« on: February 21, 2011, 03:58:44 PM »
उंबरा युगांना नाही
ये सोडून सारी नाती
वाहू चल निळ्या प्रवाही
ताऱ्यांच्या मंद प्रदेशी
ऋतु गातील बघ अंगाई!
नावाचे गोंदण पुसणे
भाळाला अवघड असते
उरणार कधी जे नसते
ते जपण्याची का घाई?
पाषाणा फुटला पान्हा
आकार जीवाला आला
मंदिरात नेली मूर्ती
ठिकऱ्यांची पर्वा नाही
असताना 'नसणे' होणे
नसण्याहुन सोपे नसते
नसताना उरण्याचेही
भय मुळी सोसवत नाही
युग सरले क्षण झुरताना,
नक्षत्र प्रतिक्षा झाली
तू 'ये' व 'येऊ नको' ते
उंबरा युगांना नाही
प्रवीण दवणे
(वसंत-दिवाळी-२०१०)
-----------
« Last Edit: February 21, 2011, 04:01:50 PM by sulabhasabnis@gmail.com »

Logged