तू असतानाचे माझे खूळ भलतेच होते,
तू नसतानाही माझे हाल तेच होते.
पापण्या मिटताच व न मिटताच तुझीच मूर्त,
आताही आहेस वा कल्पना, हे हि पेच होते.
आजही ओलेच आहेत भिजलेले क्षण कालचे,
तरी झेलण्या नव अमृतधारा ,अवसान उभेच होते.
काळ विरघळली काही फुले भेट होताना जरी,
तू काढून ठेवलेल्या फुलांचे ,सुगंध तसेच होते.
राप अजूनही जाणवतो अंगाअंगावर विस्तवाचा,
ओठांवर कोमल दाह ज्यांचा , ते गुच्छ फुलांचेच होते.
स्पर्श झाला पदराचा तू सावरत जाताना उंबरठ्याला,
त्याचे हि रोमांच ,माझ्या रोमांचा सारखेच होते.
अजून लाजले होते खिडकीचेही गज काही,
त्यांनी मिटलेले दार ,आत्ताही बंद तसेच होते.
आत्ता वाटेचना कि उठावे नि करावे स्नान काही,
मलीन नव्हती भेट ती ,तिचेही पवित्रपणही तितुकेच होते.
........ अमोल