राहूनच गेलं आपलं थोडं तसलं ते जगणं
भिरभिरणाऱ्या नजरांनी कोपऱ्यापासून बघणं
एकांतात लाल गालांनी आपल्यासाठी मुसमुसणं
आपलं हसू बघून तिचं पण हसणं
कितीही जोरात वाजलं तरी कानात येऊन कुजबुजणं
जगात एकटे नसल्याची प्रचंड जाणीव देणं
आणि तिच्या नुसत्या असण्यानं आपले ढग गडगडणं
राहून गेलं तसलं जरा आपलं थोडं जगणं
तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी हिरे मोती बरसणं
नको इतक्या काळजीने इवलं काळीज घुसमटणं
मित्र- मैत्रीण आलेच जाऊन, घरच्यांना तिचं भुलवणं
तुझ्या माझ्या सावलीत ह्या कोवळ्या कळ्या फुलवणं
पिंपळाच्या पानांनी आपल्या वह्या भरवणं
राहून गेले वाटतं तुझे झोके झुलवणं
राहून गेलं आपलं जरा तसलं थोडं जगणं
- रोहित