झाल्यासारखं.......... कशी ही घुसमट, अस्वस्थता....

अगदी उंबरठ्यावर ठाकलाय तो........ पायरवही ऐकू येतोय..... पण नजरेस मात्र का येत नाहीये.....का असा अंत पहातोस रे ? असं आक्रंदन चाललंय - आतमधे.....
तर.. मधेच वाटतंय - अरे आलाच ना तो....अगदी हाकेच्या अंतरावर आहे... थोडा धीर धर की...इतके महिने वाट पाहिली अन् आता इतका उतावीळपणा ? ...... किती हा पोरकटपणा......

असं हे आत-आत अल्याड-पल्याड चालू असतानाच..... तो केव्हा समोर येऊन ठाकतो ते कळतंच नाही......

नजरेसमोरचं सगळंच धूसर..धूसर होऊन जातंय ........
त्याचं ते आवेगपूर्ण आगमन.......
ते थाड थाड पडणारे थेंब.....
काहीकाळ जोडीला घेतलेला वारा, त्यामुळे घडणारे त्याचे स्वैर नर्तन.......
झाडेझुडपे - डोंगरदर्‍या इतकेच नव्हे तर चराचराला न्हाऊ घालणारे त्याचे सहस्त्र बाहू ........
या अशा अनोख्या सजणाला खेव देउ पहाणारं ते अधीरं मन.........ते आता गेलं कुठे, इतका वेळ त्याची वाट पहाणारं ते वेडं मन, त्याचं स्वागत करायला उतावीळ झालेलं ते खुळं आता आहे तरी कुठे ?....असं कसं हे आक्रित घडलं??

ते वेडं मन ....ते तर आता एका धुंद अवस्थेत गेलंय.......ना थुई थुई नाचत, ना कुठला भेटीचा आवेग... ना कुठल्या संवेदना उमटताहेत त्यावर...... ते आता आपल्याशीच शांत, स्वस्थ ...आतल्याआत सुखावून स्थिरावलंय ...

फक्त एक आगळीच तृप्ती आत-बाहेर भरुन राहिलीये..... त्या सजणाच्या प्रथम दर्शनानेच....
.......पार चिंब चिंब भिजवून ... सगळं सगळं व्यापून टाकणारी त्या सजणाची मिठी .....एक असीम तृप्ती तेवढी भरुन राहिलीये - अंतर्बाह्य.......

उभा ठाकला, ठाकला साजण दारी...
डोळे दिपले, दिपूनी गेले मिटूनी..
माझे "मी" पण, गेले कुठे दूरवरी...
उभा ठाकला, ठाकला साजण दारी............


-shashaank purandare.
« Last Edit: June 12, 2012, 03:02:18 PM by shashaank »