पानगळ झाल्यावर आठवू लागतं
झाडं हिरवी हिरवी असतात
झाडांची पालवी... त्याचं हिरवेपण
मग त्याची सावली नि सावलीतले आपण
खिडकीतून चिमण्या भुर्रकन उडून गेल्यावर कळतं
त्या चिवचिवत आल्या होत्या अंगणात
दाणे टिपत टिपत मग घरात
पंख्यावर ... आरशासमोर...
त्या चिवचिवत होत्या
तू ही तशीच आली आहेस कधीतरी
हिरव्या हिरव्या झाडांची सावली होऊन
... पालवी तुलाही असते
... चिमण्यांसारखी चिवचिवत अंगणात
... मग हळू हळू मनात
तू घरटं केलंस
प्रेयशी ऐवजी एखाद् वेळ
तू माझी मैत्रीण हो
म्हणजे मला हे सारं तुला सांगता येईल
निःसंकोचता मोकळेपणाने.
- गजानन मुळे
- mulegajanan57@gmail.com