Author Topic: इतर कविता-(क्रमांक-111)-नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं  (Read 268 times)

Offline Atul Kaviraje

  • Hero Member
  • *****
  • Posts: 9,440
                                        इतर कविता 
                                      (क्रमांक-111)
                                     ---------------

मित्र/मैत्रिणींनो,

     "इतर  कविता"  अंतर्गत  मी  इतर  कवींच्या  कविता  आपणापुढे  सादर  करीत आहे .

                               नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
                              -----------------------------

जेवताना आजोबा लाडात येत,
मला आपल्या ताटातली भIकर देत;
जेवता जेवता मधेच थांबत
आणि एक भला मोठा ढेकर देत !
मी म्हणायची रागवूनः
“आजोबा, बॅड मॅनर्स,
व्हॉट आर यू डुइंग?”
आजोबांचं हसून उत्तरः
“आय अॅम जस्ट ढेकरिंग !”

आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…

आजोबांना पडलं होतं भलंमोठं टक्कल !
आजोबा म्हणायचेः
“ज्याला असं टक्कल
त्यालाच असते अक्कल !”
मी खिजवून म्हणायचोः
“आजोबा, यमकासाठी
घ्या आता बक्कल !”
आजोबा मोठयाने ओरडून म्हणतः
“अरे साल्या यमक्या,
मला देतोस धमक्या?यमकांच्या धंद्यामधे
मी आहे खमक्या !”

आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…

आजोबा आपल्याच नादात
स्वतःशीच गात असत,
गाता गाता मधेच थांबून
स्वतःशीच गोड हसत !

मी जवळ गेले की
मला म्हणतः
बेटा एक लक्षात ठेवः
एकटं एकटं जाता आलं पाहिजे;
स्वतःला स्वतःशीच गाता आलं पाहिजे !”

मी गोंधळून विचारीः
“म्हणजे काय?”
आजोबा मोठयाने हसून म्हणतः
” म्हणजे काय? म्हणजे काय?
म्हणजे नाकात दोन पाय !”

आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…

“आजोबा, एक गोष्ट विचारु?”
“विचार बेटा!”
“आजोबा, तुम्हांला मैत्रिणी होत्या का हो?”
“वा! वा! होत्या म्हणजे होत्याच की !
एक ती अशी होती,
दुसरी ती तशी होती !”

इतक्यात खोलीत आजी यायची,
आजोबांची जीभ एकदम बोबडी व्हायची !
आजोबा स्वतःला सावरायचे,
चटकन विषय बदलायचे,
घसा खाकरत म्हणायचेः
“बेटा, तुला गीतेमधला
स्थितप्रज्ञ कसा असतो ठाऊक आहे?
चालतो कसा, बोलतो कसा ठाऊक आहे?”

आजोबांच्या खोलीत आता
धुकं… धुकं… धुकं…
आजोबांचं जग सगळं
मुकं…मुकं…मुकं…

आजोबा संध्याकळी
अंगणातल्या झाडाखाली
आपल्या आरामखुर्चीवर
एकटेंच बसत;
एकटक डोळे लावून
दूर कुठे बघत असत…
दूरदूरच्या ढगात असत,
कुठल्या तरी न दिसणा-या जगात असत !!

पाय न वाजवता मी हळूच
तिथे जाई,
त्यांच्या आरामखुर्चीमागे
उभी राही!
काय बघत असतील हे?
मी दूर पाहीः
मला वेगळं काहीसुध्दा दिसत नसे,
तीच घरं…तीच झाडं…
सगळं अगदी तसंच असे !

पाय न वाजवता मी हळूच
परत मागे घरात यायची;
आजोबांची आरामखुर्ची
सावल्यांमधे बुडून जायची !

– मंगेश पाडगांवकर
------------------
--संकलक-सुजित बालवडकर
--------------------------

                  (साभार आणि सौजन्य-मराठी कविता.वर्डप्रेस.कॉम)
                 ---------------------------------------------

-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2023-गुरुवार.
=========================================


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पन्नास गुणिले पाच किती ? (answer in English):