Author Topic: तडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या  (Read 242 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
कवी,वात्रटिकाकार " विशाल मस्के" यांची दुष्काळी दौर्‍याच्या निमित्ताने दुष्काळग्रस्तांच्या भावना प्रखरपणे मांडणारी हि एक वात्रटिका,...

*******  तडका-९९९ *****


भावना दुष्काळग्रस्तांच्या,...


काळी माय बी तडफतीया
मनं आमचे होरपळले आहेत
शेतामध्येही फिरून पहा
फडच्या फड वाळले आहेत

शेतात जायची हिंमत नाही
घरातल्या घरात वागतो आहोत
मरण दारात येऊन थांबलंय
मरणाच्या दारात जगतो आहोत

आग पडली काळजात साहेब
उमेदही आचक्या देती आहे
जगणं कुठवर पुरणार आमचं
आमच्याच मनाला भीती आहे

मरत मरत जगतो आहोत
पण जनावरांना पोसावं कसं
त्यांनीच आजवर पोसलंय आम्हा
आता आम्ही गप्प बसावं कसं

कोटीच्या-कोटी खर्च करून
तुमचे दौर्‍यावरती दौरे येतात
मदतीचा मुद्दा निघेल म्हणून
आमचे मनं कावरे-बावरे होतात

पण ना मदत मिळती आहे
ना दौर्‍याने फरक पडतो आहे
कालही जीव तडफडत होता
आजही जीव तडफडतो आहे

भावनाविवश झालोत आम्ही
आमच्या भावनांशी खेळू नका
दौरे करण्यालाही विरोध नाही
पण जखमेवर मीठ चोळू नका

पाण्यासाठी जगतो आहोत
पाण्यासाठी मरतो आहोत
पाणी-पाणी करत साहेब
डोळ्यात पाणी भरतो आहोत

मना-मनाला अवजड असा
आता हा एकेक दिस झालाय
दुष्काळ पाहणी करण्या म्हणे
सत्तेतला फड नविस आलाय

नुसती पाहणीच करू नका
समजुन घ्या दुष्काळ जरा
दुष्काळी व्यथा सांगेन तुम्हा
हा करपलेला माळ सारा

हतबल झालो आहोत आम्ही
तहान फक्त भागवा साहेब
मोठी अपेक्षाही नाही आम्हा
माणूसकीला जगवा साहेब

अजुन खुप बोलायचंय,पण
हूंदका बोलणं अडवतो आहे
मना मधल्या भावनांनाही
भावना विवश तुडवतो आहे

सरकारी कामांसारखं आज
दु:ख लांबणीवर लांबवा साहेब
या लाखो-कोटी दुष्काळ्यांचा
हूंदका आज थांबवा साहेब


विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

सदरील वात्रटिका आवडल्यास नावासहित शेअर करू शकता,...
हि वात्रटिका ऐकण्यासाठी पुढील व्हाटस्अप क्रमांकावर संपर्क करा - 9730573783