१.तरुण आहे रात्र अजुनी
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
सांग या कोजागिरीच्या चांदण्याला काय सांगू
उमलते अंगांग माझे, आणि तू मिटलास का रे
बघ तुला पुसतोच आहे, पश्चिमेचा गार वारा
रातराणीच्या फुलांचा गंध तू लूटलास का रे
उसळती ट्टदयात माझ्या, अमृताच्या धुंद लाटा
तू किनार्या सारखा पण कोरडा उरलास का रे
ओठ अजुनी बंद का रे, श्वास ही मधुमंद का रे
बोल शेजेच्या फुलावर, तू असा रुसलास का रे
( गायिका- अशा भोसले.)
२.सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे
कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे
उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे
( हि गझल "उंबरठा" या मराठी चित्रपटात स्मिता पाटील व गिरीश कर्नाड यांचावर चित्रित केली आहे .गायिका - लता मंगेशकर )