Author Topic: || स्मृति अध्याय...... प्रेमग्रंथाचा ||  (Read 1040 times)

|| श्री ||

या ईश्वरीय देणगीत जगाला स्वर्ग सापडताना
माझ्या प्रेमाचा असा का देहविक्रय  होतो ?
असूनही दोन प्रेममूर्ति माझ्या मनाच्या देव्हार्‍यात
त्यांचा असा का विटाळून अनादर होतो ?
या हतबल प्रेमी मनाच्या प्रत्येक प्रेमाणू ची शपथ सखे
हे माझ्या सोबत असं का झालं होतं ?
काही माहीत नसताना
माझ्या वाट्याला असं प्रेम का आलं होतं ?


माझ्यावर तुझ्या नजरेचं मृग नक्षत्र कोसळताना 
आधीच कोण मला विरहाचा चिखल माखून जातो ?
ओसंडत होती प्रीत तुझ्या स्मित, लाजण्यातून
तिला कोण आठवणीचे बांध घालून जातो ?
तू मला प्रथम पहिलं, त्या अजरामर क्षणाची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


विच्छिन्न मनाला समजावत परत प्रेम करताना
कोण वारंवार पहिल्या प्रेमाची आठवण काढतो ?
तुझा तर प्रारंभ , प्रारब्ध मी बनलो असता
आता कोण तुझ्यावर जीव ओवाळून टाक म्हणतो ?   
तू दिलेल्या प्रेमाश्रयाची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


तुझ्या सोबत प्रितीच्या बालिश सोंगट्या खेळताना
का माझा फासा उलटा पडतो ?
न्याहाळताना तुला का एक चेहरा
माझ्याकडे हळूच डोकावतो ?
तुझ्या बेधुंद हसर्‍या बोलक्या डोळ्यांची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


घेताना हात हाती तुझा प्रेमाने ओथंबलेला
का मला असा हा चटका बसतो ?
तोच तुझा तो नित्य स्पर्श
आज असा का परका वाटतो ?
तुझ्या हातावरच्या माझ्या पुसट प्रेमरेघेची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


रोज एकमेकांना लपून भेटत मन मोकळं करताना
कोण आपली चर्चा गावभर सांगतो ?
रोजचा तो वृक्ष अन किनारा भेटीचा
त्यावर कोरलेले तिचे नाव का वाचतो ?
वार्‍याला पिसाळणार्‍या तुझ्या धुंद सुगंधाची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


एकांत वेळी मिठीत घट्ट तुला सावडताना
कोण तुझ्या गजर्‍याच्या गंध चोरून जातो ?
जाता जाता तो वळून मागे
का मला उगाच चिडऊन जातो ?
खांद्यावर विस्कटलेल्या तुझ्या कृष्ण केसांची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


तुझ्या कोरीव ओठाला माझे ओठ, चिकटताना पहिल्यांदा
कोण आपली प्रेमाराधना भंग करतो ?
चाखली तुझ्या रसाळ ओठांची चव आत्ताच
कोण त्यात मीठ मिसळताना दिसतो ?
तुझ्या सुरकुतलेल्या गुलाबी ओठांची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


ऐकत तुझ्या लाडिक गूज गोष्टी, सोबत चालताना   
कुणाच्या जड रेशमी बेड्यात पाय अडखळतो ?
का पुढून हसत येणारा एक
कुणीतरी मला ओळखीचा वाटतो ?
गळ्याभोवतीच्या तुझ्या हस्त साखळीची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


रूसल्यावर तुला लाडाने कवेत घेऊन समजावताना   
का मला हा काटेरी खेद टोचतो ?
तुझे चंद्र्मुख असता हृदयाशी
कुणाच्या स्वप्नात रात्र जगतो ?
मानेवर आदळलेल्या तुझ्या ऊबदार श्वासाची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


असताना पवित्र सप्तपदींचा तुझ्या साक्षी मी
कोण आपला विवाह बंध सोडू पहातो ?
असाच खेळलेला लुटुपुटुचा खेळ 
तो मला का आठवून सांगतो ?
तुझ्या खर्‍या निर्व्याज्य निस्सीम प्रेमाची शपथ सखे
हे असच एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


मधु मिलन नग्न जागर रात्र आपली सजविताना 
का भूतकाळातल्या बाजेवरची चादर आठवतो ?
कोण अलगद आपल्या आवेगात
गुंतल्या बोटांच्या गाठी सोडून जातो ?
विवस्त्र तुझ्या गोर्‍या अंगाची शपथ सखे
हे  एकदा माझ्यासोबत होऊन गेलं होतं
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


दुभंगलेल्या माझ्या जीर्ण जीवनाच्या सरतेशेवटी
आठवणीत कुणाच्या हा कंठ गहिवरतो ?
सुकल्या मज अश्रुने, तिच्या विरहात
तुझा पदर का ओला करतो ?
तुझ्या सोबत विसरलेल्या माझ्या आयुष्याची शपथ  सखे
हे एकदा माझ्यासोबत का होऊन गेलं होतं ?
पण तेंव्हा माहीत होतं की
खरं प्रेम एकदाच होत असतं


तुझ्याशिवाय जीवनाचा हा शेवटचा क्षण संपविताना 
बंद पापण्यात आता का तिचा चेहरा दिसतो ?
का मिटलेल्या वृद्ध डोळ्यात माझ्या
तो दोन अश्रु गाळून जातो ?
तुझ्या उजाडलेल्या सुन्या, भकास माथ्याची शपथ सखे
हे एकदा माझ्यासोबत का होऊन गेलं होतं ?
माहीत असूनही मी
दुसर्‍यांदा प्रेम का केलं होतं ?


सर्व संपल्यावर आता मी का अन कुणाच्या प्रेमाची गोधडी शिवतो ?
काही तुझ्या तर काही तिच्या प्रेमाच्या चिंध्या लावत बसतो
मी कुणावर खरं प्रेम केलं होतं ? शोधत उत्तर
पांघरून तिला शांत चीर निद्रेत जातो
माझ्या गत जीवनात आलेल्या तुम्हा दोघींची शपथ सखे
असं आपलं प्रश्नार्थक प्रेम का होऊन गेलं होतं ?
असूनही आपल्याच प्रेमग्रंथात,
आपल्यालाच अनुत्तरीत का ठेऊन गेलं होतं ?

इति:

........ अनुराग
http://kavyanurag.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


कवितेची लांबी, ही नक्कीच त्रासदायक आहे. तरी सुद्धा ती वाचून तुमच्या प्रतिक्रिया कलविल्यास आभारी राहीन