खूप वर्षांनी ती परत आली
मी किंचितसा हसलो
ती ’हाय’ म्हणाली
- जेव्हा खूप वर्षांनी ती परत आली
मी म्हटलं ’योगायोगाने भेटलो
ठरवून नव्हे’
तिने तोवर बघून घेतलं
’जाड झालाय्स की रे!’
तिचा सेल वाजला
’एकच मिनिट’ म्हटली मला
’इट्स ओके’ म्हणत मी
कानात दाबलं इयरफोनला
सगळ्या गर्दीत दोघांना अंडरलाईन
केल्यागत वाटलं
तिला बोल्ड, मला
कलंडल्यागत वाटलं
ती म्हणाली ’इथे कसा?’
मी म्हटलं ’असतो इथेच’
’काय चालूए? काय विशेष?’
(कविता, गाणी)’सगळं तेच’
ती थॅंक्सगिव्हिंग आणि स्नोफॉल मध्ये होती
मी प्रश्नांचा विचार करत भारतामध्ये होतो
ती ख्रिसमस पर्यंत पोचल्याचं कळलं
मी प्रश्नांमध्येच अडकलेलो होतो
तिचं प्लेन लॅन्ड झालं तेव्हा
माझ्या सेल मध्ये पाणी गेलं होतं
ती निघून गेल्यापास्नं खरं तर
पाणी बरंच निवळलं होतं
...आता पुन्हा माझ्या तळ्यात बघू नकोस
खडे मारून टप्पे मोजू नकोस
आपले टाईमझोन आता वेगळे झालेत
एकाच वेळी भेटण्याच्या गोष्टी बोलू नकोस
ज्या ज्या गोष्टींवर हसतो आपण
त्यांनीच कधीतरी रडवलेलं असतं आपल्याला
जसं भेटल्यावर हसतो आपण
एकमेकांना
किंवा तू तुला, मी मला.
खूप वर्षांनी ती परत आली
मी किंचितसा हसलो
ती ’हाय’ म्हणाली
- जेव्हा खूप वर्षांनी ती परत आली..!