तो आजही आला, तसाच बसला, गोड हसला.
तो आजही मला पहिल्या दिवसा सारखाच दिसला.
आतून जरी गडबडलेला वरून मात्र निवांत,
नजर आतुर बोलायला पण ओठ मात्र शांत.
स्वतःला सांभाळण्याचा हा त्याचा प्रयत्न,नेहमीचाच तसला.
त्याला रोज कळतंय कि होतोय उशीर,
पण का कुणास ठाऊक होत नाही धीर.
अरे दे कधीतरी माझ्या नजरेत नजर स्वतःची,
बघ मी किती तयारी करून ठेवलीय होकाराची.
पण तो स्वताच्या नजरेलाही सांभाळतो कसला!!
अरे विचार कधीतरी "होशील का माझी",
मग मी अबोलच राहून लाजेन जराशी.
उगीच ओढणी रुमालाशी करीन मग चाळा,
पण तू टिपायचा डोळ्यातील घन ओला.
लाजायचं वगैरे माझं काम आहे,
कसं ना कळे हा सोपा तुला मसला.
लाजेने इतके दिवस सांभाळाय माझं तोल,
पण ह्याचं काय, हा का अबोल, जाणून माझा कौल.
नको नको ते सारं काही सांगून जातो,
आता विचारेल, नंतर विचारेल, म्हणून जीव टांगून जातो.
पण आता मीच करून धीर विचारू का सगळं,
इतका कसा रे तू भोळा, काय आहे मनात वेगळं.
बघ काहीही न बोलता निघून जातोयस असाच,
पहिल्यावेळी जीवही घेऊन गेलेलास तसाच.
उद्या पुन्हा येशील, तसाच बसशील, गोड हसशील.
पण कोणास ठाऊक, मनातलं सारं कधी विचारशील.
....अमोल