गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची
एक दिवस झाडाला बहर असा आला
पाना पानांतुनी रंग हिरवा आसमंतात न्हाला
हलकेच मग चाहूल लागली रेंगाळणाऱ्या वेलीची
गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची
वेल मग गुंफू लागली झाडाभोवती बंध
झाडासोबत तीही जणू होऊ लागली धुंद
दोघांनाही गोडी जडली अबोल या सलगीची
गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची
हळू हळू वेलीने सारे झाड व्यापून गेले
वेलीच्या सहवासात झाडही मंत्रमुग्ध झाले
एकजीव एकश्वास ज्योत जणू दोन डोळ्यांची
गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची
विसर पडला कठोर या जगाचा
तमा न केली बदलत्या ऋतूंची
ग्रीष्मात सारे सरून गेले
राखही न उरे विरल्या पानांची
गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची ...
गंध पुन्हा मातीला ... रंग नवा प्रीतीला
फिरून आला मेघ सावळा .. धुंद वारा साथीला
चाहूल पुन्हा शरदाची ... येणाऱ्या नव्या पालवीची
गोष्ट एका वेडाची भारलेल्या झाडाची