***** आजची वात्रटिका *****
**********************
चिरंजीव मराठी
मराठी वाचवा,मराठी वाचवा
ह्या केवळ गप्पा आहेत.
घरोघरी मम्मी,आन्टी,
अंकल आणि पप्पा आहेत.
कुणी इंग्रजाळलेले तर
कुणी हिंदाळलेले आहेत.
मराठीचे सारे संस्कार
माळ्यावरती गुंडाळलेले आहेत.
अशांनी मराठी वाचवा म्हणायचे
काहीसुद्धा कारण नाही !
ज्ञाना,नामा,तुका,एका
जिचे पुत्र,
तिला कधीसुद्धा मरण नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)