स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली,
फुलली दश दिशांना नवखी पाहत लाली,
मी कल्पिल्या सुखांचा फुलला वसंत न्यारा
चाहूल मिलनाची दुरून मनात आली,
स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली //१//
अनमोल त्या घडीने उठले मनी तरंग
स्पर्शून स्वप्न गेले हळुले मुके विहंग
कुंजातल्या कळ्यांना हलकेच जाग आली
स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली//२//
साक्षीस घेऊन तो तव बोलका इशारा
स्वप्नसावे सुखाचा पाहिला मी किनारा
ती नजरभेट आता नयनात स्वप्न झाली
स्वप्नातून जाता जाता हसलीस गोड गाली//३//