नदी आणि सागर
एक नदी अशीच
स्वतंत्र एकटी वाहणारी,
कधी भेटते सागराला
नेहमी वाट पाहणारी.
वाहता वाहता जरी ती
वाटेतल्या तलावांना मिळाली,
पण सागराची ओढ तिची
तशीच कायम राहिली.
असेच एकदा सागराच्या
ओढीने तिला झपाटले,
खिन्न मनाचे दर्शन
तिने पूरातून करविले.
शांत करण्यासाठी तिला
पावसांचे थेंब जमले,
सोपी करुन तिची वाट
तिला सागराजवळ आणले.
पाहून समोर सागराला
आपले भान ती हरपली,
शिरुन त्याच्या मिठीत
स्वंत:चे अस्तित्वही विसरली.
सागरानेही तिला मग
आपल्यात सामावून घेतले,
त्याच्या मनातील सर्वच
जणू काही तिलाही कळले.
तो ही होता तिच्यासाठी
झालेला तेवढाच आतूर,
खुदकन ती मनात हसली
अधुराच नदीविनाही सागर.
- संतोषी साळस्कर.