तुझे असे येणे जाणे, मला नकळत पाहणे,
तुझा लटकाच राग, मला उगा वेडावणे.
ओठ दाबुनी दाताशी, अन रुसवा नाकाशी,
असे मला सतावूनी काही न का वाटे मनाशी.
तुझ्या रुसण्याचे कारण सारे तुलाच माहिती,
दूर जाण्याची का मला सदा दावितेस भिती.
कधी जवळ येऊन, करून चंद्र पापणीचा,
चुकतो गं ठोका काळजाचा त्या क्षणीचा.
आणि काय सांगू मग माझे हरपते भान,
पुन्हा रागावते तू, म्हणे नाही माझे ध्यान.
सांग का नको पडू तुझ्या रूपाच्या मोहात,
सांग कधी येशील माझी बनून घरात.
हे असे चोरूनिया नाही भेटणे गं बरे,
कुणी पाहेल म्हणुनी धस्स काळजात भरे.
भेटी साठी तुझ्या किती बोलू सार्यांशी मी खोटं,
पण सुख दुखाची केली तुझ्याशी साट-लोटं.
तुला होताच उशीर चढे माझ्या रागाचाही पारा,
तुला पाहताच क्षणी निवे रागाचा निखारा.
तुझे हसणेच पुरे, मला विसरण्या सारे काही,
मी होतो वेडा पिसा जेव्हा तुझी भेट होत नाही.
तुझ्या संगे असताना वाटे जिंकले मी जग,
सारे लुटविन क्षणी फक्त प्रेमाने तू बघ.
जशी किनार्यास लाट भेटे काही क्षणाचपुरती,
तशी तुझी भेट पण, येई भावनेस भरती.
तुला भेटण्याला आलो धावत मी किती,
क्षणभर बोलूनिया तुझी तयारी जाण्यासाठी.
सहज हसून सांगतेस " चल भेटूया उद्या पुन्हा",
मी तहानलेला किनारा तुला फुटे ना गं पान्हा.
तुझा भेटला होकार, वाटले भेटले गं सारे,
तुझा सांभाळता रुसवा मला दिसतात तारे.
तरी सुद्धा चालेल पण तू भेट रोज रोज,
तुझ्या संगे विसरतो माझ्या वेदनांच ओझं.
कधी गजरा गुलाब, कधी गोड cadbury ,
सारे काही आणीन तू नको म्हटलेस तरी.
तुला काळजी आपल्या पुढच्या आयुष्याची,
तू साथ दे केवळ नको चिंता भविष्याची.
तुला सुखात ठेवीन , समाधानात ठेवीन,
आधी तुला भरवीन आणि मग मी जेविन.
फक्त वचन दे एक रोज घेशील कुशीत,
रागावणार नाहीस आणि राहशील खुशीत.
तुझ्या साठी बघ मी किती बदललो,
आधी काय होतो आणि आता कसा झालो.
कायापालट हा केला सारा तुझ्याच प्रेमाने,
सांगशील मला जसे वागीन त्याप्रमाणे.
फक्त पेर माझ्यावरी तुझ्या सोबतीची साखर,
तुला ठेवीन मनात मढवून हृदयाचे मखर.
नको देऊस दुरावा, नको घेऊन परीक्षा,
तुझ्या वाचून जगण्याची नको मला देऊस शिक्षा.
................अमोल