अंगणात
अंगणात रांगोळी मी केव्हा काढू बाई
पाहुण्याला अवेळीच येण्याची ना घाई
आता कावा न्हाऊ धुऊ पारोशीच राहते
म्हणते मी पुसून घे पिठानेच जाते
पहाटेला मनी कसा गारवा भरतो
तोच म्हणे आडू आडू फुंकर मारतो
राती किती चांदण्या मी केसात खोचल्या
आणि त्याने साऱ्या बाई ओठात वेचल्या
झुंजू मुंजू पहाटेला पाहुणा गं येतो
जाईजुईमध्ये कळ लावूनिया जातो
जास्वंदीला फुटू येतो पिवळा बहर
हळदिवे होत जाते चांदण माहेर
अंगणात रांगोळी मी काढू कशी बाई
सडा पांघरून बघ भारावली भुई
-पद्माकर द. कार्येकर
(वसंत-दिवाळी २०१०)
--------------