Author Topic: एक टपोरी  (Read 1309 times)

Offline Omkarpb

  • Newbie
  • *
  • Posts: 42
  • Gender: Male
एक टपोरी
« on: March 02, 2014, 01:01:42 PM »

ते प्रेमा बिमाचं आपल्याला काही कळत नाही,
दिल धडकन प्यार हे असले शब्द कधी भेजात शिरत नाही,
मी बरा आणि आपली gang बरी,
मी इथला एक नंबर टपोरी …

पण काय पोरगी होती ती एक नंबर फटाका,
खाडकन उठलोय झोपेतून जसा बसावा चटाका,
केलं घायाळ तिनं ह्या दगडासारख्या माणसाला,
नाही ठेवला योग्य तिनं मला कोणत्या कामाला

टपोरी असलो म्हणून काय झालं, आया बहिणींची इज्जत करायचो,
सगळ्या पोरींना आपण - साला किती मुर्ख मी - बहिण मानायचो,
त्यामुळं साली गोची झाली कुणाला काही सांगता येईना,
भडक माथ्याची सवय साली , शांतही बसवेना.

bus-stop वर थांबायची, ५०३ पकडायची ,
कालेजात उतरायची , मैत्रिणींसोबत मिसळायची,
ठीक चार वाजता स्कूटीवर मैत्रिणीसोबत घरी जायची,
रविवारी कधी मंदिर कधी बाग, नाहीतर थिएटरला भेट द्यायची .

ती रोज आपलं I-Card दाखवायची कालेजच्या गार्डला,
आपणही शक्कल लढवली , तिथंच उभं राहून तिचा I-Card पहिला ,
डाईरेक्ट इचारन्यात इथं माहीर होतं कोन,
नाव होतं कुसुम, पत्ता मधुसूदन कॉलनी, एकशे दोन.

पण कसा होणार मी सूट तिला, मीच इचारलं सोताला,
कशी मिळणार जागा त्या फुलांमध्ये ह्या काट्याला,
कसा म्याच होईल मी तिच्या गंगेसारख्या वाणीला,
गाळून गाळून किती गाळणार ह्या माझ्या गटारीला.

मग आपण ठरवलं, थू माझ्या जिंदगानीला,
बदलून दाखवेन मी साऱ्या जगाला,
टपोरीगिरी सोडली , आपण नाही पडलो कुणाच्या लफड्यात ,
सभ्य बनणं किती सोपं असतं, जादूच असते त्या सभ्य कपड्यात.

सभ्य पोरांत राहून मी सभ्य भाषा शिकली,
प्लीज , एक्स्क्यूज मी , मध्ये लई मजा वाटली,
आपल्या भाषेतून शिव्या काढून टाका झालाच तुम्ही पास परीक्षा,
मनातून कितीही द्या, नाही त्याची तुम्हाला शिक्षा .

दुकानात वगैरे काम करून थोडीशी जबाबदारीही शिकली,
आयुष्यात पहिल्यांदा बापाची वाहवा मिळवली,
सारं काही चांगलं चाललं होतं, तिचं कॉलेजही संपत आलं होतं,
एक दिवस कुठेतरी भेटून, तिला सगळं सांगायचं होतं.

एकदा शेवटचं म्हणून गेलो सभ्य मित्राकडे,
'I Love You' कसं म्हणतात ह्याचे दे शेवटचे धडे,
पण डाईरेक्ट कसं विचारावं म्हणून त्याला बोलता केला,
"बोल दिलीपकुमार, तुझ्या आयुष्यात आहे कोणी मधुबाला?"

तो म्हणाला,"काय शब्द योजू तिजला, परी म्हणू कि अप्सरा,
निळ्याहून निळाई ती, शुद्ध पाण्याचा झरा,
आकंठ बुडलोय मी, तिच्या प्रेमाच्या सागरात,
ना तमा मला श्वास थांबण्याची, काय ठेवलाय ह्या देहात,

कोण आहे ती नाही माहित मला,
कधी कधी दिसते जाताना कॉलेजला,
bus stop वर येते, ५०३ पकडते,
आणि संध्याकाळी मैत्रिणी सोबत स्कूटीवर घरी जाते"

मी डोळ्यात पहिले त्या मित्राच्या,
मीच प्रेमात पडलो त्याच्या सभ्य प्रेमाच्या,
म्हणालो, " कुसुम नाव तिचं, मधुसूदन मध्ये राहते,
जा भेट तिला उद्या, रोज १० वाजता येते"

खूष झाला गडी चक्क मिठी त्याने मारली,
हेही विचारलं नाही, एवढी कशी रे तुला माहिती?
मीच म्हणालो, "जातो आता, आज विचित्र वाटत आहे,
सकाळ पासून डोळ्यांमधून पाणी सारखं वाहत आहे"

खरंच, प्रेमा बीमाचं आपल्याला काही कळत नाही,
दिल धडकन प्यार हे असले शब्द कधी भेजात शिरत नाही,
मी बरा आणि आपली gang बरी,
मी … मी तर फक्त एक टपोरी … … …


- Omkar

Marathi Kavita : मराठी कविता