मनाचे श्लोक वाचत वाचत मोठे झालो... कळलेच नाही प्रेमाचे श्लोक कसे न कधी मनी रुजले... मनाच्या श्लोकांतले वृत्त नाही जमले काव्यात बांधायला, पण प्रत्येक ओळीतील शब्द्संख्येच बंधन पाळण्याचा प्रयत्न केलाय...
मना सज्जना तुज हे काय झाले
ध्यानीमनी तव कुणी राज्य केले
जागी तुझ्या मोठे सत्तांतर झाले
तुझ्याविना ते कुणास न कळले || १ ||
मना सर्वथा तिस पूजीत जावे
तिने मात्र नित्य दुर्लक्ष करावे
फुका का दुःख तू ते ओढोनी घ्यावे
मना सज्जना प्रेमापथा न जावे || २ ||
पथ भरीले जरी काट्यांनी सारे
फुले मानुनी सदा चालीत जावे
पदी घाव कुणास कुणा कारणे
मना सज्जना प्रेमापथा न जावे || ३ ||
रजनीकाळी निद्रा डोळा न लाभे
दिनप्रकाशी पाही तारांगणे रे
अकारण का तारे मोजीत जाणे
मना सज्जना प्रेमापथा न जावे || ४ ||
जनी चालता एकटेची हसावे
कधी एकांती डोळा पाणी जमावे
अश्रुंचे परी मोल त्या कोण जाणे
मना सज्जना प्रेमापथा न जावे || ५ ||
नाव सोडी जो उन्मत्त सागराते
उर्मीसंगे उंच उडे व आदळे
नाव बुडवोनी जो जाणे तरणे
त्यासाठी प्रेमपथ तिष्ठत आहे || ६ ||
मिथिल शिंदे