होऊनी वाळू मी किनारी असावे
स्पर्श करण्यास मला तू फेसाळून उठावे
कधी अंबरात मी कधी क्षितिजात राहावे
संध्येच्या रंगत तू मला पूर्णपणे रंगवावे
कधी पुनवेचे रात बनून फुलावे
लाटेस तुझ्या वर्ख चांदीचे चढावे
कधी रौद्ररुपी तू खवळून उठावे
मी किनारी खडक ते तडाखे प्राशावे
तुझ्या प्रतिमेच्या छाया साकार व्हाव्या
भेटी गाठी माझ्या मनी जगाव्या
अर्पायला सरिता जीवन इथे येता
मी त्या समर्पणाची सीमा असावे
अशी नाती वेड्या नीतीची आगळी
होऊन किनारा मी तटी बैसलेली
आहे फिर्याद आणि मर्यादा माझी
मी रिवाजाला सोडून का तुला भजावे ?
किती रात्री जागल्या तुझ्या गर्जनेत
किती काळ बैसले तुझ्या साधनेत
देऊ केलेस मज पायाशी स्थान जे
त्यालास जगणे किनारा म्हणावे
दत्ताराम कदम ...