जाणले मी ,तू मला कळलास तेव्हा
मी न माझी ,मजकडे वळलास तेव्हा
स्पंदने माझीच मज सांगून गेली
विरह माझा साहता छळलास तेव्हा
चिखल फेकीतून का नामानिराळी ?
उलगडे ,वेढून मज मळलास तेव्हा
तोल ढळताही कशी ताठयात होते ?
ये प्रचीती ,तूच कोसळलास तेव्हा
तू प्रकाशाचा सखा तेव्हाच कळले
दाह माझे भोगुनी जळलास तेव्हा
मी न काया मी तुझी छाया सदोदी
सांजवेळी मज कळे ढळलास तेव्हा
-------------छाया देसाई