तिचं सारं काही छान,
तिचं हसणं तिचं दिसणं,
तिचं माझ्यासोबत असणं,
तिचं रुमाल, तिची ओढणी,
तिचं स्कार्फ तिची वेणी,
पडणारा पाऊस, भिजलेली छत्री,
अडखळलेली वाट, तिची माझी मैत्री,
तिचं मन, आपलेपण,
आणि तिच्यासोबत घालवलेला,
प्रत्येक प्रत्येक क्षण.
तिचं सारं काही अल्लड,
तिची स्वप्न, स्वप्नांना जपणं,
स्वप्नानांसाठी जगणं, स्वप्नानांमध्ये हरवणं,
तिच्या वेड्या कल्पना,आणि वेडं वागणं,
विसरून वास्तवाला स्वप्नांमागे लागणं,
ताऱ्यांची ओढ आणि चंद्र हवा असणे,
पाकळ्यांची वाटेवर काट्यांचे नसणे,
तिचेच स्वतःचे भास, स्वतःचे आभास,
हवे तेव्हा खुलणारे मनातील मधुमास.
तिचं सारं काही वेगळं,
ती स्वतःच वेगळी,
तिची वेगळी नजर, नजरेतली चमक,
प्रत्येक निछायातली उमेदीची धमक,
आकाशाचा ध्यास, हवेतला प्रवास,
मला मीपण विसरायला लावणं,
माझं तिच्यामागे धावणं,
इवल्याश्या ओंजळीत तिच्या,
माझ्या आकाशाचं मावणं,
तिच्या गप्पा, तिचे सूर,
क्षणक्षणाला बदलणारे मनातले नूर,
ती भरकटलेलं फुलपाखरू,
उनाड असं कोकरू,
सशासारखी चंचळ धावणारी तुरुतुरु.
तिचं सारं काही नाजूक,
तीचा स्वभाव, तिची भावना,
क्षणक्षणाला होणाऱ्या हळव्या मनाला यातना,
तीचा हर्ष, तीचा स्पर्श,
संवेदानाच्या हिंदोळ्यावर हेलाकावणं फारसं,
तिचं हळवेपण, तिचं हळवं मन,
आणि नाजुकश्या मनाची नाजुकशी ठेवण.
.....अमोल