भरून आलेलं आभाळ....................
भरून आलेलं आभाळ जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व तेव्हा मला कळू लागतं...
धावून येणारा पाऊस, नखशिखान्त भिजवू पाहतो...
बेधुंद.. बेभान वाऱ्याला, जबरदस्तीने थिजवू पाहतो...
मनाच्या कोपऱ्यात तुझी आठवण, पुन्हा घरटं बांधते...
आणि.. प्रीतिचं वेडं पाखरू... पुन्हा त्यावर घोटाळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
जमिनीवर पडणारं पाणी, ओढ्याचं रुप घेऊन धावतं...
पावसाचं हे चैतन्य, निसर्गाच्या ओंजळीत सामावतं...
तहानलेली धरती तृप्त होऊन, हिरवा शालू पांघरते...
माझं मन मात्र मातीच्या सुगंधात मिसळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
अशा धुंद वातावरणात, मी सहज फिरायला निघतो...
सभोवतीच्या मोहकतेला नजरेनेच प्यायला बघतो...
चालता चालता वाटेवरचं, ते ओळखीचं वळण येतं...
तू तिथे पुन्हा भेटावंस... हे माझं स्वप्न, वास्तवात विरघळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
सृष्टीचं सौंदर्य पाहून, मी मुग्धच होऊन राहतो...
मनाच्या दर्पणातही पुन्हा, तुझेच प्रतिबिंब पाहतो...
दूरवर पेटलेल्या शेकोटीची धग, अंगाला जाणवू लागते...
माझं मन मात्र एकांताच्या, आगीतच जळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
जेव्हा कधी तुझ्या आठवणी मनामध्ये दाटून येतात...
मला पुन्हा भूतकाळात खेचून नेतात...
वेदनांचा श्रावण पुन्हा एकवार मुसळधार बरसू लागतो...
अन हृदयीचं दु:ख अश्रू बनून डोळ्यांवाटे ओघळू लागतं...
भरून आलेलं आभाळ... जेव्हा टपटप गळू लागतं...
माझ्या जीवनातलं तुझं महत्त्व... तेव्हा मला कळू लागतं...
कवि-- प्रद्युम्न जोशी