तो चौकटचा राजा नि मी किल्वरची राणी
प्रिया पाटील
ऐका कहाणी आमच्या प्रेमाची
तो चौकटचा राजा नि मी किल्वरची राणी
अधूरी होती आमची प्रेम कहाणी
कारण दरबार भरला होता बावन्न पानांनी
वर्षानुवर्षे ही लढाई लाल-काळ्या पानांची
चारही किल्ले जिंकले किंवा हारले
हार पक्की आमच्या प्रेमाची
तीन पानी खेळो अथवा सत्ती लावणी
सात आठचा डाव रंगला, गाढव मात्र आम्ही
ह्याच्या हातून त्याच्या हातात घालमेल होई जीवाची
कुठेतरी एकत्र भेटू चाहुल लागे क्षणाक्षणाची
आमच्या प्रेमाचा डाव बदामाच्या गोलूने फोडला
धुमशान उठल्या रिंगणात किल्वरचा राजा गरजला
राजा नि राणीला घेऊन जोकर होता पळाला
चारही एक्यांना कुठलाच पुरावा नाही मिळाला
राज्यात झाली आणीबाणी . . .
माझ्या मांडीखाली चौकटचा राजा नि किल्वरची राणी
प्रिया पाटील