चालताना थांबतो मी हा असा
अक्षरांचा चाहता मी हा असा
चार दिवसांची कहाणी ती तशी
ती तशी होती तरी मी हा असा
देत गेलो हाती आले जे जसे
घेत गेलो हावरा मी हा असा
कोणी काही बोलले तर बोलू दे
बोलूनी थकतील तरी मी हा असा
मागुनी घेतो मला जे जे हवे
मागुनी ते बोलती मी हा असा
चार शब्दांतून होते मैतरी
नाम का सांगू? असे मी हा असा
---नाम