माझे कसे म्हणावे …..
माझे कसे म्हणावे संबंध मी जगाचे,
माझे कुणा म्हणू मी, झाले कुणी कुणाचे?
श्वासात गुंगवूनी आश्वासनेच देती
प्राणात ना भिनावे ते वास अत्तराचे....
बेभान होउनीया गातील गोड गाणी
माझ्या कथेव्यथेशी नाते नसे स्वराचे....
शब्दातली खुमारी बांधी प्रबंध येथे
माझे विचार नाही उच्चारलेत वाचे....
स्पर्शात मार्दवाचा रेशीमभास होतो
का त्यात जाणवावे व्यर्थत्व बेगडाचे....
संबंध मानताना व्यक्ती गुलाम होतो
का मी हरून जावे स्वातन्त्र्य या मनाचे....
वेडा म्हणाल किंवा माथेफिरू दिवाणा
स्वीकार होत नाही नाते मनी कुणाचे....
- स्वामीजी (१५ एप्रिल २००८)
(वृत्त आनंदकंद, गण - गागालगा लगागा गागालगा लगागा)