संदीप खरेच्या कविता ह्या सहज समजण्यासारख्या सोप्या, सुटसुटीत भाषेत आहेत. त्या कवितांमध्ये अवघड शब्दांचा वापर कमीत कमीत आहे शिवाय त्या अर्थघनहि आहेत. त्यामुळेच सामान्य वाचकांबरोबर त्या सामिक्षकानाही भुरळ घालतात.
वाचणाऱ्याच्या काळजाचा ठाव त्या सहजपणे घेतात आणि म्हणूनच त्या लोकप्रिय आहेत. उत्तम संगीताची जोड मिळाल्यामुळे त्या आणखीनच छान वाटतात.
मराठी कवितेला संदीप आणि सलीलने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. एक मराठी म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. या अगोदर पुष्कळ कवी होऊन गेले आणि दर्जेदारहि पण रसिकांना कविता वाचनाची आणि ती ऐकण्याची गोडी संदीप च्या कवितांनी निर्माण केली असे म्हणावे लागेल. म्हणूनच त्याचा पहिलाच काव्यसंग्रह -मौनाची भाषांतरे- ने खपाचा उच्चांक गाठला.
संदीपने प्रेमाच्या कवितांत तरुणाईच्या भावनांची नस पकडली आहे. त्यामुळे त्या कविता प्रेम करणाऱ्याला आपल्याच वाटतात. म्हणूनच "उमजत नाही ओढ कुणाची सुखवीत सलते रे" ऐकताना आम्हा प्रेमवीरांना त्याच्याच कवितेतील पण आमच्या हक्काचे "काळे भोर डोळे" आठवायालाही लागतात.
कविता वाचताना कुठेही ओढून ताणून यमक साधल्याचे जाणवत नाही. सहज सुंदर भाषेत यमक छंदाचा वापर करीत त्या कवितांचे कधी गाणे होऊन जाते ते वाचकालाहि कळत नाही.
" सरीवर सर सरीवर सर " म्हणत म्हणत वाचक त्याच्या कवितात चिंब भिजून "राणी माझ्या मळ्यामंधी घुसशील का" च्या तालावर भान हरपून नाचत हि सुटतो. "चला दोस्तहो आयुष्यावर बोलू कांही" म्हणणारी त्याची कविता "नसतेस घरी तू जेंव्हा" गात डोळेही पुसायला लावते. "अगोबाई ढग्गोबाई" च्या तालावर पोरांना आणि थोरातल्या पोराना नाचवणारी कविता "दमलेल्या बाबाची कहाणी" सांगून सर्वांना गंभीरपणे रडूही आणते. "मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो" आणि "मी संपही केला नाही मी मोर्चा नेला नाही" सांगत स्वत: चेच आत्मपरीक्षण करते नि वाचकाला हि आत्मपरीक्षण करायला लावते.
अशी संदीपची सहजसुंदर कविता मला खूप खूप आवडते. त्याची पुढील वाटचाल अशीच बहरत जाओ.
अतुल भोसले