जेव्हा माझ्या कवितेतुनी तू झळकू लागला...
माझा माझ्या शब्दावरही विश्वास बसू लागला,
ज्या क्षणी तू कविते मधुनी डोकावून नाही पाहिले,
तिथेच तुझी मी त्या वाटेवर, वाट पाहत राहिले,
ऐसाही होता काळ कधी, तू होतास माझा सोबती,
आजही घुमते मन माझे त्याच वळणा भोवती,
सुगंध दरवळे जीवनी मज, तू दिलेल्या चाफ्याचा,
तुझ्या साठी रोज पाडते, सडा वाट ती प्राजक्ताचा,
दिस मावळता झोपी जातात, चाफा आणि प्राजक्ता,
रातराणीला निरोप धाडला.....तुज येताना मी बघता,
सांगितले मी राणी मजला, सुगंध तुझा उधार दे,
मज सख्याचे स्वागत करण्या, सुगंध तुझा मधाळ दे,
तुझ्यासाथीने जुळूदेत बंध, त्याच्या नि माझ्या नात्याचे,
जाऊ नये तो परतून पुन्हा, देऊन श्राप मज एकांताचे............