एकदा काय चूक केली तुला चोरून पाहण्याची.
शिक्षाच दिलीस मला तुझ्या आठवणीत राहण्याची.
तुझं ते नक्षीदार नाक, त्यातली ती फुली,
ती वेलबुट्टी कानांची, त्यावर बटांच्या वेली.
ते नाजूक पातळ ओठ, त्यांखाली तीळ-अनुवठी,
दिसतेस जणू कुणी असावीस नटीबीटी.
नाहीतर मला नव्हती सवय असं कुणा न्याहाळण्याची.
आता असं वाटतं कि तू सोबत असतेस,
मी वेड्यासारखं वागतांना ओठ मुरडून हसतेस.
तुझ्या कल्पनेत गुंततो, चावत बसतो नखं,
वहीच्या मागच्या पानावर तुझंच नाव सारखं.
कुठून नको ते सुचलं आणि पाळी आलीय वेड लागण्याची.
मी आता प्रेमात पडलोय हे मित्रांना लागलंय कळू,
नकोनको म्हणताना बातमी पसरली हळूहळू.
तुझ्याही कानावर जेव्हा गेलं माझा वेडंपण,
तू मित्रांना बजावलंस शिकवायला मला शहाणपण.
तेव्हा पासून हिम्मत नाही केली तुझ्याकडे बघण्याची.
एकदा काय चूक केली तुला चोरून पाहण्याची.
शिक्षाच दिलीस तुझी आठवणसुद्धा न काढण्याची.
......अमोल