Author Topic: उखाणे... थोडी गंमत!  (Read 26289 times)

Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
उखाणे... थोडी गंमत!
« on: February 15, 2010, 03:43:48 PM »
उखाणे... थोडी गंमत!
                                                                             - अनुराधा गांगल
 
दिवाळी संपल्यावर लग्नाचा सीझन सुरू झालाय. या वर्षी मार्गशीर्षात सगळ्यांची घाई उडालीय. कारण पौषात लग्नं करायची नाहीत. पौष संपला, की सीझन सुरू होतो परीक्षांचा आणि यंदा मे महिन्यात चांगले मुहूर्तच नाहीत... म्हणूनच सध्या लग्नांची धूम आहे आणि त्याचमुळे उखाणे घेण्याचीही...

साठ-सत्तर वर्षांपूर्वीचा काळ. मुलीचं लग्न ठरलं, की घरात अनेक प्रकारांची "गडबड' सुरू होई. आई, आजी मुलीला येता-जाता उपदेशाचे डोस पाजत. असे वागावे, तसे वागावे, असे सांगत असताना घरातील आजी तिला हळूच कानात दोन उखाणेही सांगत असे... मुलगी लाजतच ते ऐके आणि स्वत:च्याही नकळत पाठ करी...
आताच्या मुली उखाणा घ्यायला सांगितला, तर अरुण, विनय, सुमन, शंतनू, मंदार असं पटकन नाव घेऊन मोकळ्या होतात.

उखाणा घेणं, उखाण्यात नवरोजीचं नाव घेणं, ते घेत असताना लाजून मान खाली जाणं... अगदी पूर्वीचं झालं हे; पण या सर्व गोष्टी अगदी नव्या-नव्या लग्न झालेल्या "नवथर' मुलीलाच छान शोभून दिसत. (म्हणजे अजूनही दिसतील खरं तर; पण...) उखाणा घे, असं सांगताच नवी नवरी शालू सावरत उठे, उभी राही, इकडे-तिकडे बारीकसा कटाक्ष टाके... नवरोजी ऐकायला आहेत का? हेही त्या कटाक्षात तिला कळे. मग आढेवेढे घेत, आवंढे गिळत "घेते हं' असं म्हणत हळुवारपणे एखादा उखाणा तिच्या तोंडून बाहेर पडे...
मंगळागौरीच्या खेळात सगळीच धम्माल गंमत. अजूनही मंगळागौरीला मात्र उखाण्याच्या कार्यक्रमात एखादी आजी पटकन उखाणा घेते...

"आम्हा एकट्या बायकांचा कोण बरं वाली?
हे गेले वर, मी बसले खाली!'
किंवा एखादी लग्न न झालेली मुलगी म्हणते,
"समोरच्या कोनाड्यात ठेवलेत गहू
लग्न नाही झाले तर नाव कोणाचे घेऊ?'

उत्तम वाचन, उत्तम गुणग्राहकता, उत्तम रचना, उत्तम साहित्यिक गुण, उत्तम काव्यगुण उखाण्यांमधून दिसून येतात. "उखाणा' रचणं हेही "क्रिएटिव्ह' काम आहे. काही "उखाणे' बघा बरं...

कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन
...चे नाव पाहा घेतले, की नाही पटकन

आकाशाच्या निलिम्यावर इंद्रधनुष्याचा पट्टा
...चे नाव घेते पुरे करा बाई थट्टा

वर्षा ऋतूत आकाशात लकाकतात विजा
...च्यासह केली श्री सत्यनारायणाची पूजा

पृथ्वीवर पसरते, कधी पूनव कधी आवस
...चे नाव घेते हळदीकुंकवाचा (डोहाळजेवणाचा, पूजेचा, कशाचाही) आहे दिवस

लतिकांनी भरले हिरव्या पानांचे चुडे
...चे नाव घेते मंगळागौरीपुढे

फुलांची भरली वाडी, सजवला मला साज
...चे नाव घेते डोहाळजेवण (किंवा काहीही) आहे आज

चंदेरी चांदण्यात पडली वसुंधरेला भूल
...सह मला लागली भावी बाळाची चाहूल

सायंकाळी तुळशीपाशी, मंद ज्योत तेवते
बारशाचा दिवस म्हणून ...चे नाव घेते

आशीवार्दाची फुले वेचते वाकून
...चे नाव घेते तुमचा मान राखून

चंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा
... आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा

समुद्राला आली भरती, नदीला आला पूर
...करता माहेर केले मी दूर

अरबी समुद्रात उसळल्या लाटा
...च्या सुख-दुःखात माझाही वाटा

अशोकवनात कोकिळा गाते
...चे नाव ... घेते

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
...चे नाव घेते ऐका देऊन कान
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
...चे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा

गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध
...च्या जीवनात मला भरभरून आनंद

साधी राहणी, उच्च विचारसरणी
याच तत्त्वाने वागेल ...ची गृहिणी

भरल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
पंगत बसली ...रावांच्या मित्रांची

