श्री. सचिन गुजराथी यांनी मला पाठवलेली कविता
आपल्या सर्वांसमक्ष प्रस्तुत करीत आहे..
ती बसली आहे माझ्या शेजारी
बोलतचं आहे ,बोलतचं आहे
निरर्थक ,अर्थपुर्ण
थोडं अंतर राखून !
हळूहळू डोळे पेंगायला लागलेत
तिचे अन् माझेही.
पण मी कसा झोपू?
या छोट्याश्या घडीतील एक क्षणही
मला तिच्यापासून दूर
व्हायचं नाहीये.
पण ती झोपलीच-
माझ्या छातीवर डोकं ठेवून.
राखून ठेवलेलं अंतर कधी
गळून पडलं
कळलंच नाही.
पण आत्तच या हृदयाला काय झालं?
किती जोरात धडधडतंय!
वेड्या हृदया,थांब ना जरासा!
ती उठेल नं तुझ्या आवाजानं,
अन् पुन्हा बडबडत राहील
थोडं अंतर राखून!