आता ही संध्याकाळ विरून गेल्यावर
कातर काळोख होऊन परतेल अंगणात
मग सरलेल्या दिवसांची काढीत आठवण
.....शोधीत खुणा
.....निखळ हासत राहील पुन्हा पुन्हा
तू बाशिंग उतरवून ठेवल्यानंतर
तुझ्या कपाळावर पडलेली
आणखी एका आठीची भर....
ती हलकेच माझ्या ओंजळीत ठेवील
मग शून्यस्त नजरेने पाहील आकाश
...विरून जाणारे ढग
...पंख फुटलेली पाखरं
...स्वच्छ प्रकाश
मग लवलेल्या विजांची येऊन आठवण
तुला आठवतील काही पावसाळे
भिजत राहण्याच्या उनाड दिवसातले
मग रेनकोटातून
नकळत आत आलेला
एक पावसाचा थेंब
विसावेल माझ्या वृद्ध तळहातांवर
मग मला हळूहळू जाणवू लागेल
तो पाऊस ... त्या दिवसातला
मग डोळ्यांसमोर चक्क उगवून येईल
.....तो रस्ता ....ते वळण ..
.....ती सायकल ...ती आठवण
.....ती गाणी ....ते मौन
......ते दिवस ....ते वर्ष
आता मला सारं काही आठवू लागेल
...ही संध्याकाळ विरून गेल्यावर
कातरकाळोख भरून आल्यावर ...!!
- गजानन मुळे
( "....कधीचा इथे मी." मधून )