चांदीच्या करंड्याला नक्षीदार झाकण
...रावांचं नाव घेऊन सोडते कंकण

शुभ काळी शुभ वेळी आली आमची वरात
...रावांचे नाव घेते सासरच्या घरात

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
...रावांचं नाव घेते ...ची सून

वर्तन असावे नम्र, शब्द असावा गोड
...रावांच्या संसाराला माझी आनंदी जोड

राजहंस पक्षी मोतीचारा भक्षी
...रावांचं नाव घेते तुम्ही सर्व साक्षी

मंगल झाली प्रभात, विहंग उडाले गात
...रावांच्या हाती दिला हात
करायला जन्मोजन्मीची साथ

नमस्कार फुकाचा, आशीर्वाद लाखाचा
...रावांसह संसार करेन तुमच्या आशीर्वादाने सुखाचा

वृंदावनात घुमला, श्रीकृष्णाचा पावा
साऱ्या हौशी पुरवायला ...सारखा पती हवा

चंद्राचं प्रतिबिंब, पडलं तळ्यात
...रावांचं नाव घेते मैत्रिणींच्या मेळ्यात

परस्परांचे झालो सोबती, सुख-दुःखाचे भागीदार
.... झालो जन्मोजन्मीचे जोडीदार

हिरकणी बुरूज अमर झाला मातेच्या प्रेमाने
...रावांचे नाव घेते प्रेमाने अन्‌ आदराने

श्रीकृष्ण अन्‌ रामाच्या सर्वत्र आहेत मूर्ती
...रावांची पसरो जगभर कीर्ती

अशोकवनात कोकिळा गाते
...रावांचे नाव ...घेते

हे आहेत काही सोपे, सुटसुटीत, छान, पटकन घेता येण्यासारखे उखाणे. हे सर्व उखाणे खास नववधूंसाठीच आहेत. पूर्वी काही स्त्रिया अगदी मोठमोठ्या कवनात, मोठमोठ्या ओव्या रचून, त्यात "रावांचं' नाव गुंफून उखाणा घेत असत; परंतु आता अनेक गोष्टींत बदल घडून येत आहे, तो आपण बघतच आहोत.

"स्त्री'चं शिक्षण, तिचं करिअर, तिचा अभ्यास, तिचं घर, तिचा पती अन्‌ मुलं यात तिला घरी आणि दारी भरपूर वेळ द्यावा लागतो. या सर्वांमध्ये ती पार गुरफटून गेली आहे. तरीसुद्धा रोजच्या त्याच त्या गर्तेतून, मुला-बाळांमधून, सासू-सासऱ्यांमधून, पतीच्या "अगं, अगं'पणातून तिच्या खास करमणुकीसाठी किंवा तिच्या विरंगुळ्यापोटी ती आसपासच्या गृहिणींत किंवा मैत्रिणींमध्ये असा वेळ देतच असते अन्‌ म्हणूनच खास हे सुटसुटीत तिच्यासाठीचे छोटे छोटे उखाणे.

पन्नास वर्षांपूर्वी मुली आपल्या यजमानांना "अहो' हाक मारीत; पण आताच्या करिअरवाल्या, नोकरी करणाऱ्या, पद भूषविणाऱ्या मुली आपल्या "नवरोबांना' अरे-तुरे म्हणतात. या अशा आधुनिक सहचर अन्‌ सहचारिणींसाठी हे काही "उखाणे'. बघा तर!

नमस्कार करता येतो मला, छान वाकून
...चं नाव घेते तुमचा मान राखून

शंकराला वाहिलं बेलाचं पान
...चं नाव घेते हं, ऐका देऊन कान

गुलाबाच्या फुलांचा येतो मंद सुगंध
...बरोबर राहताना मला होईल आनंद

गोकुळातील मेळाव्यात श्रीकृष्ण वाजवतो पावा
...सारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवा

आहे चैत्र-वैशाख महिना, सुरात कोकिळा गाते
...चं नाव ... घेते

रामाची सीतामाई झाली होती लुप्त
... अन्‌ मी राहू नेहमी तृप्त

रजिस्टर केलं लग्न, नाही चौघडा-सनई
... आता खाऊ या, मस्त मेवा मिठाई

पोळी-भाजी नको, नको वरण-भात
..., पाव-भाजी खात, करू या छान बात

नवरोजी म्हणतात -

...भोवती आहे सतत मैत्रिणींचा घोळका
पैठणी का शालू दिलाय ते सर्वांनी ओळखा

नका करू आरडाओरड तुम्ही सर्व जणी
... आहे माझी खरंच पट्टराणी

मोठ्यांसमोर सर्वच गोष्टींत मी झालो पास
....ला देतो गुलाबजामचा घास

कॉम्प्युटर-मोबाईलचा उपयोग झाला छान
... आता प्रत्यक्ष गप्पा मार, ऐकते देऊन कान  

Marathi Kavita : मराठी कविता


sac

  • Guest
Re: उखाणे... थोडी गंमत!
« Reply #1 on: March 30, 2012, 10:27:25 PM »
22

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):